२ दंतवैद्यांनी उपचार करूनही दातांच्या संदर्भातील त्रास दूर न होणे; मात्र मंत्रोपचाराने १५ दिवसांतच दातांच्या संदर्भातील त्रास दूर होऊन मंत्रातील सामर्थ्याची प्रचीती येणे
१. जेवतांना अन्नपदार्थासह एक टोकदार वस्तू हिरडीत घुसून रक्त येणे आणि दाढ सुजणे
‘एकदा मी एका लग्नसमारंभाला गेलो होतो. तेव्हा तेथे जेवत असतांना एका पदार्थासह एक टोकदार वस्तू माझ्या तोंडात गेली आणि ती वस्तू हिरडीत घुसून रक्त येऊ लागले. मी ती वस्तू लगेच बाहेर काढली; पण त्यानंतर दुसर्या दिवशी माझ्या उजव्या बाजूची दाढ सुजून मला पुष्कळ वेदना होऊ लागल्या. माझ्या तोंडवळ्याचा उजव्या बाजूचा भाग सुजून माझा उजवा डोळा बंद झाला.
२. दोन दंतवैद्यांनी उपचार करूनही हिरडीतील पू नाहीसा न होणे आणि पुष्कळ दिवस द्रवरूप आहार घेत असल्याने वजन घटणे
मी आधुनिक वैद्यांकडे गेलो असता त्यांनी मला दंतवैद्यांकडे जाण्याचा समादेश (सल्ला) दिला. त्यानंतर मी कोपरगाव येथील सनातनच्या साधिका दंतवैद्या (सौ.) ज्योती राठी यांच्याकडे उपचारांसाठी गेलो. माझ्या उजव्या बाजूच्या हिरडीत पू झाला होता. दंतवैद्यांनी २ वेळा उपचार करूनही माझ्या हिरडीतील पू निघाला नाही. त्यानंतर दंतवैद्या (सौ.) राठी यांच्या सांगण्यानुसार मी दुसर्या दंतवैद्यांकडे पुढील उपचार चालू केले. त्या दंतवैद्यांनी २ वेळा उपचार करूनही माझ्या हिरडीतील पू पूर्णपणे निघाला नाही. या प्रक्रियेत २ मास निघून गेले. या कालावधीत मी केवळ द्रवरूप आहार घेत असल्याने माझे वजन ११ किलोंनी घटले होते.
३. दातांच्या संदर्भातील त्रास दूर होण्यासाठीचा मंत्रजप करणे
३ अ. मंत्रजप केल्यावर दाढदुखी नाहीशी होऊन १५ दिवसांत वजन वाढणे : परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दातांच्या संदर्भातील त्रास नाहीसा होण्यावर सांगितलेला मंत्रजप मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील साधकांना विचारला. भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने मला मंत्रजप मिळाला. हा मंत्रजप करतांना मला पेलाभर पाण्यात हाताची बोटे बुडवून ते पाणी प्यायला सांगितले होते. मी पाण्यात हाताची बोटे बुडवून ‘ॐ कौङ् कौमारीभ्यान् नमः ।’ हा मंत्रजप करतांना पाणी उष्ण होत असल्याचे मला जाणवायचे. त्यातील अर्धे पाणी पिऊन शेष पाणी मी सर्वांगाला लावत होतो. या उपायामुळे मला होणारा दातांचा त्रास पूर्णपणे दूर झाला आणि १५ दिवसांत माझे वजन ८ किलोंनी वाढले.
३ आ. मंत्रजप केल्यावर दातांतील पू नाहीसा होऊन तीव्र दाढदुखीचा त्रास दूर झाल्याचे समजल्यावर दंतवैद्यांना पुष्कळ आश्चर्य वाटणे : त्यानंतर मी पूर्वी उपचार घेत असलेल्या दंतवैद्यांकडे जाऊन दातांची पडताळणी केली असता हिरड्यांतील पू नाहीसा झाल्याचे लक्षात आले. त्या वेळी दंतवैद्यांनी मला विचारले, ‘‘हे कसे झाले ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘मंत्रोपचार केल्यामुळे दातांतील पू नाहीसा झाला आणि दात दुखणे अन् सूज येणे बंद झाले. मला आता व्यवस्थित जेवता येऊ लागल्याने माझे वजनही वाढले आहे.’’ तेव्हा दंतवैद्यांना याचे पुष्कळ आश्चर्य वाटले. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ‘रुट कॅनल’ (दाताच्या मुळाशी असलेली पोकळी स्वच्छ करण्याचा उपचार) करून नवीन दात बसवले आहेत.
‘हे श्रीकृष्णा आणि प.पू. गुरुमाऊली, मला होत असलेला तीव्र त्रास मंत्रजपामुळे ठीक झाला. आपणच मला ‘मंत्रांमध्ये किती सामर्थ्य असते !’, याची जाणीव करून दिलीत, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. धनंजय काळुंगे, पिंपळस, नाशिक. (१.८.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |