‘अँटीबायोटिक्स’ना (प्रतिजैविकांना) पर्याय आहे !
‘अँटीबायोटिक्स’ (प्रतिजैविक) हा सध्या जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये दोन प्रमुख कारणे आहेत.
१. अँटीबायोटिक रेझिझटन्स (Antibiotic resistance – प्रतिजैविकांचा प्रतिकार)
म्हणजे अव्वाच्या सव्वा किंवा अनाठायी वापरामुळे किंवा रुग्णाने दिलेला ‘कोर्स’ (किती दिवस कोणती औषधे घ्यायची याचा क्रम) नीट पूर्ण न केल्यास अनेक ‘बॅक्टेरीया’ (जीवाणू) एक एक करत ‘अँटीबायोटिक्स’ना बधणे थांबतो आणि मग पुढच्या उपचारांना अडथळा निर्माण होतो.
२. गुट मायक्रोबियोमी डॅमेज (Gut microbiome damage – सामूहिक सूक्ष्मजीव समूहाची हानी)
म्हणजे पचनसंस्थेतील चांगले बॅक्टेरीयाही अँटीबायोटिक्समुळे अकारणच मरतात. परिणामी असंख्य व्याधी पुढे जाऊन उत्पन्न होतात. यासाठी ‘अँटीबायोटिक्स’सहच ‘प्रोबायोटिक्स’ (स्वतःच्या आरोग्यासाठी हातभार लावणारे चांगले जीवाणू) देण्यासारखे मार्ग वापरले जातात; मात्र अर्थातच ते अपुरे आहेत.
३. काही महत्त्वाची सूत्रे
अ. आपल्या देशात जितक्या सर्रास अँटीबायोटिक्स दिले जातात, तितकी प्रगत देशात कधीच दिली जात नाहीत. किंबहुना ते तसे देऊ नयेत, याविषयी जागतिक आरोग्य संघटना सातत्याने सांगत आहे. सर्रास अँटीबायोटिक्स देण्यामागे रुग्णांचा आग्रह हे कारण बर्याचदा दिले जाते. यानिमित्ताने रुग्णांनी तसा आग्रह न धरण्यातच त्यांचे भले आहे, हे आवर्जून सांगू इच्छितो; पण समजा त्यांनी तो आग्रह धरला नाही, तरी त्याचा पर्याय सध्याच्या पाश्चात्त्य वैद्यकाकडे आहे का ?
आ. दुसरीकडे ‘रुग्णच अँटीबायोटिक्सचा आग्रह धरतात’, हे गृहितक खरे मानल्यास ‘अँटीबायोटिक्स नको’, असे म्हणून आमच्याकडे येणार्या रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे. याचा मेळ कसा बसवणार ? किंवा मग याविषयी एकूणच सजगता वाढत आहे आणि आयुर्वेदाचा भक्कम पर्याय समोर आहे, हे जनतेला लक्षात येत आहे, असेच म्हणावे लागेल !
इ. या विषयाशी संबंधित काही वेगळी मांडणी करणारे लेख येताच ‘अँटीबायोटिक्स आवश्यकच असतात’, असे एक समूह म्हणतो. त्याच वेळी ‘आम्ही आवश्यक असेल तेव्हाच अँटीबायोटिक्स देतो. त्याचा अनाठायी वापर टाळावा’, असे सांगणारा दुसरा समूह सामाजिक माध्यमांवर लिखाण करत असतो. अन्य एक समूह मात्र प्रत्यक्षात रुग्णाला ‘अँटीबायोटिक्स घ्या’, असे म्हणून औषधांची चिठ्ठी (प्रिस्क्रीप्शन) लिहून देतो. रुग्णांना ते नको असल्याने ते आमच्याकडे, म्हणजे आयुर्वेदाकडे येतात. आम्ही आयुर्वेदाचे उपचार देऊन ती केस यशस्वीरीत्या हाताळून त्याविषयीचा शोधनिबंध किंवा सामाजिक माध्यमांवर त्याचे लिखाण प्रसारित केले की, दुसरा समूह पुन्हा एकदा या केसमध्ये तर औषधेच आवश्यक नव्हती. ‘सेल्फ लिमिटिंग केस’ (स्वतःची मर्यादा) आहे’, असे सांगायला चालू करतो. या सर्वांनी विविधांगी बोलण्यापेक्षा एक काय ते ठरवायला हवे.
