महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रातील कुशल कामगारांना इस्रायलमध्ये नोकर्यांची संधी !
मुंबई – केंद्रशासनाच्या ‘नॅशनल स्कील डेव्हलपमेंट इंटरनॅशनल’ आणि राज्यशासन यांच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील कुशल कामगारांना इस्रायल येथे नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘इस्रायलमध्ये बांधकामक्षेत्रात सुरक्षित आणि चांगल्या वातावरणात महाराष्ट्रातील युवकांना काम मिळण्यासाठी राज्यशासन सर्वाेतोपरी सहकार्य करेल’, असे आश्वासन दिले आहे.
बांधकाम क्षेत्रातील ‘फ्रेमवर्क/ शटरिंग कारपेंटर’, ‘बार बेंडिंग मेसन’, ‘सिरेमिक टाइलिंग मेसन’, ‘प्लास्टरिंग मेसन’ इत्यादी विविध कामांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या नोकरीमुळे प्रत्येक कामगाराला १ लाख ४० सहस्र रुपये ते २ लाख रुपयांपर्यंत प्रतीमास वेतन दिले जाणार आहे. इस्रायला जाणार्याला १६ सहस्र रुपये इतका निधी ठेव म्हणून ठेवावा लागणार आहे. २५ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींनाच नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवाराचे किमान १० व्या इयत्तेपर्यंत शिक्षण झालेले असावे. काम करण्यासाठी किमान १ ते ५ वर्षे नोकरी करणे अनिवार्य रहाणार आहे. बांधकामक्षेत्रात किमान ३ वर्षे कामाचा अनुभव असावा, तसेच संबंधित व्यक्ती किंवा कुटुंबीय यांनी इस्रायलमध्ये नोकरी केलेली नसावी, अशी अट आहे. नोकरीसाठी ‘https://rojgar.mahaswayam.gov.in/#/mic’ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ८२९१६६२९२० या क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.