हिंदु संस्कारांमुळे जगात भारत देश महान ! – प.पू. महेशानंद महास्वामीजी हंचिनाळ
खडकलाट (बेळगाव) येथे भावपूर्ण वातावरणात श्रीमद्भगवद्गीता दिंडीची मिरवणूक आणि सोहळा !
खडकलाट (जिल्हा बेळगाव), ३ जानेवारी (वार्ता.) – हिंदु संस्कारांमुळे जगात भारत देश महान आहे. परकियांना मंदिरे फोडता आली; मात्र हिंदूंच्या मनातील भक्ती आणि संस्कार त्यांना तोडता आले नाहीत. पालकांनी मुलांना चांगले संस्कार द्यावेत. संस्कारहीन मानव पशूसमान आहे. मानवजन्म पुन्हा येत नसल्याने चांगले कार्य करून मानवी जीवन सार्थकी लावा. संस्कारमंथन केल्यानंतर आपण मोठे आणि समृद्ध होऊ शकतो. धर्माचे कार्य पुढे नेणार्या गगनगिरी ध्यानमंदिरास भाविकांनी हातभार लावावा. प्रतिदिन मूठभर तांदुळ आणि १ रुपया मंदिराच्या वाढीसाठी द्यावा, असे आवाहन हंचिनाळ येथील भक्तियोगाश्रमाचे प.पू. महेशानंद महास्वामीजी यांनी येथे केले. येथे गगनगिरी ध्यानमंदिरात नुकत्याच आयोजित केलेल्या सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते.
ज्ञानदासो आणि अन्नदासोह हे दोन्ही महत्त्वाचे आहेत ! – प.पू. श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी, श्री सिद्धेश्वर मठ, हत्तरगी (कर्नाटक)
श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी म्हणाले, ‘‘ज्ञानदासोह (ज्ञान ग्रहण करणे) आणि अन्नदासोह (अन्न ग्रहण करणे) हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. डोक्यासाठी म्हणजे चांगल्या संस्कारांसाठी ज्ञानदासोहाची आवश्यकता आहे. यासाठी आधी अन्नदासोह महत्त्वाचे आहे. संतसंगतीनुसार वाटचाल करून संतांचे विचार समजून घ्या.’’
भक्तीमय वातावरणात श्रीमद्भगवद्गीता दिंडीची मिरवणूक !
खडकलाट येथे अपूर्व भक्तीमय वातावरणात भगवद्गीता दिंडीची मिरवणूक काढण्यात आली. स्वामीजी आणि पुरुषोत्तम महाराज यांच्या हस्ते प.पू. गगनगिरी महाराज यांची गादी आणि पालखी यांची पूजा करण्यात आली. प.पू. गगनगिरी ध्यान मंदिर आणि चिक्कोडी अन् निपाणी तालुक्यांतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने भगवद् दिंडी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. बसस्थानकापासून ते गगनगिरी ध्यानमंदिरापर्यंत भगवद् दिंडीचे भाविकांकडून उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. महास्वामीजींच्या प्रतिमेची फुलांनी सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ठिकठिकाणी महिला भाविकांनी पाणी घालून पालखीचे औक्षण केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. ‘सनातन धर्म’, कर्नाटक राज्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या हस्ते मान्यवरांना श्रीमद्भगवद्गीता ग्रंथ भेटू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
श्री महेशानंद महास्वामीजी यांच्या ‘दीप बेळगुतीदे’ या संगीत आरतीने प्रवचनाची सांगता झाली. या वेळी महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. सोनल किल्लेदार यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.
उपस्थित संत आणि मान्यवर…
या सोहळ्यास घोडगिरी विरक्त मठाचे म.नि.प्र. श्री काशिनाथ महास्वामीजी, हंचिनाळ भक्तियोगाश्रमाचे प.पू. श्री महेशानंद महास्वामीजी, खडकलाट येथील अप्पनवर कुमारेश्वर विरक्त मठाचे म.नि.प्र. श्री. शिवबसव महास्वामाजी, कणेगाव येथील दक्षिण भारत सनातन धर्मप्रचारक प.पू. श्री महंतदादा महाराज, दर्याचे वडगाव येथील कीर्तनकार ह.भ.प. धोंडीराम मगदूम महाराज, श्री गगनगिरी ध्यानमंदिराचे आधारस्तंभ आणि युवा नेते राकेशअण्णा चिंचणे, नगरसेवक गणेश माळी, युवा नेते सतीशअण्णा पाटील, श्री गगनगिरी ध्यानमंदिराचे अध्यक्ष श्री. अण्णासो माळी आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
क्षणचित्रे…
१. म.नि.प्र. श्री. शिवबसव महास्वामाजी यांनी गगनगिरी ध्यानमंदिराचे संस्थापक श्री. पुरुषोत्तम माळी यांचे कौतुक करून ध्यानमंदिरास शुभेच्छाही दिल्या.
२. तनुश्री भोसले (मोतीवाला) यांच्याकडून पावसाचे वाया जाणारे पाणी कसे साठवून ठेवावे ? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले.
३. मळणगाव भजनी मंडळाने २ घंटे केलेल्या भजनसेवेने भाविक मंत्रमुग्ध झाले.
४. मळणगाव भजनी मंडळ आणि भाविक यांच्याकडून श्री. पुरुषोत्तम माळी यांना स्कॉर्पिओ वाहन प्रदान करण्यात आले.