मुंबईतील महिला पोलिसांनी वरिष्ठांच्या लैंगिक अत्याचाराची मुख्यमंत्र्यांकडे केलेली तक्रार सर्वत्र प्रसारित !
पत्र बनावट असल्याचे मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण !
मुंबई – वरिष्ठांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात मुंबईतील महिला पोलिसांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली तक्रार २-३ दिवसांपासून विविध सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाली आहे. मुंबई पोलिसांच्या मोटर परिवहन विभागातील ८ महिला पोलिसांच्या नावासह मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्या नावे ही तक्रार करण्यात आली असून यामध्ये उपायुक्तांसह अन्य अधिकार्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुंबई पोलिसांनी मात्र हे पत्र बनावट असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
१. ५ जानेवारी या दिवशी हे पत्र सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाले आहे. विशेष म्हणजे या पत्रामध्ये तक्रारदार महिलांची नावेही आहेत. या पत्रामध्ये २ पोलीस निरीक्षक आम्हाला सरकारी वाहनातून घरी घेऊन गेले आणि उपायुक्तांसह अन्य अधिकार्यांनी आमच्यावर तेथे बलात्कार केला.
२. ‘पती, तसेच अन्य कुटुंबीय गावी असल्याने आम्ही महिला मुंबईत एकट्या रहातो. याचा अपलाभ घेऊन हे अधिकारी आम्हाला वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत आहेत. हे सर्व कायमचे थांबवण्यासाठी आम्ही उपायुक्तांची भेट घेतली; मात्र त्यांनी आम्हाला त्यांच्या कक्षामधून हाकलून दिले. आमच्यावरील अत्याचार एवढ्यावर थांबले नाहीत, तर उपायुक्तांचे ऑपरेटर, ऑर्डली आणि चालक यांनीही वेळोवेळी धमकावून अधिकार्यांच्या कार्यालयात आमच्यावर बलात्कार केला’, असे गंभीर आरोप या पत्रात करण्यात आले आहेत.
३. ज्या महिला पोलिसांची नावे पत्रात आहेत, त्यांनी ते लिहिलेले नसल्याचेही मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मुंबई पोलिसांची अपकीर्ती करण्यासाठी हा खोडसाळपणा करण्यात आला आहे. पत्रावरील महिला पोलीस कर्मचार्यांच्या स्वाक्षर्या बनावट आहेत. पत्र प्रसारित करणार्यांना शोध घेण्यात येत आहे, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका :या गंभीर प्रकाराची गृहखात्याकडून सखोल चौकशी व्हायला हवी ! |