भारताची विश्वशक्तीकडे वाटचाल ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या तुलेचा विशेष कार्यक्रम !
सोलापूर – अमेरिकेत सर्व भौतिक सुखे आहेत; मात्र तेथे संस्कार नाहीत. याउलट भारत असा देश आहे की, जिथे अद्यापही संस्कार टिकून आहेत. सध्या देशातील वातावरण पालटत असून भारत विश्वशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. विश्वशक्ती होण्याच्या प्रक्रियेत ज्या संस्कारी मनुष्यबळाची आपल्याला आवश्यकता आहे, त्यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न हवेत, असे मार्गदर्शन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष अन् श्रीकृष्ण जन्मभूमीचे उपाध्यक्ष असलेले प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी केले. सोलापूर येथील प्रसिद्ध लेखापरीक्षक श्री. राजगोपालजी मीणियार परिवाराच्या वतीने २ जानेवारीला प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने (७५ वर्षे पूर्ण झाल्याविषयी) त्यांची तुला करण्यात आली. त्या प्रसंगी ते बोलत होते.
हा कार्यक्रम ‘प्रभाकार हाऊसिंग सोसायटी’च्या उद्यानात पार पडला. या तुलेमध्ये प्रामुख्याने तीळ, गूळ, विविध प्रकारची धान्ये, तुळशीवृंदावन, वस्त्र अर्पण करण्यात आले होते. या प्रसंगी श्री. संजय डागा यांच्यासह परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज पुढे म्हणाले, ‘‘अयोध्या येथे दर्शन घेणार्या लोकांना प्रसाद मिळावा, यासाठी आम्ही ४५ ठिकाणी अन्नदान सेवा चालू करणार आहोत. हा प्रसाद त्यांना मंदिराजवळच मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आळंदी येथे ४ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत भव्य-दिव्य अमृत महोत्सवी कार्यक्रम होत आहेत. तेथे भागवत्कथा होणार असून आयुष्यभर ज्यांनी राष्ट्र, धर्म, अध्यात्मप्रसारासाठी कार्य केले, अशा ७५ समर्पित लोकांचा सत्कार होणार आहे. लवकरच याची सविस्तर निमंत्रण पत्रिका लोकांसाठी उपलब्ध होईल.’’
क्षणचित्रे
१. श्री. राजगोपालजी मणियार आणि सौ. लक्ष्मीदेवी मणियार या दांपत्याने प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची पाद्यपूजा केली.
२. अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर तेथे ४५ दिवस लोकांना भंडारा (अन्नदान) देण्याचा संकल्प श्री. राजगोपालजी मीणियार यांनी केला असून त्यासाठी विशेष साहाय्य आणि सेवा देणारे श्री. रंगनाथजी बंकापुरे, तसेच चंद्रिकादेवी चव्हाण यांना महाराजांनी विशेष आशीर्वाद दिला.
३. ५ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत प्रतिदिन ४ सहस्र लोक याचा लाभ घेणार आहेत. सोलापुरातील अनेक मान्यवर या अन्नदान सेवेत तन-मन-धन यांनी सहभागी होणार आहेत.
४. ‘श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यात सोलापूरचे योगदान देशात सर्वाधिक आहे’, असे गौरवोद्गार या प्रसंगी महाराजांनी काढले.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची भेट घेऊन त्यांना ३ जानेवारी या दिवशी सोलापूर येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रण दिले. महाराजांनी ‘माझे समितीच्या कार्याला नेहमीच आशीर्वाद आहेत’, असे सांगितले. या प्रसंगी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, पू. दीपाली मतकर आणि श्री. हिरालाल तिवारी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाभारत विश्वगुरु बनत असतांना त्यासाठी प्रत्येक भारतियाने स्वत:ला सिद्ध करणे, ही काळाची आवश्यकता ! |