शिबिरासाठी गेल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. साधिकेला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची इच्छा होणे आणि उत्तरदायी साधकांनी साधिकेला ‘शिबिरासाठी रामनाथी आश्रमात जायचे आहे’, असे सांगितल्यावर साधिकेची भावजागृती होणे
‘मी घरी असतांना माझ्या मनात ‘मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे आहे. तेथे साधक परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करतात. ते मला शिकायचे आहे. याविषयी मी सहसाधिकेला सांगितले. त्याच दिवशी उत्तरदायी साधक मला म्हणाले, ‘‘रामनाथी आश्रमात शिबिर आहे. त्यासाठी तुम्हाला तेथे जायचे आहे.’’ तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली. त्या वेळी मला जाणवले, ‘गुरुदेवांच्या कृपेने साधकांच्या मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. ते साधकांकडून अधिकाधिक प्रार्थना करून घेतात आणि साधकांची भावभक्ती वाढवतात.’
२. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिराला गेल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे
अ. शिबिरात साधक विषय मांडत असतांना मला त्यांच्या सभोवती चैतन्याचे वलय दिसत होते.
आ. मी ध्यानमंदिरात गेल्यावर मला जाणवले, ‘माझ्या शरिरातील त्रासदायक शक्ती नष्ट झाली.’ मला हलकेपणा जाणवला.
इ. ध्यानमंदिरातील गुरुदेवांच्या छायाचित्रांकडे बघून मला जाणवले, ‘गुरुदेव मला बघत आहेत आणि ते स्मितहास्य करत आहेत. त्यांच्या छायाचित्रातील चेहर्यावर गुलाबी आणि पिवळा या रंगाच्या छटा आहेत.’
गुरुदेवांनी मला हे भावक्षण अनुभवायला दिले, त्याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. दिया देवदत्त शिरोडकर, सिंधुदुर्ग. (१५.९.२०२३)
|