‘महानंद’ दूध डेअरी ‘राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डा’कडे जाणार !
पुणे – अनागोंदी कारभार, जिल्हा दूध संघांचा असहकार, भ्रष्टाचार आणि राज्य सरकारचा अक्षम्य दुर्लक्षपणा यांमुळे ‘महानंद’च्या (महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित, मुंबई) संचालक मंडळाने ‘महानंद’ दूध डेअरी ‘एन्.डी.डी.बी.’ला (राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड) चालवण्यास द्यावी’, असा ठराव करून सरकारकडे पाठवला आहे. अकार्यक्षम कारभारामुळे राज्याचे वैभव असणारी दूध डेअरी ‘एन्.डी.डी.बी.’ जाणार, हे निश्चित होत आहे.
‘महानंद’चे पिशवीबंद दूध वितरण केवळ ७० सहस्र लिटवर आले आहे. प्रक्रिया प्रकल्पांना दूधच मिळत नसल्याने प्रकल्पातील यंत्रे गंजून जात आहेत. सध्या ९३७ कामगार आहेत. त्यांपैकी ५६० कामगारांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये ‘स्वेच्छा’ निवृत्तीकरता अर्ज केले आहेत; मात्र अद्यापही त्याविषयी निर्णय झालेला नाही. कर्मचार्यांचे वेतन वेळेत देता येत नाही. अशा अनेक कारणांनी ‘महानंद’ चालवण्यास देण्याचा निर्णय झाला आहे.