साधिकेकडून विविध देवतांना आपोआप होणार्या वैशिष्ट्यपूर्ण प्रार्थना आणि तिला आलेली अनुभूती
‘वर्ष २०१९ पासून माझ्याकडून देवाला प्रार्थना न होता कृतज्ञताच व्यक्त व्हायची. मागील ८ ते १० मासांपासून काही प्रसंगांत मी आपणहून प्रार्थना करत नाही; मात्र माझ्याकडून पुढीलप्रमाणे काही प्रार्थना आपोआप होतात.
१. प्रार्थना
१ अ. घरी उदबत्तीने शुद्धी करतांना : ‘हे श्रीमन्नारायणा, या उदबत्तीच्या तेजाने अखिल ब्रह्मांडाची शुद्धी होऊ दे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या ईश्वरी राज्याच्या स्थापनेच्या कार्यात येणारे अनिष्ट शक्तींचे सर्व अडथळे या तेजाने नष्ट होऊ देत.’
१ आ. श्रीरामाला नमस्कार करतांना – ‘हे श्रीरामा, तुझ्या ब्रह्मांडनाडीशी माझी जीवनाडी एकरूप करून घे.’
१ इ. श्री सिद्धिविनायकाला नमस्कार करतांना – ‘हे श्री सिद्धिविनायका, तुझ्या तेजोमय बुद्धीने या जिवाच्या बुद्धीची शुद्धी होऊ दे आणि ती तुझ्या बुद्धीशी एकरूप होऊ दे.’
१ ई. रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षातील सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या छायाचित्रास नमस्कार करतांना : ‘प.पू. गुरुदेवा, आपण सच्चिदानंद परब्रह्म आहात. आपण मला आत्मानंदाची अनुभूती दिली आहे. ‘आपणच मला परमानंदाकडे नेत आहात’, यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.
१ उ. श्री दत्तमाला मंत्रपठण करतांना : ‘हे श्री दत्तगुरु, या मंत्रपठणाच्या माध्यमातून माझी वाणी आणि श्वास आपल्या चरणी समर्पित करून घ्या’, अशी आपल्या चरणी शरणागतीने प्रार्थना आहे.’
अशा प्रकारे माझ्याकडून विविध देवतांना प्रार्थना होते.
१ ऊ. ‘हे भगवंता, तू माझा श्वास आहेस आणि तुझे नाम घेतल्यानंतर सोडलेला उच्छ्वास ही तुझ्याप्रतीची कृतज्ञता आहे.’
२. साधिकेच्या मनात अनेक देवतांना प्रार्थना करण्याविषयी प्रश्न निर्माण होणे आणि तिला त्याचे उत्तर सूक्ष्मातून मिळणे
एकदा मी श्रीमन्नारायणाला शरण जाऊन सूक्ष्मातून विचारले, ‘भगवंता, मला तर साधनेत अनेकातून एकात जायचे आहे. असे असतांना वेगवेगळ्या देवतांना प्रार्थना करून हे कसे साध्य होणार ?’ तेव्हा श्रीमन्नारायणाने मला सूक्ष्मातून पुढीलप्रमाणे उत्तर दिले,
‘आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम् ।
सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति ।।
अर्थ : ‘आकाशातून पडणारे पावसाचे पाणी ज्याप्रमाणे शेवटी सागरालाच जाऊन मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला नमस्कार केला, तरी तो त्या केशवाला, म्हणजे परब्रह्मालाच पोचतो.’
या वचनानुसार ‘तू कोणत्याही देवतेला भावपूर्ण नमस्कार किंवा प्रार्थना केलीस, तरी ती माझ्यापर्यंत पोचणार आहे.’ तेव्हापासून सर्व देवतांच्या प्रती माझ्या मनात अत्यंत कृतज्ञताभाव निर्माण झाला आहे.’
– श्री गुरुचरणी शरणागत,
अश्विनी अनंत कुलकर्णी, फोंडा, गोवा. (२२.८.२०२३)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |