परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या खोलीत करण्यात आलेल्या ‘श्री दुर्गासप्तशती अनुष्ठाना’च्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्युयोग टळून त्यांचे सर्व शारीरिक त्रास दूर व्हावेत आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे; म्हणून त्यांच्या निवासकक्षात (खोलीत) नवरात्रात ‘श्री दुर्गासप्तशती’चे अनुष्ठान करण्यात येते. या अनुष्ठानात ‘सनातन पुरोहित पाठशाळे’तील पुरोहित परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत चौरंगावर श्री दुर्गादेवीचे चित्र ठेवून तिचे पूजन आणि ‘श्री दुर्गासप्तशती’ ग्रंथाचे पठण करतात. वर्ष २०१८ पासून परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार ‘श्री दुर्गासप्तशती अनुष्ठाना’च्या संदर्भात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे विपुल संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाअंतर्गत अनुष्ठानाच्या कालावधीत (९ दिवसांत) श्री दुर्गादेवीचे चित्र, पठण करणारे पुरोहित, पूजेतील विभूती, निर्माल्य इत्यादी घटकांच्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. यातून लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

३१ डिसेंबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘अनुष्ठानातील ९ दिवसांत देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे, एप्रिल २०२२ पासून केलेल्या अनुष्ठानात देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेत विलक्षण वाढ होणे आणि पुरोहितांनी त्यांच्या भावानुसार अनुष्ठानातील चैतन्य ग्रहण करणे’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

४. देवीच्या चित्रातील वाढत्या चैतन्याच्या प्रभावामुळे पूजेतील विभूतीमध्ये उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

सौ. मधुरा कर्वे

अनुष्ठान चालू असतांना प्रतिदिन देवीच्या चित्रासमोर उदबत्ती लावण्यात येते. ऑक्टोबर २०१८ मध्ये केलेल्या अनुष्ठानाच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी पहिल्या दिवशी उदबत्तीच्या विभूतीची चाचणी करण्यास सांगितले. तेव्हा तिच्यामध्ये २.४२ मीटर सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असल्याचे आढळून आले. त्यानंतर पुढे आठही दिवस, म्हणजे अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत प्रतिदिन विभूतीच्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतून विभूतीमध्ये उत्तरोत्तर अधिक प्रमाणात चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. बाजूला दिलेली सारणी पहा.

ऑक्टोबर २०१८ मध्ये ९ व्या दिवशी विभूतीतील सकारात्मक ऊर्जा ७.१९ मीटर होती. ऑक्टोबर २०१९ मध्ये विभूतीत ४५.६५ मीटर, ऑक्टोबर २०२१ मध्ये ५४१.०५ मीटर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये ९१४.९० मीटर सकारात्मक ऊर्जा आढळली. यातून प्रत्येक वर्षी विभूतीमध्ये अधिकाधिक चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. हे पुष्कळच वैशिष्ट्यपूर्ण आहे. देवीच्या चित्रातील वाढत्या चैतन्याच्या प्रभावामुळे पूजेतील विभूतीमध्येही पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

५. अनुष्ठानातील पूजेच्या निर्माल्यात उत्तरोत्तर अधिक प्रमाणात चैतन्य निर्माण होणे

देवपूजा करतांना देवतेला वाहिलेल्या फुलांचे दुसर्‍या दिवशी निर्माल्य बनते. अनुष्ठानातील पूजेच्या निर्माल्याच्या एक-आड-एक दिवस चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांतून निर्माल्यात उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसून आले. निर्माल्याच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.

वरील सारणीतून लक्षात येते की,

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

अ. एप्रिल २०२२ मध्ये पहिल्या दिवशीच्या निर्माल्यातील सकारात्मक ऊर्जा १२.४० मीटर, तर ९ व्या दिवशी ती ६०.४६ मीटर होती. यातून प्रत्येक दिवशी निर्माल्यात उत्तरोत्तर अधिक प्रमाणात चैतन्य निर्माण झाले, हे लक्षात आले. ऑक्टोबर २०२२ आणि जानेवारी २०२३ मधील निर्माल्याच्या संदर्भातही असेच दिसून आले.

आ. ऑक्टोबर २०२२ मध्ये ९ व्या दिवशीच्या निर्माल्यातील सकारात्मक ऊर्जा २२० मीटर आणि जानेवारी २०२३ मध्ये ती ७९०.८० मीटर होती. हे पुष्कळच वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचे कारण हे की, देवीकडून उत्तरोत्तर अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित झाले. याचा चांगला परिणाम देवीला अर्पण केलेली फुले अन् हार यांच्यावर झाला. त्यामुळे निर्माल्यामध्येही पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

(हिंदु धर्मात पूजेचे निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास सांगितले आहे. निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जन केल्याने त्यातील चैतन्य पाण्यात मिसळते आणि समष्टीला त्याचा लाभ होतो. यातून ‘हिंदु धर्मातील प्रत्येक कृतीमागे अध्यात्मशास्त्र आहे’, हे लक्षात येते.)

६. अनुष्ठानामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील चैतन्यात पुष्कळ प्रमाणात वाढ होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पावन वास्तव्यामुळे त्यांची खोली चैतन्मय झाली आहे. ‘जानेवारी २०२३ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत केलेल्या अनुष्ठानाचा त्यांच्या खोलीवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यात आले. यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीच्या एक-आड-एक दिवस चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांतून लक्षात आले की, अनुष्ठानाच्या पहिल्या दिवशी पूजेपूर्वी त्यांच्या खोलीत पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असून तिची प्रभावळ १५२८ मीटर होती. अनुष्ठानाच्या कालावधीत प्रत्येक दिवशी पूजेनंतर खोलीतील सकारात्मक ऊर्जेत (चैतन्यात) पुष्कळ वाढ झाली. पाचव्या दिवसापासून खोलीतील सकारात्मक ऊर्जा २३३७ मीटर एवढीच मोजता आली; कारण ती अचूक मोजण्यासाठी मागे जाणे जागेच्या अभावामुळे शक्य नव्हते. थोडक्यात परात्पर गुरु डॉक्टरांची खोली मुळातच चैतन्यमय आहे आणि अनुष्ठानामुळे तिची सात्त्विकता आणखी वाढली, हे या चाचण्यांतून दिसून आले.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या अभूतपूर्व संशोधनातून ‘देवतचे पूजन भावपूर्ण केल्याने पूजक, देवतेचे चित्र, विभूती, निर्माल्य, पूजेचे स्थान आदी सर्वच घटकांवर किती सकारात्मक परिणाम होतात’, हे लक्षात आले. या संशोधनाच्या सेवेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी आम्हा साधकांना मिळाली, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’ (समाप्त)

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.८.२०२३)

इ-मेल : mav.research2014@gmail.com