Fence Indo-Myanmar Border:भारत-म्यानमार सीमेवर कुंपण घालण्यास मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध : ‘मैतेई हेरिटेज सोसायटी’कडून निषेध !
नवी देहली – मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस्. जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देहलीत झालेल्या बैठकीत भारत-म्यानमार सीमेवर कुंपण घालण्यास विरोध दर्शवल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. याविषयी ‘मैतेई हेरिटेज सोसायटी’ने मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचा तीव्र निषेध केला आहे. ‘सीमेवर कुंपण घालणे, हे मिझोरामच्या हिताविरुद्ध असल्याचा लालदुहोमा यांचा दावा धक्कादायक आहे’, असे ‘मैतेई हेरिटेज सोसायटी’ने म्हटले आहे.
‘मैतेई हेरिटेज सोसायटी’ने पुढे म्हटले आहे की,
१. चीन, कुकी आणि झो हे बंडखोर गट भारताच्या ईशान्येकडील म्यानमार आणि बांगलादेश यांच्या काही भागाचा लचका तोडून तथाकथित झालेंगम, कुकीलँड किंवा झोलँड नावाचा स्वतंत्र देश बनवण्यासाठी लढत आहे.
२. लालदुहोमा यांनी केलेले विधान भारताच्या प्रादेशिक अखंडता भंग करणारे आणि भारतविरोधी कारवायांचे थेट समर्थन करणारे आहे. त्यांचा दावा राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे.
३. सीमेवर कुंपण नसल्यामुळे म्यानमारमधून शरणार्थी अवैधरित्या भारतात येत असून अमली पदार्थांची तस्करी होत आहे. ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’देखील म्यानमारच्या लोकांचे भारतात स्थलांतर होण्यास कारणीभूत आहे. मणिपूरमध्ये चालू असलेल्या संघर्षाचे मूळ कारणदेखील त्यामध्ये दडलेले आहे.
४. मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी त्यांची देशविरोधी विधाने मागे घ्यावीत आणि ‘सीमा कुंपण प्रकल्प’ यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारसमवेत काम करावे, अशी मागणी ‘मैतेई हेरिटेज सोसायटी’ने केली आहे.
मिझोरामध्ये सवादोन वर्षांत म्यानमारचे ५३ सहस्र ५०० शरणार्थी भारतात आले ! – संयुक्त राष्ट्रे‘संयुक्त राष्ट्र शरणार्थी उच्चायुक्तां’नी त्यांच्या मे २०२३ मधील अहवालात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२१ ते मे २०२३ या सवादोन वर्षांच्या कालावधीत ५३ सहस्र ५०० म्यानमारचे शरणार्थी भारतात आले. यांतील अनेक शरणार्थींनी विविध अवैध मार्गांनी भारतीय ओळख दस्तऐवज बनवले असून ते भारतीय नागरिक बनले आहेत. ही फसवणूक थांबवण्याची नितांत आवश्यकता आहे. सीमेवर कुंपण घालणे महत्त्वाचे आहे. |
संपादकीय भूमिकाआता केंद्र सरकारनेच देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी भारतियांची अपेक्षा आहे ! |