Goa Police Recommendation EXTERNMENT : ‘बिलिव्हर्स’चा पास्टर डॉम्निकसह त्याच्या पत्नीच्या तडीपारीची गोवा पोलिसांकडून शिफारस !
बलपूर्वक धर्मांतर करून गोव्यातील शांती बिघडवत असल्याने केली शिफारस
पणजी, ५ जानेवारी (वार्ता.) : सडये, शिवोली येथील ‘बिलिव्हर्स’च्या ‘फाईव्ह पिलर्स’चर्चचा पास्टर डॉम्निक डिसोझा आणि त्याची पत्नी जीओन मास्कारिन्हास यांना उत्तर गोव्यातून तडीपार करण्यात यावे, अशी शिफारस गोवा पोलिसांनी उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. हे दोघे बळजोरीने धर्मांतर करून गोव्यातील शांती बिघडवत असल्याने पोलिसांनी ही शिफारस केली आहे. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी यासंबंधीचे पत्र उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्यांना पाठवले आहे.
पास्टर डॉम्निक याच्या विरोधात वर्ष २००९ पासून पोलिसांत ९ तक्रारींच्या आधारे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत आणि यांमधील ३ गुन्हे हे धर्मांतराशी निगडित आहेत. म्हापसा पोलीस ठाण्यामध्ये ७, तर गुन्हे अन्वेषण विभागाकडे २ गुन्हे नोंद झालेले आहेत. पास्टर डॉम्निक याला काळ्या जादूचा वापर करून धर्मांतर केल्याच्या तक्रारीवरून १ जानेवारीला कह्यात घेण्यात आले होते आणि त्याची ४ जानेवारीला जामिनावर सुटका झाली होती.
(सौजन्य : Prudent Media Goa)
(म्हणे) ‘पास्टर डॉम्निक आणि त्याची पत्नी जीओन निर्दोष असून तडीपार करू नका !’ – ‘बिलिव्हर्स’ समर्थकांची मागणी
पणजी : ‘बिलिव्हर्स’चे पास्टर डॉम्निकसह पत्नीच्या तडीपारीची गोवा पोलिसांकडून शिफारस केल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर बिलिव्हर्सच्या समर्थकांनी पणजी येथे उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन पास्टर डॉम्निक निर्दोष असल्याचे सांगून त्याला तडीपार न करण्याची मागणी केली आहे.
यानंतर पत्रकारांना संबोधित करतांना बिलिव्हर्सचे समर्थक म्हणाले, ‘‘पास्टर डॉम्निक हा निर्दोष आहे आणि त्याच्या विरोधात धर्मांतराचे एकही प्रकरण नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही चाल रचली आहे. सरकार अन्वेषण यंत्रणांचा गैरवापर करत आहे.’’