अलिबाग आणि पर्यटन व्यवसायाचे भविष्य !
मला कामानिमित्त अलिबागमध्ये येऊन दीड मास झाला. आमच्या संस्थेच्या वतीने येथील १० गावांमध्ये पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, जैवविविधता अशा विविध पैलूंवर आम्हाला या गावांमध्ये काम करायचे असल्याने गावात फिरणे चालू आहे. या दीड मासात त्या निमित्ताने मला हा परिसर अगदी जवळून पहाता येत आहे. येथे पर्यटन हा सर्वांत मोठा उद्योग आहे. ज्यावर येथील ७५ ते ८० टक्के स्थानिक अवलंबून आहे. जवळपास ९० टक्के घरांमध्ये हा व्यवसाय चालतो. याखेरीज याच उद्योगामुळे येथील मासेमार समाजाचेही भरण पोषण होते आहे; कारण पकडून आणलेले मासे विकायला फार लांब जावे लागत नाही. येथील खाड्या बहुतांशी रासायनिक सांडपाणीविरहित जरी दिसत असल्या, तरी शहरात मात्र बहुतांशी सांडपाणी आणि घरघुती कचरा खारफुटीमध्येच टाकला जात आहे.
१. पर्यटन व्यवसायामुळे भूजल साठ्यांवर पुष्कळ मोठा ताण !
येथे कोणत्याही इतर वनस्पतींपेक्षा खारफुटी सर्वाधिक प्रमाणात आढळते. किंबहुना संपूर्ण अलिबागच पाणथळ भूमी आणि खारफुटी यांनी वेढलेले आहे. येथे माणसाला रहाण्यायोग्य आणि शेती करण्यायोग्य अशा थोड्याच भूमी आहेत. याखेरीज बहुतांश भूमी या सखल असल्याने खाडी समुद्राचे पाणी परिसरात दूरवर पसरते, ज्यामुळेच येथील बहुतांशी भूजल खारे आणि फार थोडे भूजल पिण्यायोग्य आहे. पर्यटन व्यवसायामुळे या भूजल साठ्यांवर आधीच पुष्कळ मोठा ताण असून ते वेगवान गतीने उपसले जाते आहे. भूजल उपसण्याचा वेग असाच चालू राहिल्यास लवकरच ते न्यून झाल्याने या रिकाम्या झालेल्या भूजलाची जागा समुद्राचे खारे पाणी घेईल, असे मला वाटते. यासाठी यावर अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे.
२. प्रकल्पातून उडालेल्या राखेमुळे होणारे परिणाम !
येथील अनियंत्रित पर्यटनाच्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये येथील हवेची गुणवत्ता पुष्कळ मोठ्या प्रमाणात ढासळते. तसेच दूरवर उभ्या असलेल्या एका प्रकल्पातून उडालेली राख संध्याकाळी वारे समुद्राकडे वाहायला लागल्यावर संपूर्ण परिसरात पसरते. ज्यामुळे रात्रीच्या वेळी फेरफटका मारतांना समुद्राच्या अगदी जवळ असूनही घसा कोरडा पडतो. त्या राखेत मोठ्या प्रमाणात जड धातू असल्याने त्यामुळे परिसरात कर्करोगाचे प्रमाण वाढले असावे, असा अंदाज आहे. ज्यासाठी नगरपालिका, गावे इत्यादी स्तरावर कर्करोगाचे रुग्ण किती आहेत ? याचा अंदाज घेऊन योग्य ती पाऊले उचलता येतील. सध्या तरी ही राख येथील परिसरातील नारळी पोफळीच्या पानावर सहज पहाता येते. या राखेमुळे केवळ माणसांनाच त्रास होतो, असे नाही; पण राख नारळीच्या फुलांतील चिकट स्त्री केसरावर चिकटल्याने स्त्री केसर कोरडा पडतो, ज्यामुळे परागीभवन प्रक्रियेत अडथळा येत असून नारळीच्या उत्पन्नातही घट होते.
३. ‘विरार-अलिबाग सुसज्ज महामार्गा’च्या माध्यमातून दुष्परिणाम होण्याची शक्यता !
लवकरच ‘विरार-अलिबाग सुसज्ज महामार्ग’ होणार आहे, ज्यामुळे या समस्या अधिक वाढण्याचा संभव आहे. उद्या हा महामार्ग चालू झाल्यास मुंबईहून अलिबागमध्ये अगदी सहज येता येईल, ज्यामुळे येथे येणार्या पर्यटकांची वर्दळ आजपेक्षा ५ पटीने वाढेल. तसे झाले, तर अलिबागमधील सर्वांत पहिले नैसर्गिक स्रोत असलेले भूजल झपाट्याने संपून जाईल. याखेरीज मोठ्या प्रमाणात परिसरात असलेल्या शेती, वाड्या यांमध्ये मोठमोठ्या बांधकाम प्रकल्पांना उधाण येईल, ज्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भूमीवर सिमेंट ओतले जाईल, ज्यामुळे आधीच अल्प असलेल्या भुजलाचे पुनर्भरण होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर थांबून जाईल. याखेरीज येथील खारफुटीवर अतिक्रमण वाढेल, ज्यामुळे परिसरात अतीवृष्टी वा मोठ्या भरतीचे पाणी समुद्रात वाहून जाण्याची प्रक्रिया थांबल्याने पुराच्या समस्या वाढणार आहेत.
४. मानवी मैला आणि घनकचरा यांचा मानवासह समुद्रातील माशांवर होणारा दुष्परिणाम !
पाठोपाठ मोठ्या प्रमाणावर मुंबईतून प्रतिदिन पर्यटक आल्याने आणि परिसर मुंबईच्या अगदी जवळ असल्याने इथे लोकवस्ती वाढेल, ज्यामुळे मानवी मैला, घनकचरा येथील खाड्यांमधे फेकला जाईल. परिणामी इंचाइंचावर जीवनाने भरलेली खारफुटी फक्त झाडांचा समूह मात्र रहाणार आहे. ज्यामुळे येथे सापडत असलेले खेकडे, निवट्या, कालवे इतर सर्व सजीव नष्ट होऊन अलिबागची बाग मृत होईल. या मृत बागेतून मोठ्या प्रमाणात मानवी मैलावाने इतर घनकचरा गेल्याने परिसरात त्याची दुर्गंधी वाढेल, तसेच इथून पुढे हा मैला समुद्रात गेल्याने तेथील मासेमारीही संपुष्टात येईल. ज्यामुळे अलिबागचे पर्यटन त्यावर अवलंबून असलेले रोजगार फार काळ टिकणार नाहीत, अशी भीती आहे.
– प्रा. भूषण विलास भोईर, एम्.एस्सी. ओशनोग्राफी (समुद्रशास्त्र), आणि ‘झूलॉजी’ (प्राणीशास्त्र), जिल्हा पालघर.