योगेश्वर श्रीकृष्ण (गुणवैशिष्ट्ये आणि श्रीकृष्णावरील आक्षेपांचे खंडन)
महाभारतातील अलौकिक चरित्रे : खंड २
भगवान श्रीकृष्ण म्हणजे धर्मसंस्थापनेसाठी झालेला पूर्णावतार ! ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ हा ग्रंथ ‘महाभारतातील अलौकिक चरित्र’ या मालिकेतील द्वितीय खंड असून श्रीकृष्ण भक्तांसाठी एक पर्वणीच आहे. या ग्रंथात श्रीकृष्णाची उलगडून दाखवलेली अनेक गुणवैशिष्ट्ये अद्वितीय आहेत. पितामह भीष्मरचित श्रीकृष्णस्तुती असलेल्या स्तोत्राचा भावार्थ वाचून श्रीकृष्णावरील श्रद्धा आणि भक्ती प्रत्येकाची वृद्धींगत होईल. येणार्या भीषण आपत्काळात रक्षण होण्यासाठी श्रीकृष्णाची भक्ती वाढण्यासाठी हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल. ‘हिंदूंचा हा धर्मग्रंथ वाचनीय असून प्रत्येकाने संग्रही ठेवावा’, अशाच तोडीचा आहे; तसेच श्रीकृष्ण भक्तांना भेट म्हणून देण्यासाठी उपयुक्त आहे.
लेखक : श्री. दुर्गेश जयवंत परुळकर
श्रीकृष्णाविषयी श्रद्धा आणि भक्ती वाढवणारा विद्वत्तापूर्ण ग्रंथ : ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘श्री. दुर्गेश परुळकर यांनी लिहिलेला ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ हा ग्रंथ वाचला. श्री. परुळकर यांच्या धर्माविषयीच्या व्यासंगातून साकारलेला हा ग्रंथ एकदा वाचायला घेतल्यावर खाली ठेवावासाच वाटत नाही, इतका तो मंत्रमुग्ध करणारा आहे ! भगवान श्रीकृष्णाविषयी इतकी सविस्तर माहिती या ग्रंथामुळे प्रथमच वाचायला मिळाली. श्रीकृष्णाच्या संदर्भातील अनेक कथाही समजल्या. श्रीकृष्णासंबंधीच्या कथा अन्य ग्रंथांतही दिलेल्या असतात; पण ‘कथांतून नेमका कोणता बोध घ्यायचा ?’, हे या ग्रंथातून सहजपणे उलगडते. हा ग्रंथ विद्वत्तापूर्ण असूनही सुगम आहे, हेही या ग्रंथाचे एक वैशिष्ट्यच आहे. श्री. परुळकर यांच्या श्रीकृष्णभक्तीचा सुगंध ग्रंथ वाचतांना दरवळत रहातो. त्यामुळे ग्रंथ वाचतांना अनेक वेळा माझी भावजागृतीही झाली.
श्री. परुळकर यांनी श्रीकृष्णावरील आक्षेपांचेही अतिशय अभ्यासपूर्ण खंडन केले आहे. ‘श्रीकृष्णभक्तांनी केवळ उपास्यदेवतेची भक्ती करायची, एवढेच पुरेसे नसून त्यांना आपल्या धर्मश्रद्धांचे भंजन करणार्यांचा बाणेदारपणे प्रतिवादही करता यावा, एवढा जाज्वल्य धर्माभिमान त्यांच्यात असायला हवा’, हा संदेशच जणू त्यांनी दिला आहे ! यामुळेच या श्रीकृष्णचरित्राला पूर्णत्वही आले आहे. ‘या ग्रंथाच्या वाचनाने साधक आणि भक्त यांची भगवान श्रीकृष्णावरील श्रद्धा अन् भक्ती दृढ होईल’, याची मला निश्चिती आहे.
