रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. गौरी कुलकर्णी यांना जाणवलेली सूत्रे
१. भावपूर्ण पूजा केली जात असल्यामुळे देवघरातील मूर्तीत जिवंतपणा जाणवून त्या चमकणे
१ अ. देवघरातील चकाकणार्या मूर्ती पाहून नातेवाइकाने ‘देवांच्या मूर्ती पितांबरीने घासता का ?’, असे विचारणे : ‘पुणे येथे माझ्या माहेरी देवघरात गणपति, बाळकृष्ण आणि श्री अन्नपूर्णादेवी यांच्या छोट्या मूर्ती आहेत. त्या मूर्ती चकचकीत आणि तेजस्वी दिसतात. माझ्या माहेरी आलेल्या एका नातेवाइकांनाही ‘या मूर्तींमध्ये काहीतरी विशेष आहे’, असे वाटले. त्यांनी त्या मूर्ती पाहून आईला विचारले, ‘‘तुम्ही देवांच्या मूर्ती पितांबरीने घासता का ?’’ तेव्हा आईने उत्तर दिले, ‘‘आम्ही मूर्ती घासत नाही. केवळ दैनंदिन पूजा करतो.’’
१ आ. ‘देवाप्रती असलेल्या भावामुळे मूर्तींमध्ये जिवंतपणा जाणवतो’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे : घरी आई किंवा बाबा प्रतिदिन पूजा करतात. आईची (सौ. स्नेहल सहस्रबुद्धे यांची) आध्यात्मिक पातळी ६५ टक्के आहे. बाबाही अतिशय मन लावून पूजा करतात. ‘आई-बाबांचा देवाप्रती भाव असल्यानेच देवघरातील मूर्ती चकाकत आहेत’, असे मला जाणवले. त्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘त्या दोघांमधील भावामुळे मूर्तींमध्ये जिवंतपणा आला आहे.’’
२. राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित लिखाण अन् साधनेविषयीचे लिखाण यांत जाणवलेला भेद !
मागील काही वर्ष मी पुणे येथे दैनिक ‘सनातन प्रभात’साठी वार्ताकनाची सेवा करत होते. सध्या साप्ताहिक सत्संगांच्या संहितांच्या लिखाणाच्या संदर्भातील सेवा करत आहे. या दोन्ही सेवा लिखाणाशीच संबंधित असल्या, तरी आता मला दोन्ही प्रकारच्या लिखाणांत भेद जाणवतो. ‘आजूबाजूला घडणार्या घटनांवरील वार्ता किंवा तात्कालिक विषयांवर राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून काही लिखाण करणे अन् सत्संगांसाठी सनातनच्या ग्रंथांतील लिखाण करणे’ यांत मला पुढील भेद जाणवला.
अ. राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित विषय जाज्वल्य असले, तरी ते लिखाण तात्कालिक असते, तर संतांचे लिखाण शाश्वत असते. ते वाचक आणि जिज्ञासू यांना थेट ईश्वराशी जोडते. त्यामुळे साधनाविषयक लिखाण किंवा त्याविषयी केलेला अभ्यास यांमुळे ‘मन आणि बुद्धी यांची शुद्धी होत आहे’, असे मला जाणवते.
आ. पूर्वी ‘काही तरी शाब्दिक कोट्या करून किंवा शब्दांची जुळवाजुळव करून लिखाण करणे, म्हणजे चांगले लिखाण करणे’, असे मला वाटायचे. आता शब्दांच्या कसरती न करता ‘वाचकाला समजेल’, अशा सोप्या भाषेत लिहायला हवे’, असे मला वाटते.
इ. परात्पर गुरु डॉक्टर नेहमी सांगतात, ‘लेखन करणार्याची साधना असेल, तर त्याचा वाचकांवर परिणाम होतो.’ काही वेळा हे अनुभवता येऊन पुन्हा साधनेचे महत्त्व मनावर बिंबते.
३. ‘देवतांच्या आगमनाच्या प्रसंगी त्यांच्या स्वागतासाठी घंटा वाजवली जाते’, असा विचार मनात येणे आणि तेवढ्यात परात्पर गुरु डॉक्टरांचे आगमन होणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या आरंभी ‘शंख आणि घंटा यांच्याकडे पाहून काय जाणवते ?’, याचा सूक्ष्म प्रयोग घेण्यात आला. त्या दोन्हींकडे पाहून मला पुष्कळ चांगले वाटत होते. घंटेकडे पहात असतांना ‘देवतांच्या आगमनाच्या प्रसंगी त्यांच्या स्वागतासाठी घंटा वाजवली जाते’, असा विचार माझ्या मनात आला आणि तेवढ्यात परात्पर गुरु डॉक्टरांचे आगमन झाले. तेव्हा एक प्रकारे ‘परात्पर गुरु डॉक्टरांमधील देवत्वाची प्रत्यक्ष प्रचीतीच आली’, असे मला वाटले.’
– सौ. गौरी नीलेश कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.