नगर येथे ‘सुरेल सुवर्ण क्षणांच्या’ संगीत मैफिलीचा कार्यक्रम !
नगर – येथील नादब्रह्म संगीतालयाने आयोजित केलेल्या ‘सुरेल सुवर्ण क्षणांच्या’ संगीत मैफिलीत नीळकंठ देशमुख यांनी नगरच्या इतिहासातील स्मृतींना उजाळा दिला. गतकाळातील प्रसंगांच्या स्मृती पुढ्यात येऊ लागताच उपस्थित स्वतःला हरवून गेले.
गणेशस्तवन, गुरुवंदन, पूर्वसुरींचे स्मरण करून सुरेल सुवर्ण क्षणांच्या संगीत मैफिलीचा श्रीगणेशा करण्यात आला. नगरच्या समृद्ध इतिहासाला उजाळा देतांना शब्द आणि स्वर यांची गुंफण देशमुख आणि नाईक यांनी केली. ऐतिहासिक प्रसंगानुसार भावगीते, भक्तीगीते आणि नाट्यगीते सादर करण्यात आली. ‘स्वये श्रीरामप्रभु ऐकती…’ या भक्तीगीताने मैफिलीस प्रारंभ झाला.
नगर शहरात अनोख्या मैफिलीचा आनंद लुटता आला, अशा प्रतिक्रिया रसिकांमधून उमटत राहिल्या. सौ. वैजयंती देशमुख यांनी मैफलीच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले. श्री. दिनेश देशमुख यांनी स्वागत व प्रास्तविक केले. मैफल यशस्वीतेसाठी शशांक पूरी, शुभम पोपळे, प्रणव लगड व तुषार लगड यांनी विशेष मेहेनत घेतली. श्री. निळकंठराव देशमुख यांची ‘क्षण’ ही पुस्तिका उपस्थित सर्वांना भेट देण्यात आली. मैफिलीची सांगता ‘सोहम् हर डमरू बाजे…’ या गीतानंतर वैष्विक प्रार्थना पसायदानाने झाली.