भूमी गैरव्यवहारावरून छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अंबादास दानवे आणि हरिभाऊ बागडे आक्रमक !
छत्रपती संभाजीनगर – पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत ८ जानेवारी या दिवशी जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील अब्दिमंडी येथील कथित २५० भूमी गैरव्यवहारप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे आणि खासदार इम्तियाज जलील हे आक्रमक झाले. या सर्वांनी या भूमी घोटाळाप्रकरणी उपस्थित अधिकार्यांना जाब विचारला.
अंबादास दानवे म्हणाले की, २५० एकर निर्वासित मालमत्ता विकण्यात येते आणि ३ दिवसांत त्याचा फेरफारही करण्यात येतो. त्यामुळे हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे. यावरून जलील आक्रमक होऊन ‘याच बैठकीत संबंधित अधिकार्यांनी यावर खुलासा करावा’, अशी मागणी केली. यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करताच जलील आणि दानवे यांनी त्यांना थांबवून ‘अधिकार्यांना बोलू द्या’, असे म्हणत त्यांना शांत केले.