२८ जानेवारीला कोल्हापूर येथे शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन ! – राजेश क्षीरसागर
कोल्हापूर – शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापूर येथे होत आहे. त्या अंतर्गत २७ जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा होत आहे, तर २८ जानेवारीला कोल्हापूर येथे शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या दौर्याच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकार्यांची नियोजन बैठक राजर्षि शाहू स्मारक भवन येथे पार पडली. ते त्या प्रसंगी बोलत होते.
श्री. राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांचे राज्यभर १६ पदाधिकारी मेळावे पार पडणार आहेत. शिवसेनेचे सर्व खासदार पुन्हा निवडून आणण्याच्या उद्देशाने हे मेळावे घेण्यात येणार आहेत. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमानंतर लगेचच पदाधिकार्यांचा मेळावा मी यशस्वी केला. आगामी कार्यक्रम महत्त्वाचा असून शिवसेना पक्षाला नवी दिशा देणारा आहे.’’
या वेळी महानगरप्रमुख श्री. शिवाजी जाधव, शहरप्रमुख श्री. रणजीत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यास शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. किशोर घाटगे, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, उत्तर शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर यांसह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.