श्रीरामाशी संबंधित काही स्थळांचे भौगोलीय रामायण !
२२ जानेवारी या दिवशी अयोध्येत (उत्तरप्रदेश) श्रीराममंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्या निमित्ताने…
अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस जसा जवळ येत आहे, तशी रामभक्तीची लाट हिंदूंमध्ये वाढत आहे. श्रीरामाशी संबंधित प्रत्येक गोष्ट हिंदूंना जवळची वाटत आहे. श्रीरामाशी संबंधित कथांचे श्रवण करत, त्या कथांचे चित्रीकरण टीव्हीवर पहात हिंदु समाज मोठा झाला आहे. श्रीरामाशी संबंधित काही स्थळे प्रसिद्ध आहेत, त्याविषयी हिंदूंना काही प्रमाणात माहिती आहे; मात्र काही स्थळे केवळ ऐकून आणि काहींविषयी तो अनभिज्ञ आहे. या स्थळांविषयी या लेखातून अवगत करण्याचा हा प्रयत्न !
१. प्रयागराज
रामायणानुसार प्रयागराज येथे राम, लक्ष्मण आणि सीतामाता यांनी १४ वर्षांसाठी वनवासाला जातांना पहिल्यांदा विश्रांती घेतली. उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज हिंदूंसाठी सध्या धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. येथे सर्वांत मोठा कुंभमेळा भरतो. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर म्हणजेच त्रिवेणी संगमावर स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
२. चित्रकूट पर्वत
मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश यांच्यामध्ये सध्या हे स्थान आहे. येथेच भरताने प्रभु श्रीरामाची भेट घेऊन त्यांना पित्याच्या निधनाची वार्ता कळवून अयोध्येला परतण्याची विनंती केली. वनवासातील बहुतांश काळ श्रीरामाने येथेच व्यतित केला. चित्रकूट पर्वतावर श्रीराम-सीता यांच्या वास्तव्याच्या अनेक खुणा अस्तित्वात आहेत.
३. नाशिक येथील सीता गुंफा !
येथील महत्त्वाचे स्थान म्हणजे सीता गुंफा (गुहा) ! नाशिकच्या पंचवटी परिसरात गोदावरी काठी श्री काळाराम मंदिराच्या बाजूला अगदी काही अंतरावर ही प्राचीन सीता गुंफा आहे. या ठिकाणी ५ महाकाय शेकडो वर्षांची जुनी वडाची झाडे आहेत. याच वडाच्या झाडांखाली सीतामातेचा संसार होता, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथेच लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. याच परिसरातून रावणाने सीतेचे अपहरण केले होते. गुंफा पूर्णतः दगडात कोरलेली आहे. केवळ एकच व्यक्ती एका वेळी या ठिकाणी बसून प्रवेश करू शकते. भूमीखाली ७-८ फूट खाली गेल्यावर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींचे दर्शन होते.
सीता गुंफेविषयी अभ्यासक सांगतात की, याच गुंफेतून ७ ते ८ कि.मी. अंतरावर रामशेज गडावर जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. श्रीराम याच मार्गाचा वापर करत होते. रामशेज गडावरसुद्धा काही काळ श्रीरामाने वास्तव्य केले होते. ही जागा सुरक्षेच्या दृष्टीने अनेक वर्षांपासून सध्या बंद केलेली आहे.
४. किष्किंधा नगरी
किष्किंधा नगरी ही दंडकारण्याचा भाग होता. दंडकारण्याचा विस्तार विंध्याचल ते दक्षिणेतील समुद्र किनार्यापर्यंत होता. किष्किंधेवर वानरांचे राज्य होते. येथे वालीचे राज्य होते. प्रभु श्रीरामाने वालीचा वध करून सुग्रीवाचा राज्याभिषेक लक्ष्मणाकरवी याच नगरात केला होता. जेव्हा हनुमानाकडून सीता लंकेत आहे, असे कळले, तेव्हा प्रभु श्रीरामाने येथूनच वानरसेनेसह लंकेच्या दिशेने कूच केली होती. हा प्रदेश सध्या कर्नाटकात आहे.
५. ऋष्यमुख पर्वत
हे स्थान सध्या कर्नाटक येथे आहे. तुंगभद्रा नदी ओलांडून येथे जावे लागते. हे तेच दिव्य स्थान आहे, जेथे प्रभु श्रीरामाची परमभक्त हनुमानाशी पहिल्यांदा भेट झाली होती. वालीपासून भयभीत होऊन सुग्रीव स्वत:च्या काही मंत्रीगणांसह येथेच आश्रयाला होता. जेव्हा रावण सीतामातेला आकाशमार्गे घेऊन जात होता, तेव्हा सीतामातेने तिचे अलंकार याच पर्वतावर टाकले होते. येथेच हनुमानाने सुग्रीव आणि श्रीराम यांची भेट घडवून आणली होती.