ई. माझ्या गेल्या दशकभराच्या चिकित्सा अनुभवातून एक नक्की की, फारच कमी अवस्थांमध्ये अँटीबायोटिक्स खरेच आवश्यक असतात. एरव्ही श्वसनमार्ग ते मूत्रमार्ग आणि व्रण ते पचनसंस्था अशा विविध संसर्गांत सर्रास अँटीबायोटिक्स दिले जातात, त्यामध्ये शुद्ध आयुर्वेदाच्या उपचारांनी उत्तम लाभ होतो. कित्येकदा तर आमच्याकडे कोणत्याही अँटीबायोटिक्सने न बधणार्या बॅक्टेरियाची काही वैद्यकीय चिकित्सा चालू असतात. यांतील बहुतेकांनाही उत्तम गुण मिळतो, म्हणजेच अँटीबायोटिक्सना पर्याय आहे. आपण पॅथीचा अहंगंड सोडून त्याविषयी विचार करणार का ? हा खरा प्रश्न आहे.
उ. ‘मी पाश्चात्त्य वैद्यकाच्या विरोधात असतो’, अशी प्रतिमा सिद्ध करण्यात काही वैद्यक जिहादी कार्यरत असतात. प्रत्यक्षात मात्र मी ‘फार्मा’माफिया आणि त्यांची संपूर्ण टोळी यांच्या अन् वैद्यक जिहादींच्या अहंगंडाच्या विरोधात असतो. जिथे ज्या वैद्यकशाखेने कमीत कमी दुष्परिणाम आणि अधिकाधिक लाभ होतो, तिथे ती वापरावी. कसल्याही विरोधात असण्यापेक्षा मी जनताजनार्दनाच्या आरोग्याच्या बाजूने असतो. ‘कोविड’ महामारीमध्येही याच हेतूने काही निरीक्षणे आणि मते मांडली होती. त्या वेळी ज्यांनी ती कशी चुकीची आहेत, यावर ‘पोस्ट’ (लिखाण) लिहिल्या होत्या, ते स्वतः किंवा त्यांचे नातेवाइक आज त्याच तक्रारींच्या अनुषंगाने माझ्याकडे उपचार घेत आहेत. हा सर्व काळाचा महिमा असतो.
सरतेशेवटी लोकांनी आंधळेपणाने उपचार न घेता स्वतःचे पर्याय नीट पडताळून पहावे. जग हे पर्याय शोधू लागले आहे आणि आपल्याकडे तो पर्याय गेल्या काही सहस्रो वर्षांपासून उपलब्ध आहे !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (२८.१२.२०२३)
‘वेद हेच आपले मूळ अन् आपण सनातन धर्माचे अविभाज्य अंग आहोत’, हे वैद्यांनी लक्षात घ्यावे !
‘वैद्याने चारही वेदांमध्ये स्वतःची भक्ती विशेषत: अथर्ववेदावर असल्याचे सांगावे !’ – आचार्य चरक
‘आयुर्वेद आणि अथर्ववेद हे दोन भिन्न नसून एकच मानावे.’ – आचार्य चक्रपाणि
चिकित्सेत श्रेष्ठ समजले जाणारे आचार्य चरक ज्या वेळी ‘प्रत्यक्ष इंद्रियगम्य गोष्टी अतिशय अल्प असून इंद्रियातीत गोष्टीच पुष्कळ आहेत’, असे म्हणतात, तेव्हा ती परमोच्च परिपक्वता असते. लौकिक पैलूपलिकडे असलेल्या पैलूंचा वापर आपण चिकित्सेत करतो का ? करू शकतो का ? याचे उत्तर प्रत्येकाने आपापल्या परीने शोधावे. एकदा याचे उत्तर मिळाले की, आपण गोक्षुरादि गुग्गुळाचे अनुपान (कार्य करण्यासाठी साहाय्यक) म्हणून ‘मूत्रविमोचनसूक्त’ किंवा कृमिकुठार रसाचे अनुपान म्हणून ‘कृमिनाशनसूक्त’ विचारात घेऊ लागतो. अनुपान म्हणून आहार हा स्थूलच असावा, असा नियम नाही. आपले विचार हेही आहार असतात, शब्द हेही आहारच असतात. मग ‘स्तुवन्नामसहस्त्रेण ज्वरान्सर्वान्व्यपोहति ।’ (चरक चिकित्सा, अध्याय ३७, श्लोक ३) (भावार्थ : आध्यात्मिक रोग मिटवण्यासाठी रामनामाचा उपचार आपल्याकडे सहस्रो वर्षांपासून होत आला आहे.) असे आचार्य चरक का म्हणतात ? ते कळू लागते. हळूहळू ही परिपक्वता येऊ लागते. ती येऊ लागली की, देवाचे आभार मानायचे आणि आणखी मस्तक झुकवून शिकत रहायचे. वैद्यांनी स्वतःची मूलस्थाने सतत पडताळून पहायला हवीत. आपण त्यांच्याशी संलग्न आहोत किंवा नाही यांविषयी आत्मपरीक्षण करायला हवे. कुणी कितीही बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न केला, तरी वेद हेच आपले मूळ आहे आणि आपण सनातन धर्माचे अविभाज्य अंग आहोत !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (२५.१२.२०२३)