हिंदुद्वेष्ट्यांना आता हिंदूंनीच बहिष्कृत करून त्यांना राजकारणातून कायमचे हद्दपार केले पाहिजे !
हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने झालेले हिंदू !
३१ डिसेंबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘फ्रान्समधील मौलिक ग्रंथालय जाळण्याच्या कृतीतून इस्लामी धर्मांधांच्या क्रूरतेत भेद न आढळणे, इस्लामी अन्यायी प्रथांविरोधात नव्हे, तर हिंदूंच्या संस्कृतीविषयी जाब विचारल्यावर काहूर माजवणारे हिंदुद्वेष्टे’, यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
८. आशीर्वादाचे सामर्थ्य आणि माहात्म्य हिंदुद्वेष्ट्यांना काय कळणार ?
ज्येष्ठांकडून जेव्हा एखाद्या कनिष्ठाला मनापासून शुभाशीर्वाद दिले जातात, तेव्हा त्याचे शुभ फल पदरात पडल्याविना रहात नाही; म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभकार्याला प्रस्थान करण्यापूर्वी ज्येष्ठांकडून शुभाशीर्वाद घेतले जातात. महाभारतातील युद्धप्रसंगी महारथी भीष्म ज्या दिवशी युद्ध मैदानात उतरणार होते, तत्पूर्वी त्यांच्याकडून पांडवांची पत्नी द्रौपदी हिने श्रीकृष्णाच्या योजनेप्रमाणे ‘अखंड सौभाग्यवती भव’ हा आशीर्वाद मिळवण्यात यश प्राप्त केले होते. परिणाम काय झाला ? भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण, दुर्याेधन अशा महान पराक्रमी योद्ध्यांशी युद्ध होऊनही अखेर पाचही पांडव जिवंत राहिले. आशीर्वादामध्ये असे सामर्थ्य असल्यामुळे कुणाला आशीर्वाद द्यायचा, याचेही तारतम्य आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठांकडून ठेवले गेले. कौरव-पांडव यांचे युद्ध चालू होण्यापूर्वी दुर्याेधन त्याची आई गांधारी हिच्याकडून विजयाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गेला होता; पण गांधारीला दोन भावांपैकी धर्म कुणाच्या बाजूने आहे याची आणि आपल्या पातिव्रत्यामुळे आपल्या शब्दांत किती सामर्थ्य आहे, याची पूर्ण कल्पना होती; म्हणून पुत्रप्रेमाने आंधळे होत तिने दुर्याेधनाला विजयाचा आशीर्वाद न देता ‘यतो धर्मस्ततो जयः ।’ (महाभारत, पर्व ५, अध्याय ३९, श्लोक ७), म्हणजे ‘जेथे धर्म (भगवान श्रीकृष्ण) आहे, तेथे विजय निश्चित आहे’, म्हणजे ज्या पक्षाकडे धर्म, म्हणजे सत्य आहे, ‘त्या पक्षाचा विजय होईल’, असा आशीर्वाद दिला; म्हणून हिंदु धर्मातील प्रत्येक परंपरेविषयी वाह्यात विधाने करण्यापूर्वी तथाकथित पुरोगाम्यांनी त्यांचे डोके थोडे तरी चालवले पाहिजे !
९. देवी सरस्वतीला विद्येची देवता मानण्यास नकार देणारे हिंदुद्वेष्टे !
हिंदु समाजाला त्याच्या धर्म, देवीदेवता आणि परंपरा यांपासून दूर नेण्याचे, त्यांच्यात आपल्या धर्माविषयी अपसमज आणि हीन भावना निर्माण करण्याचे एक पुष्कळ मोठे षड्यंत्र हिंदूंमधीलच काही विकाऊ विद्वानांनी रचले आहे. त्यामुळे हिंदूंच्या सणांवरच नेहमी या हिंदुद्वेष्ट्यांकडून टीका केली जाते. हिंदु धर्मात देवी सरस्वतीला विद्येची देवता मानले जाते. प्रत्येक बालकाच्या विद्यारंभी तिची पूजा करून तिचे आशीर्वाद प्राप्त करण्याची फार प्राचीन परंपरा हिंदु धर्मात आहे. त्यामुळे भारतात प्रत्येक शाळेत सरस्वतीची प्रतिमा प्रस्थापित केल्याचे दिसून येते. प्रतिवर्षी वसंतपंचमीला देवी सरस्वतीचे सामूहिकरित्या पूजन आणि प्रार्थना केली जाते; पण मध्यंतरी काही हिंदुद्वेष्ट्यांच्या मनात विकृतीने जन्म घेतला आणि त्यांनी आम्ही देवी सरस्वतीला विद्येची देवता मानणार नाही, तर तिच्याऐवजी ‘ज्यांनी या देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचला, त्या सावित्रीबाई यांची पूजा करू’, असे घोषित केले. एवढ्यावरच या हिंदु म्हणून अपघाताने जन्म झालेल्यांचे समाधान झाले नाही, तर त्यांनी अनेक शाळांमधील वसंतपंचमीला होणारे सरस्वतीपूजन बंद पाडले. देवी सरस्वतीच्या प्रतिमा आणि चित्रे शाळांमधून हटवली जाऊन त्याऐवजी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा अन् छायाचित्रे लावण्यात आली. असे करतांना त्यांच्या मनात सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आदराची भावना अल्प; पण हिंदु धर्माविषयीचा द्वेष अधिक दिसून आला, असे हिंदुद्वेष्टे जेव्हा मुसलमानांच्या गळ्यात गळे घालतात किंवा हिंदु देवतांचा अपमान करतात, तेव्हा त्यांनी डॉ. आंबेडकर यांची मुसलमानांविषयी काय मते होती ? किंवा सावित्रीबाई फुले यांच्या देवी सरस्वतीविषयी काय भावना होत्या ? यांचे अजिबात वाचन केलेले नसते.
