Revival of Sanskrit : संस्कृत शब्दकोश प्रकल्पाचे केंद्र सरकारच्या साहाय्याने पुनरुज्जीवन होणार !
प्रकल्पासाठी केंद्रीय संस्कृत विद्यापीठ आणि डेक्कन महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार !
पुणे – डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापिठात मागील ७५ वर्षे चालू असलेल्या संस्कृत शब्दकोश प्रकल्पाचे केंद्र सरकारच्या साहाय्याने पुनरुज्जीवन होणार आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापिठांसह अन्य विद्यापिठांकडून या प्रकल्पासाठी सहकार्य दिले जाणार असून प्रकल्पासाठी २९ पदे भरणार आहेत. आतापर्यंत डिजिटायझेशन केलेली कागदपत्रे, कोशाचे खंड संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. संस्कृत शब्दकोश प्रकल्पासाठी केंद्रीय संस्कृत विद्यापीठ आणि डेक्कन महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार झाला. संस्कृत शब्दकोश प्रकल्पाचे काम मोठे असून पुढील २ मासांत हा कोश सर्वसामान्यांना पहाता येणार आहे.
डेक्कन महाविद्यालय देशभरातील संस्कृत विभागांना यासाठी मार्गदर्शन करील. विद्यार्थ्यांना कार्य प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम निर्माण केला जाईल. केंद्रीय संस्कृत विद्यापिठाला या प्रकल्पासाठी साहाय्य करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या प्रकल्पाचे काम जागतिक पातळीवर नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र घेऊन त्यात हा प्रकल्प सादर केला जाणार आहे. या कोश प्रकल्पात तंत्रज्ञान वापरल्याने काम सोपे होईल. आगामी काळात अन्य भाषांसाठीही असा प्रकल्प करता येऊ शकेल, असे राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान महासंघाचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी नमूद केले.