मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन !

साहित्य संमेलनात उपस्थित मान्यवर

पुणे – अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली. गेल्या १०० वर्षात सुवर्णकाळ अनुभवतांना अनेक अडचणींवर मात करीत रंगभूमी पुढे जात आहे; म्हणूनच या रंगभूमीचा आनंद सोहळा दिमाखात साजरा होत आहे. मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन वाढवण्यात येईल. ज्येष्ठ कलावंतांच्या घराविषयीही शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते.

मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमाला उद्योगमंत्री तथा नाट्य संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत, ज्येष्ठ नेते तथा नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष खा. शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आदी उपस्थित होते. नाट्य परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांच्या हस्ते रंगमंचाच्या पडद्याचे अनावरण करण्यात आले.

या वेळी उपस्थित शरद पवार म्हणाले की, नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन आणि ज्ञानदानाचे कार्य उत्तमरितीने होते. रंगभूमीच्या माध्यमातून अनेक वर्षे लोकप्रबोधनाचे कार्य होत आहे.

उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, पिंपरी-चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या नाट्य संमेलनानंतर कलाकार आणि पडद्यामागील कलावंत यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठकीचे आयोजन व्हावे अन् ज्येष्ठ कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी शासनाने निधी द्यावा. जगात सुंदरता निर्माण करण्यासाठी कलावंतांनी एकत्रित प्रयत्न करावा, असे मावळते संमेलनाध्यक्ष श्री. गज्वी म्हणाले.

मार्गदर्शन करतांना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत

नाट्य चळवळीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावे ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

पुणे – सांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून नाटकाकडे बघतांना सर्वांनी नाट्य चळवळीच्या विकासासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष ज्येष्ठ कलाकारांमधून एकमताने ठरविला जावा, अशी अपेक्षाही मंत्री सामंत यांनी या वेळी व्यक्त केली. गणेश कला क्रीडा संकुल येथे आयोजित १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. नाटकाच्या घंटेचे पूजन करून आणि संमेलनाध्यक्षांच्या हस्ते घंटा वाजवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

उद्योगमंत्री सामंत पुढे म्हणाले की, अनेक देणगीदारही नाट्य चवळवळीला प्रोत्साहन देत आहेत. शासनाकडून मिळणारा निधी नाट्य चळवळ पुढे नेण्यासाठी पडद्यामागील कलावंतांच्या साहाय्यासाठी वापरला जावा, असा प्रयत्न आहे. स्व. विक्रम गोखले यांचे स्वप्न साकार करण्यासाठी रत्नागिरीचे नाट्य संमेलन होण्यासाठी, वृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रमाचे काम चालू करण्यात येईल.
या वेळी प्रशांत दामले म्हणाले की, शासनाने मराठी नाट्यसृष्टीला पायाभूत सुविधा दिल्या असतांना कलाकारांनी उत्तम कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करावा. नाट्यकलेसाठी सराव फार आवश्यक असून कलाकारांनी त्याकडे विशेष लक्ष देणे आणि नाट्यरसिकांनी पुढच्या पिढीला नाटकाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणे या ३ गोष्टी नाट्यसृष्टीसाठी महत्त्वाच्या आहेत, सर्वांच्या सहकार्याने नाट्य संमेलन यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या वेळी प्रशांत दामले, ज्येष्ठ कलावंत सरूप कुमार, लीला गांधी, सुहासिनी देशपांडे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचा सत्कार करण्यात आला.

स्मरणिकेतून १०० वर्षातील नाट्य संमेलन अध्यक्षांच्या कारकीर्दीला मिळणार उजाळा !

१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ६ आणि ७ जानेवारी २०२४ या कालावधीत चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलनावर आयोजित करण्यात आले आहे. या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने एक वैशिष्ट्यपूर्ण स्मरणिका सिद्ध करण्यात आली आहे. १०० व्या नाट्य संमेलनाचे औचित्य साधून या स्मरणिकेत आजवर झालेल्या १०० नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि त्यांच्या कारकीर्दीला उजाळा देण्यात आला आहे. या स्मरणिकेला ‘नांदी’ नाव देण्यात आले असून १०० व्या नाट्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी याचे अनावरण करण्यात येणार आहे.