संस्कृत भाषेचे सौंदर्य : वैद्यांसंबंधित सुभाषिते
वैद्य प्राण आणि धन दोन्ही हरण करतात !
वैद्यराज नमस्तुभ्यं यमराजसहोदर ।
यमस्तु हरति प्राणान् वैद्यो प्राणान् धनानि च ॥
अर्थ : हे वैद्यराजा, तुला नमस्कार असो. तू यमराजाचा सख्खाभाऊ आहेस. यम नुसते प्राण हरण करतो. वैद्य प्राण आणि धन दोन्हीही हरण करतो.
वैद्याने यमाचा कार्यभार हलका करणे
वैद्य वैद्य नमस्तुभ्यं क्षपिताशेषमानव ।
त्वयि विन्यस्तभारोऽयं कृतान्तः सुखमेधते ॥
अर्थ : वैद्यराजा, तुला नमस्कार असो. सारे मानव तुझ्या कह्यात आहेत. तुझ्यावर भार सोपवून यमसुद्धा सुखाने निश्चिंत रहातो. खरे तर यमाचा कार्यभार वैद्य हलका करतात.
वैद्य कसा असावा ?
गुरोरधीताखिलवैद्यविद्यः पीयूषपाणिः कुशलः क्रियासु ।
गतस्पृहो धैर्यधरः कृपालुः शुद्धोऽधिकारी भिषगीदृशः स्यात् ॥
अर्थ : गुरूंकडून सर्व वैद्यविद्या शिकलेला, हातात अमृताप्रमाणे औषधी असलेला, कार्यात कुशल, निरीच्छ, धैर्यवान, कृपाळू आणि शुद्ध आचरणाचा अधिकारी असा वैद्य असावा.