महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्य कौतुकास्पद ! – पूज्य मुनी श्री १०८ पूज्य सागरजी महाराज

पूज्य मुनी श्री १०८ पूज्य सागरजी महाराज

अमरावती, ३ जानेवारी (वार्ता.) – येथील भातकुली तालुक्यात श्री आदिनाथ स्वामी दिगंबर जैन देवस्थान येथे महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मंदिर विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी आचार्य विद्यासागरजी महाराज, मध्यप्रदेश यांचे शिष्य पूज्य मुनी श्री १०८ पूज्य सागरजी महाराज हे मंदिरात वास्तव्यास असल्याचे कळल्यावर महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेतली. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. २० जानेवारी २०२४ या दिवशी अमरावती येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी महाराजांचे आशीर्वाद घेण्यात आले.

आचार्य विद्यासागरजी महाराज, मध्यप्रदेश

या वेळी पूज्य मुनी श्री १०८ पूज्य सागरजी महाराज म्हणाले, ‘‘तुम्हाला तुम्ही करत असलेले कार्य विशेष प्रयत्न करून सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही शांतीने कार्य करत रहा. तुमचे कार्यच जगाला तुमची ओळख करून देईल. मंदिराविषयीचे कार्य पुष्कळ कौतुकास्पद आहे. या कार्यात दिगंबर जैन समाजानेसुद्धा मोठ्या प्रमाणात जोडावे. मंदिरांचे कार्य करणार्‍या मंडळींनी स्वतःमधील सात्त्विकता वाढवण्यासाठी मद्य-मांस यापासून दूर रहावे. मंदिर महासंघाने मंदिर क्षेत्र हे मद्य-मांस विक्री विरहित करण्याचे चालवलेले प्रयत्न निश्चित यशस्वी होणारच आहेत.’’

हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सांगितलेली साधनेविषयीची माहिती त्यांनी श्रद्धापूर्वक जाणून घेतली आणि ‘नामजप आणि स्वभावदोष-निर्मूलन करणे ही साधना व्यक्तीचे खर्‍या शिष्यामध्ये रूपांतर होण्यासाठी आवश्यक आहे’, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अनुप जयस्वाल, जैन मंदिराचे विश्वस्त श्री. गौरव राऊळ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे उपस्थित होते.