पिंपरी (पुणे) येथे अग्नीप्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यास व्यावसायिकांकडून टाळाटाळ !
४३ सहस्र व्यावसायिकांवर होणार कारवाई !
पिंपरी (जिल्हा पुणे) – महापालिकेने शहरातील औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक, संस्थात्मक, वैद्यकीय मालमत्तांचे अग्नीप्रतिबंधात्मक सर्वेक्षण हाती घेतले; मात्र व्यावसायिक आस्थापनांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणामध्ये ४३ सहस्र ९२५ आस्थापनांनी अपूर्ण माहिती सादर केल्याचे समोर आले आहे. यामुळे अग्नीसुरक्षेविषयी उपाययोजना नसणार्या आस्थापनांचे नळजोड तोडणे, मालमत्ता लाखबंद (सील) करणे अशी चेतावणी प्रशासनाने दिली आहे.
१. पिंपरी-चिंचवड शहरात ९० सहस्रांहून अधिक व्यावसायिक आस्थापने आहेत. अग्नीसुरक्षा नियमांचे बळकटीकरण आणि काटेकोर पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने महापालिकेने महिला बचत गटांच्या साहाय्याने शहरात सर्वेक्षण चालू केले आहे.
२. ‘सर्वेक्षणाच्या काळात व्यावसायिक आस्थापनांनी परिपूर्ण माहिती द्यावी’, असे आवाहन महापालिकेने केले होते; मात्र त्यात टाळाटाळ केली जात आहे.
३. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले की, आग प्रतिबंधक उपायांमधील त्रुटींकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. अग्नीसुरक्षा उपायांचे पालन आस्थापनांनी केले पाहिजे. सर्व आस्थापने आवश्यक सुरक्षा मानकांचे पालन करतात किंवा नाही, याची निश्चिती सर्वेक्षणाद्वारे केली जात आहे. अग्नीसुरक्षेविषयी सूचनांचे पालन करण्यास टाळाटाळ अथवा दुर्लक्ष करणार्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
संपादकीय भूमिकामहत्त्वपूर्ण असणार्या अग्नीप्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यास टाळण्यातून व्यावसायिकांची असंवेदनशीलताच दिसून येते ! |