अपेक्षा
अपेक्षा म्हणाली मला ।
‘थांब, ऐक माझे जरा ।
ऐकू नको कुणाचे ।
कर तसेच, सांगते मी जसे’ ।। १ ।।
आश्चर्य वाटले मला ।
अपेक्षेलाही अपेक्षा (स्वेच्छा) असते ।
तिलाही वाटते, ‘सर्वांनी ऐकावे माझे ।
आणि सदा माझ्या मनाप्रमाणे व्हावे’ ।। २ ।।
अपेक्षेला समजवणार कसे ।
अपेक्षा हेच कारण सर्व दुःखांचे ।
मनुष्याच्या अन् स्वयं तिच्या ।
म्हणून निरपेक्षतेने रहावे सदा ।। ३ ।।
अपेक्षा झाली पूर्ण, तर लाभे सुख ।
आणि राहिली अपूर्ण, तर मिळे दुःख ।
सुख-दुःख लाभून राही अपूर्ण जीवन ।
सुख-दुःख यांच्या पलीकडे असे आनंद ।। ४ ।।
अपेक्षा कधी स्वभावदोष असे ।
कधी असे ते रूप अहंकाराचे ।
मन-चित्ताच्या अशुद्धतेचे ।
ते मूर्तीमंत प्रतीक असे ।। ५ ।।
करण्या निर्मूलन स्वभावदोषांचे ।
अन् अपेक्षारूपी अहंकाराचे ।
करूनी पुरुषार्थ साधनेचा ।
साधावी चित्ताची शुद्धता ।। ६।।
अपेक्षा सोडून मनाची ।
पाळावी आज्ञा धर्मशास्त्राची ।
थोर, संत आणि गुरुजन यांची ।
त्याने घडेल साधना मनाची ।। ७ ।।
यांद्वारे स्वेच्छारूपी अपेक्षा त्यागूनी ।
परेच्छेने वागण्या प्रारंभ करूनी ।
अंततः ईश्वरेच्छा प्रमाण मानूनी ।
अपेक्षारहित मनाने चित्तशुद्धी साधावी ।। ८ ।।
मायारूपी अपेक्षा होते परमार्थ सापेक्ष ।
मायेसंबंधी निरपेक्ष होऊनी ।
योग साधावा सदा परमार्थाशी ।
तर होईल प्राप्ती शाश्वत स्वरूपाची ।। ९ ।।
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती (२१.११.२०२३)