अयोध्या विमानतळाला महर्षि वाल्मीकि यांचे नाव प्रभु श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर २०२३ या दिवशी अयोध्या येथे नव्याने बांधलेल्या ‘महर्षि वाल्मीकि विमानतळा’चे उद्घाटन केले. हे नामकरण अयोध्येतील भव्य राममंदिराचे उद्घाटन आणि प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे. त्या निमित्ताने महर्षि वाल्मीकि यांच्याविषयी जाणून घेणे संयुक्तिक ठरावे.
१. पहिले महाकाव्य ‘रामायणा’चे रचियते !
महर्षि वाल्मीकि यांना ‘आदी कवी’ किंवा ‘पहिले कवी’ म्हणून संबोधले जाते. संस्कृत साहित्य परंपरेतील पहिले महाकाव्य मानले जाणारे रामायण रचण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. रामायणाचे वर्णन नेहमीच ‘पहिली साहित्यिक रचना’, असे केले जाते.
२. रामायणातील बाल आणि उत्तर कांडातील महर्षि वाल्मीकि !
‘वाल्मीकि रामायण’ हे ७ कांडांमध्ये विभागलेले आहे. प्रत्येक भाग भगवान श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांवर प्रकाशझोत टाकतो. बालकांड हा प्रारंभिक, तर उत्तरकांड हा शेवटचा भाग आहे. बालकांडाचा प्रारंभ हा वाल्मीकि ऋषि आणि नारदमुनी यांच्या संवादाने होतो. ‘या जगात कुणी नीतीमान मनुष्य शिल्लक आहे का ?’, असा प्रश्न वाल्मीकि ऋषि नारदमुनींना विचारतात. तेव्हा नारद उत्तरादाखल ‘राम’ हे नाव घेतात. त्यानंतर वाल्मीकि स्वतःचे कथन चालू करतात. उत्तरकांडात प्रभु श्रीरामांनी सीतेचा त्याग केल्यानंतरच्या प्रसंगाचे वर्णन येते. सीतेला महर्षि वाल्मीकि यांच्या आश्रमात आश्रय लाभतो आणि तिथे ती जुळ्या मुलांना जन्म देते. हीच दोन जुळी मुले, म्हणजे लव आणि कुश. हेच दोघे पुढे महर्षि वाल्मीकि यांचे शिष्य होतात. बालकांडात वाल्मीकि आपल्या शिष्यांना रामाची कथा कथन करतात.
३. संत तुलसीदास यांचे ‘रामचरितमानस’ अधिक लोकप्रिय !
भारत आणि भारतीय उपखंडात रामायणाच्या अनेक आवृत्त्या आहेत. तरीही रामायणाचे मूळ कर्ते महर्षि वाल्मीकि हेच असल्याचे सर्वश्रुत आहे. रामायणाच्या आवृत्त्या अनेक असल्या, तरी त्यात संत तुलसीदास यांचे ‘रामचरितमानस’ हे अधिक लोकप्रिय आहे. १६ व्या शतकातील संत तुलसीदास यांची आवृत्ती शास्त्रोक्त संस्कृतऐवजी स्थानिक अवधी भाषेमध्ये रचली गेली आहे. ही तुलसी रामायणाच्या सध्याच्या लोकप्रियतेची गुरुकिल्ली आहे, तर दुसर्या बाजूला महर्षि वाल्मीकि यांचे रामायण साहित्यातील एक उत्कृष्ट कलाकृती असली तरी, बहुतेकांसाठी ते अगम्य आहे. ‘रामचरितमानस’ने रामाची कथा सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली. ‘रामचरितमानस’ हे रामलीलेच्या परंपरेशी संबंधित आहे.
४. महर्षि वाल्मीकि यांचा दरोडेखोर ते संत असा प्रवास !
महर्षि वाल्मीकि यांच्या जातीवरील वादामागे एक मुख्य कथा आहे. वाल्मीकि हे ऋषि होण्यापूर्वी रत्नाकर म्हणून प्रसिद्ध होते. एक भयंकर डाकू आणि शिकारी म्हणून ओळखले जात होते. काही कथांच्या संदर्भानुसार वाल्मीकि हे लहान असतांना वनात हरवले होते, त्यांचा जन्म हा ब्राह्मण आई-वडिलांच्या पोटी झाला होता. ते वनात हरवल्यानंतर एका शिकारी जोडप्याने त्यांना दत्तक घेतले. याच कथेच्या दुसर्या आवृत्तीनुसार वाल्मीकि यांचा जन्म भिल्ल राजाच्या पोटी झाला होता. त्या कथेनुसार वाल्मीकि गावकरी आणि प्रवाशांना लुटून उदरनिर्वाह करत असत. एक दिवस वाल्मीकि यांची नारदमुनींशी गाठ पडली आणि त्याचे आयुष्य पालटले. इतरांप्रमाणे नारदमुनी रत्नाकरला घाबरले नाहीत, इतकेच नाही, तर त्यांनी त्याच्याशी हळूवारपणे आणि प्रेमाने संवाद साधला, तसेच त्याला जाणीव करून दिली, ‘आपण जे करत आहोत, ते चुकीचे आहे आणि त्याने स्वतःचा मार्ग सुधारणे आवश्यक आहे.’ रत्नाकरने नारदमुनींना त्याला क्षमा करण्याची आणि त्याच्या दुष्कृत्यांचे प्रायश्चित्त करण्यासाठी साहाय्याची प्रार्थना केली. नारदांनी रत्नाकरला एक साधा मंत्र दिला, तो मंत्र म्हणजे प्रभु श्रीरामाचे नाव होते. अशा प्रकारे रत्नाकरचे परिवर्तन चालू झाले. तो रामनामात ध्यानमग्न झाला आणि कालांतराने वाल्याचा वाल्मीकि, म्हणजेच रत्नाकरचे ‘महर्षि वाल्मीकि’ झाले.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (३१.१२.२०२३)