यंदा गोवा अथवा मसुरी नव्हे, तर अयोध्या आणि वाराणसी येथे लोकांची अभूतपूर्व गर्दी !
|
नवी देहली – श्रीरामजन्मभूमीवर बांधलेल्या श्रीराममंदिराला भेट देण्यासाठी भारतभरातील हिंदु जनता उत्सुक आहे. हिंदूंच्या साडेपाचशे वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यातून मिळालेल्या या यशाला डोळे भरून पहाण्यासाठी हिंदू आतुर झाले आहेत. अयोध्येसह वाराणसी, उज्जैन आणि मथुरा या तीर्थक्षेत्रांनाही हिंदू मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत. काहींच्या मते भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी होत असलेले प्रयत्न, हे यामागील कारण आहे. यामुळेच आता गोवा अथवा मसुरी नव्हे, तर अयोध्या आणि वाराणसी येथे कोट्यवधी लोक जात आहेत. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या मागे-पुढे एकूण ५० सहस्र कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
अयोध्या वर्ष २०२४ साठीचे सर्वांत मोठे पर्यटन स्थळ असणार !
आज सांस्कृतिक राष्ट्रनिष्ठेचे वारे वाहत असून तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी हिंदू उत्सुक आहेत. अशा वेळी हिंदूंना केवळ पर्यटन म्हणून नव्हे, तर हिंदु धर्माचे माहात्म्य लक्षात यावे, यासाठीही सरकारने प्रयत्न करावेत !
‘ओयो’ या हॉटेल समुहाचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, वर्ष २०२३ च्या शेवटच्या दिवशी ८० टक्क्यांहून अधिक लोक अयोध्येत रहाण्यासाठीची माहिती शोधत होते. अयोध्या वर्ष २०२४ साठीचे सर्वांत मोठे पर्यटन स्थळ होणार आहे. भारतातील तीर्थक्षेत्रे आता लोकांसाठी सर्वांत आवडती स्थाने झाली आहेत. पुढील ५ वर्षे तरी आध्यात्मि पर्यटन हे पर्यटन व्यवसायाचा ‘नायक’ म्हणून गणले जाईल.
वर्ष २०२४ च्या पहिल्या दिवशी बाबा विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी ८ लाख हिंदू वाराणसीत उपस्थित होते. याच कालावधीत ४ लाख हिंदूंनी गंगानदीच्या विविध घाटांवर स्नान केले. मंदिर प्रशासनाने सांगितले की, यामुळे आजपर्यंत सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. गेल्या वर्षीच्या श्रावण मासात १.५७ कोटी श्रद्धाळूंनी वाराणसीला भेट दिली होती. श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेत ३ दिवसांत १८ लाख लोकांनी दर्शन घेतले. धार्मिक पर्यटनामुळे परिसरातील गरीब जनतेसाठीही रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदु समाज हा धार्मिक आहे. मध्यंतरीच्या काळात विविध कारणांमुळे त्याच्यातील धार्मिक वृत्ती अल्प झाली होती. आता हिंदूंमध्ये धार्मिक वृत्ती वाढत असल्याचे हे द्योतक आहे. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे म्हणणार्यांना ही चपराक आहे ! |