राज्यातील शिवकालीन वास्तू, शस्त्र, कागदपत्रे आदी ऐतिहासिक ठेव्याचे जतन होणार !
हिंदवी स्वराज्यात योगदान देणार्या मावळ्यांचे वारसदार असलेल्या समितीची स्थापना !
मुंबई, ३ जानेवारी (वार्ता.) – हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत मोलाचा वाटा असलेल्या शिवकालीन घराण्यांच्या ऐतिहासिक वस्तू, शस्त्रे आणि दस्ताऐवज यांचे संवर्धन करण्यासाठी राज्यशासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुरातत्व विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून यामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात योगदान देणार्या मावळ्यांच्या वंशजांचा समावेश केला आहे. या ऐतिहासिक ठेव्यांचा एकत्रित संग्रह करून त्यांचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे.
ही समिती शिवकालीन वास्तू, शस्त्रे आणि दस्ताऐवज यांचा शोध घेणार आहे. यामध्ये सापडणार्या ऐतिहासिक कागदपत्रांचे ‘डिजीटलायझेशन’ (कागदपत्रे ‘स्कॅन’ करून त्यांचे संगणकीकरण करणे) केले जाणार आहे. समितीमध्ये इंद्रजीत जेधे (सरदार कान्होजी राजे जेधे-देशमुख यांचे वारसदार), अनिकेत बांदल (सरदार रायाजी बांदल-देशमुख यांचे वारसदार), श्रीनिवास इंदलकर (सरदार हिरोजी इंदलकर यांचे वारसदार), ऋषिकेश राजेंद्रसिंह नाईक-निंबाळकर (सरलष्कर सिदोजी नाईक-निंबाळकर यांचे वारसदार), नीलकंठ बावडेकर (पंत अमात्य बावडेकर यांचे वारसदार), रवींद्र कंक (सरदार येसाजी कंक यांचे वारसदार), अभयराज शिरोळे (सरदार शिरोळे यांचे वारसदार), बाळासाहेब तथा रामदास सणस (सरदार पिलाजी सणस यांचे वारसदार), गोरख करंजावणे (सरदार जयताजी करंजावणे यांचे वारसदार), सचिन भोसले (बकाजी आणि कोंडाजी फर्जंद यांचे वारसदार) यांचा समावेश आहे. यासह श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडचे सचिव समीर वारेकर आणि कार्याध्यक्ष पांडुरंग ताठेले हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पहाणार आहेत.