वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील साधक कु. अर्जुन सरोज (वय १७ वर्षे) याला रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर स्वतःमध्ये जाणवलेले कल्पनातीत पालट !
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वैकुंठरूपी आश्रमात (रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात) येण्याची संधी दिल्याने कृतज्ञता वाटणे
‘सर्वप्रथम गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. प.पू. गुरुदेवांनीच मला या वैकुंठरूपी आश्रमात येण्याची संधी दिली. मला इकडे येण्यासाठी पुष्कळ अडचणी येत होत्या. रेल्वे २० घंटे उशिरा येणार होती. तेव्हा माझ्या घरचे सदस्य मला ‘जाऊ नको’, असे म्हणत होते; परंतु माझ्या मनाचा पक्का निर्धार झाला होता, ‘मला जरी उभे राहून प्रवास करावा लागला, तरी चालेल; पण काहीही करून मला जायचेच आहे.’ असे म्हणतात ना, ‘तुम्ही देवाच्या दिशेने एक पाऊल टाकले, तर देव १० पावले टाकून आपल्याजवळ येतो.’ तेव्हा गुरुदेवांनी १० पावले चालत येऊन मला खरोखरच आपल्या धामी आणले. यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
२. आश्रमात आल्यावर शिकायला मिळालेली सूत्रे आणि स्वभावात झालेले पालट
अ. पूर्वी माझ्या मनात चिडचिडेपणा, राग, आळशीपणा, अनावश्यक वेळ घालवणे, कुणी काही म्हटले, तर त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करणे आणि मनानुसार करणे, असे सर्व अयोग्य संस्कार होते.
आ. मी गुरुदेवांच्या वैकुंठरूपी आश्रमात आल्यानंतर ‘येथील चैतन्यमय वातावरणात आणि आश्रमाच्या कणाकणांत ईश्वराचा वास आहे’, हे माझ्या लक्षात आले. ‘प्रत्येक कार्य वेळेत आणि शांततेने परिपूर्ण कसे करावे ?, तसेच ईश्वराच्या अनुसंधानात राहून सर्व कार्य वेळेवरच होते’, हे मला शिकायला मिळाले.
इ. ‘प्रतिदिन एक एक ध्येय घेऊन प्रयत्न करायचे आणि आपले स्वभावदोष अन् अहं यांना नष्ट करून ईश्वराशी कसे एकरूप व्हायचे ?’, हे मला आश्रमात शिकायला मिळाले.
३. आश्रमात आल्यावर साधकाने साधनेसाठी केलेले प्रयत्न
पूर्वी माझ्या मनात अयोग्य विचार येत होते. कुणाला पाहिले की, माझ्या मनात पुष्कळ विचार यायचे; परंतु आश्रमात आल्यावर एक एक ध्येय घेऊन प्रयत्न केल्यानंतर, उदा. प्रार्थना, कृतज्ञता, आवरण काढणे, प्रत्येक कृतीला भावाची जोड देणे, प्रत्येक वस्तूवर प्रेम करणे, आपल्या चुकांवर नियंत्रण ठेवणे, चुका सारणीत लिहिणे, साधकांची क्षमा मागणे, स्वतःच्या चुका इतरांना विचारणे, त्या मनापासून स्वीकारणे, सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे, चुका झाल्या, तर प्रायश्चित्त घेऊन पापक्षालन करणे, स्वयंसूचना सत्रे करणे, आत्मनिवेदन करणे, प्रतिदिनची दैनंदिनी भरणे, भावजागृतीचे प्रयत्न वाढवणे, स्वकर्तेपणाचा आढावा घेणे, ही सर्व प्रक्रिया शिकायला मिळाली.
४. साधनेसाठी प्रयत्न केल्यावर साधकाला झालेली साधनेची फलप्राप्ती (साधकाच्या स्वभावात झालेले पालट) !
असे प्रयत्न केल्यावर आता माझे मन एकदम स्थिर आणि शांत रहाते. राग येणे, आळशीपणा, स्वतःला श्रेष्ठ समजणे, प्रतिक्रिया व्यक्त करणे, हे सर्व नष्ट झाले आहे. आता मला असे वाटते, ‘माझे मन आणि शरीर एकदम रिकामे झाले आहे.’ आता कुणी मला काही सांगितले, तर ते मला त्वरित स्वीकारता येते. माझ्याकडून काही चुका झाल्या, तर क्षमा मागता येते. माझ्या मनात अखंड नामजप चालू असतो आणि ‘साधकांच्या रूपात गुरुदेवच आहेत, ते माझ्या चुका सांगून माझ्या साधनेत साहाय्य करत आहेत’, असेच मला वाटते. आता मला ‘प.पू. गुरुदेव माझ्याजवळ क्षणोक्षणी असतात. मी सतत गुरुदेवांशी बोलत असतो आणि ‘गुरुदेव माझ्या समवेत राहून माझ्याकडून सेवा करून घेत आहेत’, असे अनुभवता येते. येथे आल्यानंतर माझे संपूर्ण जीवनच पालटले. मला भगवंताच्या या वैकुंठरूपी आश्रमात आल्यानंतर माझ्या मनात जे अयोग्य विचार आणि अयोग्य संस्कार होते, ते नष्ट होऊन एक चांगला साधक बनण्याचा मार्ग मिळाला आहे.
५. साधकाला जाणवलेले आश्रमात राहून साधना करण्याचे महत्त्व
मला जे संस्कार या आश्रमात मिळाले, ते संस्कार, आम्ही बाहेर कितीही पैसे खर्च केले, तरीही आम्हाला जगात कुठेच मिळू शकत नाहीत. साधना करणे हाच आमच्या जीवनाचा एकमेव योग्य मार्ग आहे आणि ती साधना केवळ येथेच प्राप्त होते.
६. रामनाथी आश्रमात आल्यानंतर ‘येथेच जीवनाचा उद्धार होईल’, असे वाटणे
येथे आल्यानंतर मला असे वाटले, ‘आता मी अगदी योग्य ठिकाणी आलो आहे. माझ्या जीवनाचा उद्धार येथेच होणार आहे. ‘हे भगवंता, जोपर्यंत माझा श्वास चालू आहे, तोपर्यंत या बालकाला आपल्या चरणांवरील एक पुष्परूपी कण बनवून ठेवावे. माझे हे तन आणि मन आपल्याला समर्पित आहे. आपल्याला अपेक्षित अशी साधना आपण या बालकाकडून करून घ्यावी आणि या बालकाचे बोट धरून साधनेतील एकेका मार्गावरून पुढे घेऊन जावे’, अशी आपल्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’
– कु. अर्जुन सरोज (वय १७ वर्षे), वाराणसी, उत्तरप्रदेश. (१.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |