अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भारत भेट रहित होण्यामागील कारणमीमांसा !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे येत्या प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी २०२४ या दिवशी) ‘विशेष अतिथी’ म्हणून भारतात येणार नाहीत. या भेटीसह ‘क्वाड्रिलॅटरल’ म्हणजेच ‘क्वाड’ (भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या ४ देशांचा ‘क्वाड’ गट हा संरक्षणात्मकदृष्ट्या धोरणात्मक संबंध सुदृढ करण्यासाठी बनवलेला गट आहे.) ही शिखर परिषदही लांबणीवर पडली आहे. बायडेन यांची भेट रहित का झाली ? हे भारत आणि अमेरिका यांच्यातील ताणलेल्या संबंधांचे निदर्शक आहे का ? याविषयीचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.
१. बायडेन यांची भेट न होण्यामुळे होणारा परिणाम !
‘प्रजासत्ताकदिन’ सोहळा, म्हणजे एक प्रजासत्ताक म्हणून भारताची सामरिक शक्ती आणि सांस्कृतिक वैभव जगासमोर मांडण्याची संधी असते. प्रजासत्ताकाचे प्रमुख या नात्याने ‘राष्ट्रपती’ या सोहळ्याचे ‘यजमान’ असतात. यासमवेत या सोहळ्यासाठी एखाद्या राष्ट्रप्रमुखालाच ‘विशेष अतिथी’ म्हणून बोलावण्याची परंपरा आहे. यंदा प्रजासत्ताक सोहळ्यानिमित्त ‘जो बायडेन यावेत’, असे प्रयत्न चालू होते. गेल्या वर्षी मे २०२३ मध्ये ‘क्वाड’ परिषद झाली, त्या वेळी ‘पुढील वर्षी ही परिषद आम्ही भरवू’, असे भारताने घोषित केले होते; पण आता ही परिषद होणार नाही.
२. जो बायडेन यांची भेट रहित होण्यामागील कारणे !
वर्ष २०२४ हे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी निवडणुकीच्या धामधुमीचे आहे. एप्रिल-मे मासांत भारतात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, तर अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. त्यामुळे त्या धामधुमीत शेवटच्या ६ मासांमध्ये बायडेन हे क्वाडसाठी खरोखरच किती वेळ देतील, याविषयी संदेह आहे; म्हणून भेट रहित होण्याचे ते एक कारण होऊ शकते.
दुसरे कारण गुरपतवंतसिंग पन्नू या खलिस्तानवाद्याच्या हत्या करण्याच्या कटाचे आहे. हा तथाकथित कट अमेरिकी गुप्तहेरांनी उघडकीस आणला आणि त्याविषयीच्या आरोपपत्रात ‘कटाचा सूत्रधार’ म्हणून भारतीय गुप्तहेर संघटनेतील एका अनाम अधिकार्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पन्नू हा अमेरिकेचा नागरिक आहे. त्यामुळे ‘अमेरिकी भूमीवर अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा कट’, या दृष्टीकोनातून अमेरिकी प्रशासन या घडामोडीकडे पहाते.
३. भारत-अमेरिका यांच्या संबंधांच्या वाटचालीत खलिस्तानी कट्टरवादी गुरपतवंतसिंग पन्नूचा अडथळा !
बराच काळ सुरळीत चाललेल्या भारत-अमेरिका यांच्या संबंधांच्या वाटचालीत पन्नू याच्या हत्येच्या कटाच्या प्रकरणाचा गतीरोधक आला आहे. पन्नू हा भारताच्या दृष्टीने खलिस्तानवादी आणि खलिस्तान समर्थक फुटीरतावादी गट ‘शीख फॉर जस्टिस’चा म्होरक्या आहे. भारतीय दूतावासातील कर्मचार्यांना तो सातत्याने धमक्या देत असतो. त्याने अलीकडे कॅनडाच्या नागरिकांना ‘एअर इंडिया’च्या विमानांनी प्रवास न करण्याची चेतावणी दिली होती. त्यासाठी त्याने खलिस्तानी आतंकवाद्यांनी भारताच्या ‘कनिष्क’ विमानात घडवलेल्या बाँबस्फोटाची आठवण करून दिली होती. या दुर्घटनेत ३०० हून अधिक प्रवासी मृत्यूमुखी पडले होते. त्यात बहुसंख्य कॅनडाचे नागरिक होते.
‘फायनान्शियल टाइम्स’ या लंडनस्थित अर्थपत्राला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत इतर अनेक सूत्रांसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पन्नू हत्या कटावरही भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘कुणी आम्हाला माहिती दिल्यास आम्ही यात नक्की लक्ष घालू. आमच्या नागरिकाने काही भलेबुरे केले असेल, तर त्याचे अन्वेषण करू. कायद्याच्या संकल्पनेशी आम्ही वचनबद्ध आहोत.’’ न्यूयॉर्कमधील एका न्यायालयात या प्रकरणी रितसर आरोपपत्र प्रविष्ट झाल्यानंतर भारत सरकारने प्रथेप्रमाणे समिती स्थापण्याचा निर्णय घोषित केला. बायडेन यांनी मात्र या प्रकरणावर अद्याप भाष्य केलेले नाही किंवा भेट रहित केल्याविषयीही वक्तव्य केलेले नाही, हे सूचक आहे.
४. निखिल गुप्ता यांना अमेरिकेत अटक आणि भारत सरकारची त्याविषयीची भूमिका !
गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांना चेक प्रजासत्ताकच्या अन्वेषण यंत्रणेने कह्यात घेतले आहे. अमेरिकेने गुप्ता यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ही कारवाई झाली असून ‘निखिल गुप्ता यांना ३ वेळा भारतीय राजदूताशी संपर्क साधू देण्याची मुभा देण्यात आली होती’, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
निखिल गुप्ता यांच्या कुटुंबियांच्या वतीने काही दिवसांपूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या याचिकेच्या माध्यमातून त्यांनी ‘भारताने या प्रकरणात हस्तक्षेप करावा’, अशी मागणी केली आहे, तसेच याचिकेद्वारे कुटुंबियांनी अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. ‘निखिल गुप्ता हा देहली येथील व्यावसायिक असून त्याला चुकीच्या मार्गाने अटक करण्यात आली आहे. यासमवेत त्यांच्याशी कुटुंबियांचा संपर्क होऊ दिला जात नाही. गुप्ता यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले आहे’, असे त्यांच्या कुटुंबियांनी याचिकेत म्हटले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, भारत सरकार हे प्रकरण न्यायालयाच्या प्रक्रियेद्वारे पुढे लढणार आहे.
५. भारताच्या शत्रूंनी त्याच्या विरोधात चालू केलेले माहिती युद्ध !
चीन आजही अमेरिकेचा क्रमांक एकचा शत्रू आहे. चीन तैवानवर आक्रमण करण्याची आकांक्षा आजही बाळगून आहे. अशा विस्तारवादी चीनच्या विरोधात भारतासारखा मित्र अमेरिकेला हवा आहे आणि या वास्तवातही काही पालट झालेला नाही. भारताच्या पाश्चात्त्य जगतातील शत्रूंनी भारताविरुद्ध ‘ऑल आऊट इन्फॉर्मेशन वॉर’ (माहिती युद्ध) चालू केले आहे. गुरपतवंतसिंग पन्नूला ठार मारण्याची भारताची इच्छा असल्याच्या बातम्या अचानक आंतरराष्ट्रीय स्तरावर येत आहेत. ‘मिडिया’विषयक ताज्या अहवालात भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा ‘मेमो लिक’ (टिपण उघड होणे) झाला आहे, ज्यात भारताने हरदीपसिंग निज्जरसह लक्ष्यांची सूची करून खलिस्तान्यांवर कारवाई करण्याविषयी सांगितले आहे. या माहिती युद्धाला आणखी एक परिमाण आहे, ते म्हणजे अमेरिकेच्या मनामध्ये भारताविषयी संशय निर्माण करणे. जर चीनशी युद्ध झाले किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर भारत अमेरिकेचा घात करील आणि चीनविरुद्ध चाललेल्या लढाईमध्ये सामील होणार नाही.
६. अमेरिका कारवाई करण्याचे धाडस करणार का ?
या संशयाचे बीज अमेरिकेतील काही भारतीय वंशाच्या लोकांनी पेरले आहे आणि बाकीचे काम भारताविषयीचे अमेरिकन अज्ञान करत आहे. भारताविरुद्ध अजेंडा चालवणार्यांना लगाम घालण्याचे धाडस आणि क्षमता जो बायडेन अथवा ‘व्हाईट हाऊस’मध्ये आहे का ? कि कॅनडाप्रमाणेच मतपेटीच्या राजकारणाला भुलून बायडेन सरकार खलिस्तानी आतंकवाद्यांना अमेरिकच्या भूमीवर साहाय्य करत राहील ?
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (३०.१२.२०२३)