इंग्रजाळलेल्या भारतियांची विध्वंसकतेकडे होणारी वाटचाल !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे राष्ट्र-धर्माविषयीचे मौलिक विचारधन !
भाषा आणि संस्कृती यांचा अविभाज्य संबंध असल्याने या दोन्हींमधील पाश्चात्त्यांचे अंधानुकरण थांबवणे आवश्यक !
१. हिंदूंना इंग्रजाळलेले होण्याची इच्छा !
‘भारताच्या धमन्यांतून आता पश्चिमी रक्त वाहू लागले आहे. इंग्रजी शिक्षित, अर्धशिक्षित हिंदू यांना अत्याधुनिक होण्याची तीव्र इच्छा आहे. Our dream is modern, Our eating is modern. Even the Hindu ladies giggle like British women. (आमचे स्वप्न आधुनिक आहे, आमचे खाणे आधुनिक आहे. हिंदु स्त्रियासुद्धा ब्रिटीश स्त्रियांप्रमाणे हसतात.) भारतियांना इंग्रजीचा इतका मोह आहे की, एक वेळ इंग्लंडमधून इंग्रजी जाईल; पण भारतातून जाणार नाही. इंग्रजी शिक्षित आणि अर्धवट शिक्षिताला अत्याधुनिक जीवन जगण्याची ओढ आहे. अत्याधुनिकता म्हणजे इंग्रजी बोलता येणे ! खेड्यापाड्यातील मुलांनाही इंग्रजी हवे आहे. त्याकरता ते भरपूर वेतन देऊन इंग्रजी शिक्षक ठेवतात. इंग्रजी येणे, हेच आधुनिकतेचे लक्षण आहे. तिलाच ‘प्रगती’ म्हणतात. ‘‘Everything modern is progressive.’’ (प्रत्येक आधुनिक गोष्ट प्रगतीशील आहे.)
२. पाश्चात्त्य पोशाखाच्या वापरामुळे भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्याची धडपड करावी लागणे
आज आमचा पोषाख पालटला आहे. ‘कोट’ आहे. ‘कॉलर’चा ‘शर्ट’ आहे. तो पाश्चात्त्य वळणाचा आहे. आमची आज दुर्दशा झालेली आहे. पोषाखाच्या संदर्भात असे घडणारच; पण त्यांनाही भारतीयता आणि भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्याची धडपड आहे. प्रत्येक जातीवंत हिंदु पोषाखात ज्वलंत अस्मिता कायम ठेवण्यासाठी धडपडतो. तसे त्याने धडपडावे.
३. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीयता नष्ट होऊन पाश्चात्त्य विचारसरणी रुजणे
दुसरे महायुद्ध समाप्त झाल्यावर आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून आमच्या देशात पाश्चात्त्य, अमेरिकन विचारप्रणाली, श्रद्धा आणि निष्ठा यांचा महापूर वाढला. त्यामुळे आम्हा भारतियांचे जीवन रंगीबेरंगी झाले. सगळे पंतप्रधान पाश्चात्त्य वेशभूषा करतातच. पाश्चात्त्य रहाटीचे त्यांचे खाणे-पिणे, वेशभूषा आणि रितीरिवाज आहेत. आता कसली भारतीयता ? कसली हिंदु संस्कृती ? सरसकट सगळ्या पंतप्रधानांना एकाच सूत्रात बांधू नका. लालबहादूर शास्त्री यांना आठवा ! ते इजिप्तमध्ये गेल्यानंतर स्वतःच्या हातांनी स्वयंपाक करून मगच जेवले.
४. आधुनिकतेमुळे आचार नष्ट होणे
इंग्रजी येणे म्हणजे आधुनिकता ! इंग्रजी संभाषण आणि वेशभूषा म्हणजे आधुनिकता ! आज जे आधुनिक आहे, ते प्रगतीचे लक्षण ! Everything modern is progressive (आधुनिक असणारी प्रत्येक गोष्ट प्रगतीशील आहे.) मद्यपान, मेजवान्या, बॉल डान्सेस् (विशिष्ट प्रकारचे नृत्य), कुमारी मातेची प्रतिष्ठा, नोंदणीकृत विवाह आणि घटस्फोट हे सगळे प्रगत मानवाचे लक्षण !
इंग्रजी इथे स्तनापासूनच शिरते. इथे ‘अम्मा’ आणि ‘आई’ने आरंभ होत नाही, तर मूल पहिला शब्द ‘मम्मी’ उच्चारते. नंतर ‘पप्पा’ ! भारतातील इंग्रजी शिक्षित हिंदु हे कुत्र्याशीही इंग्रजी भाषेतच बोलतात. धोतर तर केव्हाच गेले आहे. तसे बहुतेक आचार नष्ट होत आहेत. ब्राह्मणांची षट्कर्मे गेली. क्षत्रिय वर्णच उरला नाही. इंग्रजी छायेत हिंदूंना पंचांगाची आठवणच उरली नाही. विधीनिषेध कशाशी खातात, हे ठाऊक नाही.
५. मुसलमानांची कट्टरता; पण हिंदूंनी ती बासनात गुंडाळणे
मुसलमान लोक अमेरिका आणि युरोप येथे डुकराचे मांस खात नाहीत. तसे तो अभिमानाने सांगतो आणि हिंदु ! भारताचा किनारा सुटताच जाहीर करतो की, गोमांसाचा आपणाला निषेध नाही. तसे सांगताच त्याची छाती फुगते. गोर्यांसमवेत तर गोमांस विलक्षण चवीने खाण्यात त्याला स्वर्गसुख लाभते !
६. आधुनिकतेमुळे भाषा संस्कृती नष्ट !
इंग्रजी शिक्षणाने, विशेषतः भाषेने संस्कृती नष्ट झाली. भारतात कुठेही जा. शहरातच नव्हे, तर खेड्यापाड्यात शिंपी, न्हावी, धोबी आदी दुकानांच्या पाट्या इंग्रजीत आहेत. ‘शिंपी’ म्हणवून घेणे लाजिरवाणे वाटते; पण ‘Tailor’ (टेलर) म्हणवून घेण्यात भूषण वाटते. तसे ‘हेअर कटिंग सलून’ वगैरे नावे देण्यात सन्मान वाटतो. आमचे जुन्या पठडीतील शास्त्री-भटजी हेही अधून मधून इंग्रजी शब्द उच्चारतात. आपली आधुनिकता ते इंग्रजीद्वारे जगाला दाखवू पहातात.
७. इंग्रजीचा शिरकाव आणि इंग्रजी संस्कृतीचे अंधानुकरण !
इंग्रज दीडशे वर्षे भारतात नांदले. आता इंग्रजी ही भारतीयच झाली आहे. भाषा आणि संस्कृती यांचा अविभाज्य संबंध असतो. सुईमागून दोरा जातो, तसे इंग्रजी भाषेसमवेत इंग्रजी संस्कृती शिरतेच. ‘गुड मॉर्निंग (सुप्रभात), शेक हँड (हस्तांदोलन), थँक्यू (धन्यवाद)’ या प्रथा आमच्यात शिरल्या आहेत. त्यामुळे आमचे आचार आम्ही घालवून टाकले आहेत. २५ वर्षांआधी भारतात आलेले पाश्चात्त्य आम्हाला हात जोडून नमस्कार करायचे. आज कुत्र्यासारखे आम्ही हस्तांदोलनाकरता हात पुढे करतो. निरोप घेतांना ते ‘नमस्ते’ म्हणतात. आम्ही हिंदु मात्र ‘बाय बाय’ म्हणतो किंवा ‘टाटा’ करतो. परकियांशीच नव्हे, तर आपापसातही तसेच वागतो. ‘गुड मॉर्निंग’, ‘ब्रेकफास्ट’ (न्याहरी), ‘लंच’ (दुपारचे जेवण), ‘डिनर’ (रात्रीचे जेवण)’ हे शब्द सर्वत्र रूढ झाले आहे. कुशल प्रश्न इंग्रजीतून केले जातात. ओळख इंग्रजीतून किंवा पाश्चात्त्य पद्धतीने होते. लग्नासारखे समारंभ आधुनिक पद्धतीच्या उपाहारगृहांमधून (हॉटेलमधून) होतात. ‘बुफे डिनर’सारख्या (स्वतःहूनच जेवण वाढून घेण्यासारख्या) पाश्चात्त्य पद्धती अनुसरल्या जातात.
८. तरुण पिढी लिंगपिसाट होण्यास इंग्रजी कारणीभूत !
आज इंग्रजी शाळेतील तरुण मुले, विशेषतः मुली लैंगिक संबंधांविषयी स्वस्तात मिळणार्या अमेरिकन कादंबर्या वाचतात. इंग्रजीतून ‘खुल्लम खुल्ला’ सगळी घाण ओकता येते. त्याविषयी मातृभाषेत लिहितांना संकोच वाटतो. आमच्या तरुण पिढीला अमेरिकेच्या वळणाप्रमाणे लिंगपिसाट बनवायचे काम इंग्रजीने केले आहे.
९. पाश्चात्त्यांच्या आचारांचे भ्रष्ट अनुसरण केले जाणे
इंग्रजी भाषा आल्याने आमची केशभूषा आणि वेशभूषा इंग्रजी झाली. रितीरिवाजही इंग्रजी झाले. पाश्चात्यांच्या आचारांचे भ्रष्ट अनुसरण आमची नवी पिढी करत आहे.’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०२१)