मुंबई महापालिका मनोरंजन करात वाढ करणार !
मुंबई – मुंबईतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सर्कस, आनंदबाजार यांचे प्रयोग आणि खेळ यांच्यावरील रंगभूमी करात वाढ करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. गेल्या १३ वर्षांत ही करवाढ करण्यात आली नव्हती. २०२४-२५ या वर्षासाठीच हे नवीन कर प्रस्तावित करण्यात आले असून राज्य सरकारने संमती दिल्यावर हे कर लागू होतील. त्यामुळे वरील सर्व गोष्टींच्या तिकिटाचे दरही वाढण्याची शक्यता आहे. सध्या करापोटी प्रत्येक खेळामागे ५० ते ६० रुपये आकारले जात आहेत. या कराच्या दरात प्रतिवर्षी १० टक्के वाढ करावी, असा प्रस्ताव महासभेत वर्ष २०१५ मध्ये संमत झाला होता. इतक्या वर्र्षांनंतर आता त्यात वाढ करण्याचा निर्णय करनिर्धारण आणि संकलक विभागाने घेतला आहे. ही करवाढ लागू झाल्यास पालिकेला वार्षिक १० कोटींचा महसूल मिळणार आहे. ‘मल्टीप्लेक्स’ चित्रपटगृहावरील करमणूक करात अधिक वाढ करण्याचे पालिकेने ठरवले आहे.