‘कपिलमुनी यांचे सांख्यदर्शनातील तत्त्वज्ञान’ याचे विश्लेषण !
‘१८.१२.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांचा ‘कपिलमुनी यांचे सांख्यदर्शनातील तत्त्वज्ञान’ या संदर्भात लेख प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये ‘प्रकृती आणि पुरुष ही दोन २ तत्त्वे असून ती अनादी आहेत. या २ तत्त्वांच्या संदर्भातील अज्ञानामुळे माणूस जन्म-मृत्यूच्या फेर्यांत अडकतो. या भिन्न आणि स्वतंत्र तत्त्वांचे ज्ञान झाल्यावर माणूस जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होतो’, असे सांगितले आहे. या संदर्भात मी गुरुकृपेने खालील विश्लेषणात्मक माहिती लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
१. शरिरात ‘चित्जड’ ग्रंथी असणे
मनुष्याच्या शरिरात ‘चित्जड’ ग्रंथी असतात. चित् म्हणजे चैतन्य, हा ईश्वराचा अंश म्हणजे पुरुष आणि तुलनेने जड (चैतन्यरहित) असलेले शरीर हा प्रकृतीचा अंश आहे. प्रकृती आणि पुरुष (चैतन्य) यांचे सहअस्तित्व म्हणजे ‘अहं.’
२. चित्जड ग्रंथींमधील जड उणावत गेल्यास चैतन्य उरणे
अहं म्हणजेच या चित्जड ग्रंथी तुटल्या की, मनुष्याला स्वरूपाला जाणण्याची पात्रता प्राप्त होते. त्यासाठी साधना करणे आवश्यक आहे.
अ. दुसर्याच्या हितासाठी काही अपेक्षा न ठेवता कर्म करत राहिल्याने (कर्मयोग) निष्कामतेमुळे कर्मात प्रकृती उणावत जाते आणि मनुष्य प्रकृतीविषयी (जडाविषयी) उदासीन होत जातो. ‘शरिरासह प्रकृती नश्वर असून आपण नित्य चैतन्य आहोत’, हे विवेकाने जाणून तो मनाने प्रकृतीपासून (जडापासून) अलिप्त होत जातो (हा झाला ज्ञानयोग). भक्तीने ईश्वराशी अधिकाधिक जुळत गेल्याने त्याचा प्रकृतीशी (जडाशी) संबंध उणावत जातो (हा झाला भक्तीयोग).
आ. मनातले सर्व विचार थांबवून मन निर्विचार केल्याने जडाविषयी विचार न राहिल्याने जडाशी संबंध सुटत जातो. अशा रितीने चित्जड ग्रंथींमधील जड उणावत गेल्यास पुढे काय उरेल ? तर केवळ चैतन्य !
३. आत्मसाक्षात्कार होऊन मनुष्य जन्म-मरणाच्या फेर्यांतून मुक्त होण्याची प्रक्रिया
मनुष्य या स्थितीत स्थिरावला की, ईश्वर (चैतन्य) ते जाणतो. चैतन्याला जेव्हा जाणवते की, या मनुष्याची स्वरूपाला जाणण्याची पात्रता झाली आहे, तेव्हा ते चैतन्य स्वतःचे (आत्म्याचे, ईश्वराचे, ब्रह्माचे) स्वरूप त्या मनुष्यातील चैतन्याच्या अंशामध्ये, त्याच्या अंहमध्ये स्पष्ट करते. हे शाब्दिक ज्ञान नसून त्या अहंमध्ये स्वरूपाचाच बोध असतो, आत्मसाक्षात्कार असतो आणि मनुष्य जन्म-मरणाच्या फेर्यांतून मुक्त होतो.
श्री गुरुमाऊलींनी वरील लिखाण करून घेतले, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्री. अनिल विष्णु पाटील (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७७ वर्षे), नाशिक (१९.१२.२०२३)