अभूतपूर्व सोहळा होण्यासाठी…
अयोध्येतील रामजन्मभूमीत उभारण्यात येत असलेल्या श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी या दिवशी होणार आहे. यानिमित्त अनेक शहरांत प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक, तसेच दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सर्वच रामभक्तांच्या भावना, मन या दिव्य सोहळ्याशी जोडले गेले आहे. प्रत्येकालाच या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन ‘याची देही याची डोळा’ सोहळ्याचा आनंद घेण्याची मनीषा असणार आहे; परंतु निश्चितच काही मर्यादाही असू शकतात. भारत सरकारच्या नियोजनानुसार हा सोहळा अत्यंत कडेकोट सुरक्षेत पार पडणार आहे. सर्वच रामभक्तांना अयोध्येत जाऊन प्रत्यक्षपणे त्या सोहळ्यात सहभागी होता येणे अवघड आहे; म्हणूनच देशभरातील सहस्रो मंदिरांमध्ये या दिव्य सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी यापूर्वीच घोषित केले आहे. आपण रामभक्त मनाने त्या ठिकाणी निश्चितच उपस्थित राहू शकतो.
त्यासाठी स्थानिक स्तरावर दिवसभर रामनामाचा जप करणे, प्रभु श्रीरामचंद्राच्या मूर्तींची मिरवणूक, तसेच नामदिंडी काढणे यांसह निरनिराळे धार्मिक कार्यक्रम या दिवशी आयोजित करू शकतो, जेणेकरून रामभक्तांना आपले आराध्य दैवत प्रभु श्रीरामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रत्यक्षात अनुभवता येईल; मात्र मिरवणुकीत ध्वनीवर्धकावर मोठमोठ्याने गाणी लावून, अशोभनीय नृत्य करून हे साध्य होणार नाही. शांततेने रामनाम घेत आणि शिस्तीचे पालन करत शोभायात्रा काढल्यास दैवी आनंद मिळू शकेल. आपण प्रत्येकानेच या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ‘रामाचा दास’ म्हणून मी काय करू शकतो ?’ याचे चिंतन करूया. प्रत्येक मंदिरात दिवसभर ध्वनीवर्धकावर ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप हळू आवाजात लावून ठेवल्यास दिवसभरात रामनामाचे स्मरण होईल. रामनामाचा उद्घोष करून आनंद मिळवूया. हे पारमार्थिक कार्य होत असतांना उल्लेखल्याप्रमाणे सर्व वयोगटातील रामभक्तांनी प्रभु श्रीरामाला आजपासूनच प्रार्थना करूया. त्याला आळवून प्रार्थना करूया, ‘हे प्रभु, प्रदीर्घ लढ्यानंतर आणि प्रतीक्षेनंतर आता आपली जन्मभूमी अयोध्यानगरी येथे आपल्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या सोहळ्यामध्ये येणारे सर्व प्रकारचे अडथळे आपणच दूर करा. आम्हा सर्व रामभक्तांना या सोहळ्याचा परमानंद अनुभवता येऊ द्या. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडू द्या.’ रामनामाचा अखंड जप आणि प्रार्थना केल्याने या अभूतपूर्व सोहळ्याला दैवी ऊर्जा प्राप्त होईल !
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.