१०. सावित्रीबाईंच्या काव्यात ‘सरस्वती’ आणि ‘उमा-महेश’ यांचा उल्लेख केलेला हिंदुद्वेष्टे कधी लक्षात घेणार ?
सावित्रीबाई यांच्या कवितांचा ‘काव्यफुले’ या नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावरच हिंदु समाजाला प्रिय असणार्या उमा-महेश्वर (शंकर-पार्वती) यांचे छायाचित्र अंकित करण्यात आले आहे. त्यांची मुलींना शिक्षण घेण्याविषयी आवाहन करणारी एक कविता आहे. या कवितेच्या एका कडव्यात त्या मुलींना उद्देशून म्हणतात,
‘सरस्वतीचा हा दरबार खुला जाहला पाहू चला ।
शाळेमधुनी शिकुनि घेऊ ज्ञान मिळवू चला ग चला ।
शाळेत जाऊ चला ग चला ।।’,
म्हणजे सावित्रीबाईंना विद्येची देवता ‘सरस्वती’ मान्य आणि पूज्य आहे. शाळेला त्या सरस्वतीचा दरबार मानतात; पण हिंदुद्वेष्ट्यांना मात्र विद्येची देवता म्हणून सरस्वती मान्य नाही, हा केवढा विरोधाभास आणि ढोंगीपणा आहे ? सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण क्षेत्रातील कार्य अमूल्य आहेच, ते कुणीही नाकारू शकत नाही; पण यासाठी सरस्वती विद्येची देवता न मानण्याचे काय कारण ? केवळ हिंदुद्वेष ! दुसरे काय कारण असणार ? जे हिंदुद्वेष्टे नेहमी हिंदु देवतांचा अपमान करतात, त्यांना सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या कार्यासाठी शिवशंकराचा आशीर्वाद मागितला आहे आणि त्यांच्या रूपाचे गुणवर्णन एका कवितेत भरभरून केले आहे, हे वास्तव ठाऊक आहे का ?
११. ‘गीता प्रेस’चे धर्मप्रसाराचे अनन्यसाधारण महत्त्व न जाणता तिला हिणवणारे नीच वृत्तीचे काँग्रेस नेते जयराम रमेश !