६. चिंतामणि मंदिर
अणेगुडी (कर्नाटक) येथील चिंतामणि मंदिरात एक स्थान असे आहे आणि लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, रामाने वालीवर येथूनच बाण सोडून त्याचा वध केला होता.
७. माल्यवंत रघुनाथ मंदिर
माल्यवंत रघुनाथ मंदिर हे माल्यवंत पर्वतावर आहे. येथेच श्रीरामाने चातुर्मास केला होता. सुग्रीव किष्किंधेचा राजा झाल्यावर प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांनी या पर्वतावर ४ मासांचा काळ व्यतित केला होता. प्रभु श्रीरामाला तहान लागल्यावर पिण्यासाठी पाणी मिळावे; म्हणून लक्ष्मणाने येथील भूमीवर बाण सोडला. तेव्हा बाण भूमीला भेदून पाण्याचे कारंजे उत्पन्न झाले आणि तेथेच एका तलावाची निर्मिती झाली.
८. सुचिंद्रम येथील मारुति मंदिर
नागरकोईल, तमिळनाडू येथील सुचिंद्रम अंजनेयर हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे. येथील मुख्य मंदिराला ‘थनुमलय’ अथवा ‘स्थानुमलयन’ मंदिर, असे म्हणतात. वास्तविक येथे ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे मंदिर असले, तरी येथील मारुतीचे मंदिर आणि त्याची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. जेव्हा लक्ष्मणाला इंद्रजित ब्रह्मास्राने मूर्च्छित करतो, तेव्हा मारुति संजीवनी वनस्पती आणण्यास जातो. संजीवनी वनस्पती नेमकी कोणती ? हे लक्षात न आल्याने संजीवनी वनस्पतीचा पूर्ण पर्वतच मारुति उचलून लंकेला नेतो. या पर्वताचा काही भाग जेथे पडला, तेथेच हे प्राचीन मारुति मंदिर आहे.
९. हत्याहरण तीर्थ
उत्तरप्रदेशातील हरदोई येथे हत्याहरण तीर्थ आहे. प्रभु श्रीरामाने रावणाचा वध केल्यावर लागलेल्या ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्ती मिळण्यासाठी देशभरातील काही तीर्थांमध्ये स्नान केले. येथील तीर्थात स्नान केल्यावर श्रीरामाला सर्व ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्ती मिळाली. त्यामुळे या तीर्थाला ‘हत्याहरण तीर्थ’ असे नाव पडले.
१०. रामेश्वरम् धाम
हिंदूंच्या ४ धामांपैकी तमिळनाडूतील भारताच्या टोकाला असलेला प्रदेश म्हणजे रामेश्वरम् ! लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी श्रीरामाने येथेच भगवान शिवाची उपासना केली होती. येथून पुढे धनुषकोडी येथून श्रीरामाने लंकेत जाण्यासाठी वानरसेनेसह समुद्रावर रामसेतूची निर्मिती केली होती. रावणाचा वध केल्यानंतर ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी रामेश्वरम् येथे सीतेसह शिवाची उपासना केली. श्रीरामाने हनुमानाला एक शिवलिंग आणण्यासाठी पाठवले होते; मात्र हनुमानाला येण्यास विलंब होत असल्याने श्रीराम आणि सीतेने एक वाळूचे शिवलिंग सिद्ध करून त्यावरच अभिषेक केला. हनुमान शिवलिंग घेऊन आल्यावर वाळूने बनवलेले शिवलिंग तेथून हटवण्याचा प्रयत्न केला; मात्र ते जागचे हलले नाही. तेच रामेश्वरम् येथील शिवलिंग आहे. ते १२ ज्योतिर्लिंगांमध्ये गणले जाते.
११. जनकपूर
नेपाळ येथील जनकपूर देवी सीतेचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथेच श्रीरामाचा विवाह सीतामातेसह झाला होता. येथे सीतामातेचा राजवाडा आहे. जनकपूर सध्या काठमांडूच्या दक्षिण-पूर्वेला असून भारतीय सीमेपासून २० कि.मी. दूर आहे. विवाह पंचमीला रामभक्त ‘सीतामढी’ नावाने ओळखल्या जाणार्या येथील स्थानाला भेट देतात.
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (३१.१२.२०२३)