संपादकीय : धर्मतेजाचे किरण !
पाकिस्तानमध्ये ईशनिंदा करणार्यांना फाशीची शिक्षा दिली जाते. ईशनिंदा, म्हणजे अल्ला, महंमद पैगंबर, कुराण आदी इस्लामच्या श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला, तर त्याला कायद्यानुसार फाशी दिली जाते; मात्र काही प्रसंगांत पाकिस्तानमध्ये मुसलमानांनी कायदा हातात घेऊन थेट संबंधिताला ठार केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पाकिस्तान ‘इस्लामी देश’ आहे. तेथे इस्लामला महत्त्व दिले जात असल्याने ईशनिंदेसारखा कायदा करण्यात आला आहे. पाकिस्तान भारताचा शेजारी आहे. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. भारतात कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्यास ‘कलम २९५ अ’ अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याच्यावर कारवाई केली जाते. या अंतर्गत दोषी ठरणार्याला ३ वर्षांचा कारावास आणि दंड, अशी शिक्षा होऊ शकते; मात्र आतापर्यंत अशी कुणाला शिक्षा झाली आहे, असे ऐकिवात नाही. भारतात गेल्या काही वर्षांत विशेषतः हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात येत असल्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत आणि आजही घडत आहेत. केवळ व्यक्तीच नव्हे, तर सरकारकडूनही अशा घटना घडल्या आहेत; मात्र त्यांच्यावर गुन्हा नोंद होण्याच्या पलीकडे काही विशेष घडत नाही. काँग्रेसचे सरकार असतांना रामसेतू तोडण्याच्या संदर्भातील याचिकेवर ‘राम काल्पनिक होता’, असे सर्वाेच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सांगण्यात आले होते. ज्या देशाचे आराध्य दैवत श्रीराम आहेत, त्यांच्याविषयी असे आणि तेही सर्वाेच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सांगणे, हा हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा सर्वांत मोठा अपराध होता; मात्र याविषयी ना सरकारवर गुन्हा नोंद झाला, ना सरकारला कुणी जाब विचारला. काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या धार्मिक भावनांच्या संदर्भात अनेक गोष्टी घडल्या आहेत, हा इतिहास आहे. हिंदूंच्या देवतांच्या अवमानाचे प्रकार आजही चालू आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, द्रविड मुन्नेत्र कळघम्, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आदी पक्षांच्या नेत्यांकडून, तसेच साहित्यिक, चित्रपट निर्माते, अभिनेते आदींकडूनही हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जातो. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य हे हिंदूच आहेत, तर काही प्रमाणात अन्य धर्मीय आहेत. असे असतांना त्यांच्यावर कारवाई होतांना दिसत नाही. स्वामी प्रसाद मौर्या हे समाजवादी पक्षाचे नेते सातत्याने हिंदु धर्माचा अवमान करत आहेत; मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही. हिंदूही दबाव निर्माण करण्यास अल्प पडत असल्याचेही दिसून येते. हिंदु धर्मांध होऊ शकत नाही; मात्र किमान धर्माभिमानी होऊन त्यानुसार धर्माच्या रक्षणासाठी काम करणे आवश्यक आहे. तसे असते, तर देशात थेट फाशी नाही, तर किमान कठोर कायदा तरी झाला असता आणि अशा लोकांवर तातडीने कारवाई झाली असती. देशात अशी स्थिती असतांना याला काही अपवादही आहेत. काही हिंदु संघटना धर्माच्या अवमानाच्या विरोधात वैध मार्गाने कृती करून तो रोखण्यात यश मिळवत असल्याचेही दिसून येते. काही धर्माभिमानी प्रखरपणे विरोध करतात. हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने देशभरात मोठे आंदोलन उभारले. हुसेन यांच्या विरोधात १ सहस्र २५० तक्रारी प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्या, तर ५ ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले. यामुळे हुसेन भारत सोडून कतार या इस्लामी देशात पळून गेले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. हे एक मोठे यश मिळाले.
रामद्वेष्ट्यांना चपराक !