‘हा ग्रंथ अवश्य वाचावा’, असा आहे. ‘ग्रंथ वाचून झाल्यावर वाचकांनी त्यांचा अभिप्राय प्रकाशकाच्या पत्त्यावर टपालाने किंवा ‘इ-मेल’ने कळवावा’, ही विनंती.
‘श्री. परुळकर यांच्या हातून अशीच धर्मजागृती आणि धर्मरक्षण करणारी सेवा निरंतर घडो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२४.१०.२०२३)
ग्रंथाचे मनोगत
‘श्रीकृष्ण हे विश्वातील महान व्यक्तीमत्त्व आहे ! शिशुपालाचे १०० अपराध भरेपर्यंत संयम बाळगणारा, द्वारकेचा राणा असूनही अत्यंत गरीब असलेला भक्त सुदाम्याकडील पोहे खाणारा आणि सख्यभक्ती करणार्या अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करून त्याचे अनेक वेळा प्राण वाचवणारा श्रीकृष्ण आहे ! श्रीकृष्ण हा आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श पिता आणि आदर्श मित्र आहे. तो अन्यायाचा नायनाट करून धर्मसंस्थापना करणारा आहे. तो उत्तम वक्ता आणि राजदूत आहे. तो तत्त्ववेत्ता आहे, तसाच जगद्गुरुही आहे. तो ‘श्रीमद्भगवद्गीते’चा कर्ता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी फाशी ठोठावलेले अनेक क्रांतीकारक गीतेतील श्लोक म्हणत हसत हसत वधस्तंभाकडे चालत गेले. गीतेतील तत्त्वज्ञान आजही मनामनांत नवचैतन्य उत्पन्न करते.
अशा भगवान श्रीकृष्णाची अनेक गुणवैशिष्ट्ये प्रस्तुत ग्रंथात दिली आहेत. ती वाचून वाचकांची श्रीकृष्णावरील श्रद्धा आणि भक्ती वृद्धींगत होईल. यामुळे त्यांच्या उपासनेला बळ मिळेल. अनेक संतमहात्मे, भविष्यवेत्ते आदींनी सांगितल्यानुसार लवकरच महाभीषण आपत्काळ (उदा. महायुद्ध, महापूर) ओढवणार आहे. अशा आपत्तींमध्ये आपल्याला कोण वाचवू शकतो, तर केवळ भगवंतच ! श्रीकृष्णाने गीतेमध्ये ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’
(अर्थ : माझ्या भक्तांचा नाश होणार नाही), असे वचन भक्तांना दिले आहे. येणार्या भीषण आपत्काळात आपले रक्षण होण्यासाठी आपण साधना आणि भक्ती करायला हवी. आपत्काळात पांडवांचे सर्व प्रकारे रक्षण करणार्या श्रीकृष्णाची भक्ती वाढण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरेल.
सध्या बुद्धीप्रामाण्यवादी, नास्तिक आदी हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता आणि महापुरुष यांवर टीका करून हिंदूंचा बुद्धीभेद करतात. अशा टीकांचा योग्य तो प्रतिवाद न केल्याने हिंदूंची श्रद्धा डळमळीत होते, तसेच धर्महानीही होते. ‘अयोग्य टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. याच हेतूने या ग्रंथात ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे. प्रत्येकाने यांचे अभ्यासपूर्वक मनन करावे.
प्रस्तुत ग्रंथमालिकेच्या पहिल्या खंडात ‘पितामह भीष्म’ यांचे चरित्र कथन केले आहे. आता या दुसर्या खंडाद्वारे ‘भगवान श्रीकृष्णा’चे चरित्र प्रकाशित करतांना आम्हाला आनंद होत आहे. हे ललित चरित्र नसून विवेचनात्मक चरित्र आहे. ‘या चरित्राद्वारे वाचकांना श्रीकृष्णाचे माहात्म्य समजून त्यांच्याकडून श्रीकृष्णाची भक्ती अधिक उत्कटतेने होवो’, ही भगवान श्रीकृष्णाच्याच चरणी प्रार्थना !’