पिंपरी (पुणे) शहरातील विनाअनुमती शाळांच्या दर्शनी भागात ‘विनाअनुमती शाळा’ असा नामफलक लावावा ! – शिक्षण विभागाचे आदेश
पिंपरी (पुणे) – शहरांमध्ये अनेक वर्षांपासून विनाअनुमती शाळा चालू आहेत. आता या शाळांना नोटीस देण्यासमवेत शाळांच्या दर्शनी भागांवर ‘अनधिकृत शाळा’ असा नामफलक लावण्याचे आदेश प्रशासन अधिकार्यांनी दिले आहेत. (विनाअनुमती शाळा चालू आहेत, हे सिद्ध होऊन केवळ नोटीस देण्याची कारवाई करण्यात येते. विनाअनुमती शाळा कायमच्या बंद करून शाळेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळावर पोलीस कारवाई केली पाहिजे ! – संपादक)
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शाळांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये ज्ञानराज माध्यमिक शाळा, कासारवाडी; मॉडर्न पब्लिक स्कूल, रहाटणी; माने इंग्लिश स्कूल, राजवाडेनगर काळेवाडी; काकाज इंटरनॅशनल स्कूल, काळेवाडी; होली मिशन इंग्लिश मिडियम स्कूल, नवी सांगवी; सेंट रोझरी स्कूल, चिखली आणि माऊंट एव्हरेस्ट स्कूल, कासारवाडी या शाळांचा समावेश आहे. या शाळांना नोटीस दिली होती; मात्र त्या नोटिसांकडे दुर्लक्ष करत या शाळा चालू आहेत.
शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे म्हणाले, ‘‘कोणत्याही परिस्थितीमध्ये महापालिका कार्यक्षेत्रांमध्ये विनाअनुमती शाळा चालू रहाणार नाही, याची सर्व विभागीय पर्यवेक्षकांना सूचना दिलेल्या आहेत. तरीही शाळा चालू राहिल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांचे दायित्व समजून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.’’
संपादकीय भूमिका :फलक लावून न थांबता या शाळा बंद होणे आणि संबंधितांवर कठोर कारवाई यांसाठी समयमर्यादाही घालणे आवश्यक आहे ! |