हिंदूंकडून विरोध करण्याची अन्यही काही उदाहरणे आहेत. नुकतेच ‘मुंबई तरुण भारत’ या मराठी दैनिकाचे संपादक किरण शेलार यांना ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार’ घोषित करण्यात आला. मुंबईत एका कार्यक्रमात दैनिक ‘देशोन्नती’चे संपादक प्रकाश पोहरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार होता; मात्र याच कार्यक्रमात किरण शेलार यांनी पोहरे यांच्या हस्ते पुरस्कार घेण्यास नकार दिला. पोहरे यांनी ‘राम काल्पनिक होता’, असे म्हटले होते. यामुळेच किरण शेलार यांनी त्यांच्या हस्ते पुरस्कार घेण्यास नकार दिला आणि तेथे उपस्थित लोकांनी त्याचे प्रचंड स्वागत केले. अशी घटना भारतात कधी घडल्याचे दिसत नाही; कारण ज्या राजकीय नेत्यांनी आजन्म हिंदु धर्म, देवता, श्रद्धा आदींच्या विरोधात विधाने केली, कायदे केले, त्यांच्या हातून मोठमोठ्या व्यक्तींनी मोठमोठे पुरस्कार स्वीकारले आहेत; मात्र यातील एकही माईचा पूत समोर आला नाही की, त्याने हिंदु धर्माच्या अवमानावरून त्यांच्याकडून पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे किरण शेलार यांची ही कृती पुष्कळ मोठी आणि आदर्शवत् आहे. असे धाडस तीच व्यक्ती करू शकते, जिची श्रीरामावर, हिंदु धर्मावर आणि आपल्या श्रद्धास्थानांवर नितांत श्रद्धा आहे. अशी व्यक्ती समोर किती मोठी व्यक्ती आहे, त्यापेक्षा तिने हिंदु धर्माचा मान राखला आहे कि नाही ? हे पाहून तिच्याशी व्यवहार करू शकते. जर देशातील प्रत्येक धर्माभिमानी हिंदूने, प्रत्येक भक्ताने अशी कृती केली, तर देशात मोठा दबाव निर्माण होऊन धर्मद्रोह्यांना त्यांची लायकी लक्षात येईल. पत्रकारितेमध्ये ही शक्ती आहे की, ती समाजाला योग्य दिशा देऊन चळवळ निर्माण करू शकते. लोकमान्य टिळक हे त्यासाठीचे आदर्श आहेत; मात्र आज पत्रकारितेमध्ये मिंध्यांचीच संख्या अधिक असल्याने त्यात किरण शेलार यांनी ‘आपण वेगळे आहोत’, हे दाखवून दिले आहे. पत्रकार स्वतःला निधर्मी, पुरो(अधो)गामी आदी म्हणवून घेण्यात अधिक धन्यता मानतात, अशांना ही चपराक आहे. हे धर्मतेजाचे एक किरण आहे. याचा प्रकाश अधिक प्रखर होणे आवश्यक आहे. या प्रखरतेपुढे हिंदुद्वेषी, हिंदुद्रोही आदी जळून नष्ट झाले पाहिजेत. अशांना भारतात कोणतेही स्थान असणार नाही, हे त्यांना स्पष्ट झाले पाहिजे.
आपल्या जीवनात ‘राम’ आणा !
सध्या देशात ‘राम’ आलेला आहे. कुठल्याही गोष्टीत ‘राम’ असल्यासच ती गोष्ट अधिक चैतन्यमय आणि चांगली वाटते, हे भारतातील नागरिकच नव्हे, तर संपूर्ण जग पहात आहे. देशात स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षांत इतका आनंद, इतका भाव दिसून आला नव्हता, तो आता श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिसून येत आहे. याच ‘रामा’ला आता देशात कायम ठेवत त्याला अधिकाधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ‘ज्यात राम नाही, जो रामाला मानत नाही, ती गोष्ट, ती व्यक्ती आता देशात चालणार नाही’, हे सर्वांना कळले पाहिजे. त्यासाठी श्रीरामाच्या जीवनाचा आदर्श घेत जीवन जगले पाहिजे, तरच आपल्याही जीवनात ‘राम’ येईल !
हिंदुद्वेष्ट्यांना योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे धडा शिकवणारे संपादक किरण शेलार यांचे अभिनंदन ! |