प्रेमभाव, नीटनेटकेपणा आणि सतत कृतज्ञताभावात असणार्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) सुलोचना जाधवआजी (वय ७७ वर्षे) !
‘२०.१०.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील कै. (सौ.) सुलोचना जाधवआजी (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७७ वर्षे) यांचे निधन झाले. मी वैद्य असल्यामुळे गेल्या दोन वर्षांत माझा सौ. सुलोचना जाधवआजींशी अनेकदा संपर्क आला. गुरुदेवांच्या कृपेने त्यांची काही प्रमुख गुणवैशिष्ट्ये माझ्या लक्षात आली. ती मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.
१. प्रेमभाव
‘कै. (सौ.) जाधवआजींमध्ये पुष्कळ प्रेमभाव होता. त्यांच्या बोलण्यातूनही त्यांचा प्रेमभाव जाणवायचा.
२. नीटनेटकेपणा
आजींमध्ये पुष्कळ नीटनेटकेपणा होता. त्यांनी त्यांच्या साडीचा पदर डोक्यावरून घेतलेला असायचा. तो कधीच खाली यायचा नाही.
३. कृतज्ञताभाव असणे
वयाच्या मानाने त्यांना काही ना काही शारीरिक त्रास होत असत. त्यांनी मला त्यांचे त्रास सांगितल्यानंतर त्यांना ‘मी यांना (साधिकेला) पुष्कळ त्रास देते’, असे वाटायचे. ‘गुरुमाऊलींमुळे तुमच्यासारखे वैद्य आश्रमात आहेत’, असे त्या मला सांगत असत. त्याविषयी त्यांना कृतज्ञता वाटत असे.
४. श्री. नेताजी जाधवआजोबा (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ८३ वर्षे) आणि सौ. सुलोचना जाधवआजी या उभयतांना एकमेकांच्या भावना न बोलताही कळत असणे
मागील वर्षी आजींच्या पोटाचे शस्त्रकर्म झाले होते. त्या वेळी आजींना पुष्कळ शारीरिक त्रास होत होता. तेव्हा आजोबा आजींची काळजी घेत होते. आता आजोबांना गुडघ्यामुळे त्रास होत होता, तर आजी त्यांची काळजी घेत होत्या. दोघांच्या प्रेमामधील ‘निरपेक्षता आणि निर्मळता’ वेगळीच होती. ‘त्या दोघांना एकमेकांच्या भावना न बोलताही कळत होत्या’, असे लक्षात यायचे.
५. या वयातही आजोबांची सेवा करणे
सध्या जाधवआजोबांना गुडघ्यांच्या त्रासामुळे चालता येत नव्हते आणि आजींचे वयही पुष्कळ (७७ वर्षे) होते, तरीही त्या आजोबांसाठी प्रतिदिन प्रसाद आणि महाप्रसाद खोलीवर नेऊन देत असत. यामध्ये त्यांना ‘‘काही साहाय्य हवे का ?’’, असे विचारल्यावर ‘‘मला जोपर्यंत करता येते, तोपर्यंत मी करते’’, असे आनंदाने सांगत असत. त्यांना ‘आपल्याला कधी कुणी साहाय्य करावे’, असे वाटत नसे.
६. आजींच्या निधनानंतर
अ. आजींचा मृत्यू अगदीच अनपेक्षित आणि ध्यानी-मनी नसतांना झाला.
आ. ‘चालता-बोलता मरण यावे’, असे आजींना नेहमी वाटत होते. त्यांना तसाच मृत्यू आला. जणू देवानेच त्यांची इच्छा पूर्ण केली.
इ. ‘आजी अजूनही आश्रमात आहेत’, असेच मला वाटते.
७. आजींचा मृतदेह पहातांना जाणवलेली सूत्रे
एरव्ही सामान्य व्यक्तीचा मृतदेह किंवा मृत व्यक्तीचा चेहरा काही घंट्यांनंतरच काळवंडलेला दिसतो. देहाजवळ जायला भीती वाटते किंवा एक प्रकारचा दाब जाणवतो. मी आजींचा मृतदेह त्यांच्या मृत्यूनंतर साधारण २० घंट्यांनंतर पाहिला. तेव्हा जाधवआजींविषयी मला असे काही न जाणवता पुढीलप्रमाणे जाणवले.
अ. ‘आजी झोपलेल्या असून त्यांचा श्वास चालू आहे’, असे मला जाणवत होते.
आ. त्यांचा चेहरा पुष्कळ तेजस्वी दिसत होता.
इ. त्यांच्या चेहर्यावरील भाव शांत आणि स्थिर होते.
ई. त्यांची त्वचा पिवळसर रंगाची दिसत होती.
उ. ‘आश्रमामध्ये कुणाचा तरी मृत्यू झालेला आहे’, असे मला जाणवत नव्हते.
‘आजींमधील हे गुण आम्हा साधकांमध्ये येवोत’, हीच गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी प्रार्थना ! ‘अशा आजी आम्हाला जवळून अनुभवता आल्या’, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
।। श्री गुरुचरणार्पणमस्तु ।।
– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |