Politics Against Shriram : प्रभु श्रीरामाविषयी राजकारण होणे अपेक्षित नाही ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज
सोलापूर – प्रभु श्रीराम हे सर्व राजकारण्यांच्या वर आहेत. प्रभु श्रीराम हे संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे श्रीरामाचे मंदिर होत आहे. हे काम सर्वांनी एकत्र येऊन करणे अपेक्षित आहे. ‘हमास’ने इस्रायलवर युद्ध लादल्यावर तेथील मंत्रीमंडळ विसर्जित होऊन ‘युद्ध मंत्रीमंडळ’ अस्तित्वात आले. त्याप्रमाणे प्रभु श्रीरामाच्या मंदिरासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणे आवश्यक असून त्यावर राजकारण होणे अपेक्षित नाही, असे प्रतिपादन प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी केले. ते सोलापूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. श्रीराम मंदिराविषयी वार्तालाप करण्यासाठी ही परिषद आयोजित केली होती.
प.पू. स्वीमीजी पुढे म्हणाले,
१. श्रीराममंदिराच्या निर्मितीसाठी लाखो लोकांनी रक्त सांडले आहे. अनेक पिढ्या श्रीराम मंदिराच्या स्थापनेची वाट पहात आहेत. सर्व देश डोळ्यांत प्राण आणून श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा कधी होईल ? याची वाट पहात आहे. त्यामुळे श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेला अधिक विलंब न लावता त्याची स्थापना लवकरात लवकर कशी होईल ? ते आम्ही पहात आहोत. त्यामुळेच आम्ही २२ जानेवारी हा दिवस निवडला.
२. प्रभु श्रीरामाची स्थापना जरी आता होत असली, तर त्यासाठीचे अनुष्ठान गेले कित्येक दिवस अगोदरपासून चालू आहे. महाराष्ट्रातील पुणे येथील ११ जणांचा एक गट गेल्या सवा वर्षापासून तेथे अनुष्ठान करत आहे. हे सर्व ते त्यांच्या खर्चाने करत असून त्यांना त्यासाठी कोणतीही दक्षिणा देण्यात येत नाही. १७ जानेवारीला प्रभु श्रीरामाचे आगमन होईल आणि १८ जानेवारीपासून पूजाविधी चालू होतील. २२ जानेवारीपर्यंत विविध विधी होतील.
३. ‘काही लोकांना निमंत्रण दिले नाही’, असा आरोप होत आहे; मात्र जे लोक निमंत्रण नाकारणार नाही, अशांनाच ते दिले जात आहे. ज्याप्रमाणे ‘पद्म’ पुरस्कार देण्याच्या अगोदर ‘मी हा पुरस्कार नाकारणार नाही’, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते; कारण हा पुरस्कार नाकारणे, म्हणजे देशाचा अवमान असल्यासारखे आहे. श्रीराममंदिर न्यासाकडून प्रत्येकाला निमंत्रण दिले जाऊ शकते; मात्र एखाद्याने निमंत्रण नाकारले, तर ते योग्य होणार नाही.
‘आम्हाला काही विनामूल्य नको’, असा स्वाभिमानी समाज निर्माण करणे, हे शासनकर्त्यांचे कर्तव्य !आज देशात लोकांना विनामूल्य देण्याची चढाओढ लागली आहे. वीजदेयक विनामूल्य, ‘वाय-फाय’ विनामूल्य यांसह अनेक गोष्टी विनामूल्य दिल्या जात आहेत. वास्तविक जे शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत किंवा जे कोणत्याही गोष्टीचे मूल्य देऊ शकत नाहीत, अशांनाच विनामूल्य देणे अपेक्षित आहे. ‘मी घेतलेल्या प्रत्येक गोष्टीचे मूल्य देणे माझे कर्तव्य आहे’, अशा स्वाभिमानी वृत्तीचा समाज निर्माण करणे, हे शासनकर्त्यांचे कर्तव्य आहे. |
प्रभु श्रीरामाविषयी जाणीवपूर्वक वक्तव्ये करून त्यांच्या जीवनमूल्यांना झाकून टाकण्याचा प्रयत्न !काही लोक ‘श्रीराम मांसाहारी होता’, असे वक्तव्य करत आहेत, त्यावर ‘आपले मत काय ?’, असे विचारले असता प.पू. स्वामीजी म्हणाले, ‘‘जे राजकीय लोकप्रतिनिधी मांसाहाराविषयी बोलत आहेत, त्यांच्या नेत्यांपैकी किती जण मांसाहार करतात ? हे पडताळून पहाण्याची आवश्यकता आहे. त्यांची सूची काढली, तर हे सर्व घरी जातील. प्रभु श्रीराम हे क्षत्रिय होते. जाणीवपूर्वक अशा प्रकारची वक्तव्ये करून त्यांच्या जीवनमूल्ये नाकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रभु श्रीराम ज्या जीवनमूल्यांसाठी जगले, त्या मूल्यांकडे आपण पाहिले पाहिजे.’’ |