आव्हाड यांना २४ घंट्यांत अटक न केल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्याची चेतावणी !
प्रभु श्रीरामावर अश्लाघ्य टीका करणारे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आनंद परांजपे यांच्याकडून कानउघाडणी !
ठाणे – धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदु धर्माचा अवमान करणे नव्हे. धर्मनिरपेक्षता म्हणजे मी अन्य धर्माप्रमाणेच हिंदु धर्माचा मान राखीन. ‘श्रीराम वनवासात मांसाहार करत होता’, असे अकलेचे तारे स्वतःला इतिहाससंशोधक म्हणवणारे जितेंद्र आव्हाड यांनी तोडले आहेत. अभद्र बोलण्याची त्यांची संस्कृती आहे. सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करायचा, ही त्यांची सवय आहे. पुढच्या २४ घंट्यांत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला नाही, तर आम्ही वर्तकनगर पोलीस ठाण्यावर मोठा मोर्चा नेऊ. पुढची महाआरती पोलीस ठाण्यात करू, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आनंद परांजपे यांनी दिली.
खासदार परांजपे पुढे म्हणाले की, शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाविषयी अत्यंत अभद्र टिपणी करून त्यांचा अवमान केला. त्याच्या निषेधार्थ आव्हाड यांच्या घरासमोर श्रीरामाची आरती करण्याची विरू वाघमारे नावाचा कार्यकर्ता गेला होता. त्याला पोलिसांनी पकडले.
रोहित पवार यांच्याकडून आव्हाड यांना घरचा अहेर !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी, ‘कुणी देव-धर्माचे राजकारण करू नये. जनता त्यांना चोख उत्तर दिल्याविना रहाणार नाही’, अशा शब्दांत आव्हाड यांना घरचा अहेर दिला.
श्रीरामभक्तांच्या भावना दुखावण्याची आव्हाड यांची मानसिकता आहे ! – राम कदम, आमदार, भाजप
श्रीरामभक्तांच्या भावना दुखावण्याची जितेंद्र आव्हाड यांची मानसिकता आहे; मात्र मते गोळा करण्यासाठी ते हिंदु धर्माची चेष्टा करू शकत नाहीत. श्रीराममंदिर बांधले गेले आहे, ही वस्तूस्थिती विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला पटलेली नाही, अशी टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली.
आमदार कदम पुढे म्हणाले की, मांसाहार प्रसाद म्हणून कुठे दाखवला जातो ? जर देवतांना मांसाहार प्रिय असता, तर मांसाहार प्रसादात दिसला असता. घरी साधी पूजा जरी असेल, तरी मांसाहार करणारे लोक त्यादिवशी शाकाहार करतात. ४ मित्र मंदिरात जात असतील आणि एकाने मांसाहार केला असेल, तर तो मंदिरात न जाता मंदिराबाहेर थांबतो. हे जितेंद्र आव्हाडांना चांगले माहिती आहे. तरीही हिंदूंच्या भावना दुखवून दुसर्यांना खूश करायचे, यासाठी हे मतपेटीचे राजकारण आहे.