साहित्य, संगीत, विविध कला, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, विज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या संस्था आणि व्यक्ती यांना भारताच्या केंद्रशासनाकडून ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘भारतरत्न’ अशा पदव्यांनी सन्मानित केले जाते. नुकतेच गोरखपूर येथील ‘गीता प्रेस’ला ‘महात्मा गांधी शांती पुरस्कार’ देऊन त्यांच्या कार्याला सन्मानित करण्यात आले. इकडे या संस्थेला पुरस्कार मिळाला, तर तिकडे अपघाताने हिंदु म्हणून जन्मलेल्या हिंदुद्वेष्ट्यांच्या पोटात असह्य कळा येणे चालू झाले. कट्टर हिंदुविरोधी असणारे काँग्रेसचे एक नेते जयराम रमेश बरळले, ‘‘गोरखपूर येथील ‘गीता प्रेस’ला हा पुरस्कार देणे, म्हणजे या पुरस्काराचा अपमान करणे होय. ‘गीता प्रेस’ला हा पुरस्कार देणे, म्हणजे सावरकर आणि गोडसे यांनाही पुरस्कृत करणे होय.’’ काय म्हणावे या जयराम रमेश यांच्या नीच वृत्तीला ? ‘गीता प्रेस’ने आजपर्यंत वेद, उपनिषदे, गीता, रामायण, महाभारत, १८ पुराणे, भारताच्या विविध प्रांतातील संतांची चरित्रे अशा अनेक धर्मग्रंथांचे प्रकाशन करून हिंदूंना त्यांच्या धर्माची ओळख करून दिली, हिंदूंना धर्मग्रंथांच्या वाचनाची आवड लावली. सहस्रो धर्मग्रंथांच्या अक्षरशः कोट्यवधी प्रती आजपर्यंत वितरित झाल्या आहेत. विशेष म्हणजे हे सर्व ग्रंथ आणि पुस्तके यांसाठी वापरलेला कागद, शाई, बांधणी सारे काही उत्कृष्ट दर्जाचे असते आणि तरीही पुस्तकाच्या किमती पुष्कळ वाजवी असतात; जेणेकरून गरिबानांही ती पुस्तके विकत घेता यावीत. ‘गीता प्रेस’कडून ‘कल्याण’ नावाचे एक दर्जेदार धार्मिक मासिक नियमितपणे प्रकाशित केले जाते. या मासिकाने एकेका विषयाला वाहिलेल्या अनेक विशेषाकांचेही प्रकाशन केले आहे. हे विशेषांक ही संग्रहणीय आहेत. गीता प्रेसकडून हे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर एक ‘मिशन’ (ध्येय) म्हणून केले जाते. ‘गीता प्रेस’ने हिंदु धर्माच्या, धर्मग्रंथांच्या प्रचाराचे हे जे अमूल्य काम केले, हेच या हिंदुद्वेष्ट्या जयराम नरेश यांच्या पोटदुखीचे कारण आहे. गीता प्रेससारखेच कार्य एखाद्या मुसलमान अथवा ख्रिस्ती प्रकाशन संस्थेने केले असते आणि त्यांना ‘गांधी शांती’ पुरस्कार दिला असता आणि हेच जयराम रमेश अन् त्यांच्यासारखे हिंदुद्वेष्टे आनंदाने नाचले असते !
१२. हिंदुद्वेष्ट्यांना सन्माननीय पुरस्कार देऊन पुरस्कारांचा अवमान करणारी काँग्रेस !
काँग्रेसच्या राज्यात तर हे सन्मानीय पुरस्कार हिंदुद्वेष्ट्यांना खैरातीसारखे वाटून या पुरस्कारांचा अपमान आणि अवमूल्यन करण्यात आले होते. याची कितीतरी उदाहरणे सांगता येतील; पण विस्तारभयास्तव मोजकीच उदाहरणे देतो. तिस्ता सेटलवाड हे एक विदेशी पैशावर पोसले जाणारे आणि कट्टर हिंदुद्वेष्टे व्यक्तीमत्त्व. जे जे हिंदू आणि देश विरोधी घटक असतात, त्यांना या बाईंचा पाठिंबा असतो. अशा या हिंदुविरोधी तिस्ताला वर्ष २००७ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन कॉंग्रेस शासनाकडून गौरवण्यात आले. सैफ अली खान या अभिनेत्याने पहिली हिंदु पत्नी जिवंत असतांना आणि तिला एक मोठी मुलगी असतांनाही तिला तलाक देऊन स्वत:पेक्षा वयाने निम्म्या असणार्या करिना कपूर हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी निकाह केला आणि तिच्यापासून जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव, ‘तैमुर’ असे ठेवले, जो इतिहासात क्रूरकर्मा म्हणून कुप्रसिद्ध आहे. त्या सैफ अली खानलाही २०१० मध्ये काँग्रेसकडून ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवले गेले. ज्या एम्.एफ्. हुसेन या चित्रकाराने हिंदु देवता आणि भारतमाता यांची नग्न चित्रे काढून हिंदु धर्म आणि समस्त हिंदूंचा अपमान केला, त्या हुसेन याला कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळातच १९६६ मध्ये ‘पद्मश्री’ आणि १९७३ मध्ये ‘पद्मभूषण’ अशा पदव्यांनी गौरवण्यात आले. अशा या हिंदुद्वेष्ट्यांना आता हिंदूंनीच बहिष्कृत करून त्यांना राजकारणातून कायमचे हद्दपार केले पाहिजे !
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.
संपादकीय भूमिका‘गीता प्रेस’ला पुरस्कार दिल्यावर पोटशूळ उठणारे कट्टर हिंदुद्वेष्ट्या तिस्ता सेटलवाडला पुरस्कार देतांना कोणता निधर्मीपणा जपतात ? |