मिरज येथे आंतरशालेय महानाट्य स्पर्धा आणि ‘स्वराज्य दुर्ग बांधणी’ स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला !
मिरज, ६ जानेवारी (वार्ता.) – येथील विद्या मंदिर प्रशाला येथे २ जानेवारी या दिवशी ‘स्वराज्य दुर्ग बांधणी स्पर्धा’ पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई आणि विभागीय कार्यवाह श्री. सुनील लाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
यंदाच्या दीपावलीच्या सुटीत ८, ९ आणि १० नोव्हेंबर २०२३ या दिवशी ‘स्वराज्य दुर्ग बांधणी’ स्पर्धेत एकूण १३ गडांच्या प्रतीकृती विद्यामंदिर प्रशालेतील शिक्षक आणि शिक्षिका यांच्या मार्गदर्शनानुसार विविध वर्गात शिकणारे विद्यार्थी अन् विद्यार्थिनी यांनी बनवल्या होत्या. यामध्ये प्रतीकृती स्वरूपातील राजगडला प्रथम, शिवनेरीला द्वितीय, तसेच जंजिरा गडाला तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
२२ ते २७ डिसेंबर २०२३ या कालावधीत श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक आंतरशालेय महानाट्य स्पर्धेत येथील ५ शाळांच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील ५ महानाट्ये सादर केली. यामधील ‘संत एकनाथला’ प्रथम ‘बालगंधर्वला’ द्वितीय आणि ‘एक मराठी काव्य हरवले’ या महानाट्याला तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी श्री. सुनील लाड म्हणाले की, ‘स्वराज्य दुर्ग बांधणी स्पर्धा आणि श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक’ आंतर शालेय महानाट्य स्पर्धा यांसारखे उपक्रम राबवून ‘मिरज विद्या समिती’ ही शालेय शिक्षण संस्था व्यावसायिकतेहून अधिक शिक्षण प्रसार धर्माला जागली आहे, हेच सिद्ध होते. आज सगळीकडेच शिक्षणाचे व्यापारीकरण होत असतांना या देशाचा जाज्वल्य इतिहास जागृत करणारे उपक्रम राबवून निश्चितच या संस्थेने आदर्श निर्माण केला आहे. यासाठी मिरज विद्या समितीचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन !
श्री. रावसाहेब देसाई म्हणाले की, ‘भ्रमणभाष आणि दूरदर्शन संच’चा विकृत भुलभुलैय्या हा आपल्या नव्या पिढीचे अधःपतन करण्यास कारणीभूत ठरत आहे. यापासून दूर नेऊन नव्या पिढीसाठी, तसेच सर्व विद्यार्थ्यांना ‘शौर्य जागरण’ आणि शक्ती निर्माण करणारे व्यायाम, खेळ असे उपक्रम राबवणे हीच काळाची आवश्यकता आहे. हे ओळखूनच मिरज विद्या समितीने असे उपक्रम राबवले, हे निश्चितच कौतुकास पात्र आहे. या कार्यक्रमास मिरज विद्या समितीचे अध्यक्ष श्री. शैलेश देशपांडे, सौ. समिधा देशपांडे, मुख्याध्यापक श्री. आर्.व्ही. कुलकर्णी, तसेच विविध शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.