मलंगगडमुक्तीच्या भावना पूर्ण केल्याविना स्वस्थ बसणार नाही !- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
ठाणे – मलंगगडाच्या संदर्भातील तुमच्या सर्वांच्या भावना मला माहिती आहेत. या मलंगगडावर येऊन शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्तीसाठी आंदोलन चालू केले. मग आपण ‘जय मलंग, श्री मलंग’ म्हणू लागलो. त्याचाही आपल्याला आनंद आहे. तुमच्या सर्वांच्या मलंगगडमुक्तीच्या भावना आहेत. मला त्या भावनांची कल्पना आहे आणि त्या पूर्ण केल्याविना हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सध्या श्री मलंगगडाच्या पायथ्याशी मोठा कीर्तन महोत्सव चालू आहे. या महोत्सवाला ते उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी हिंदूंना वरील आश्वासन दिले.
मलंगगडावर नाथपंथियांपैकी ५ नाथांच्या समाध्या आहेत, तसेच श्री मलंगशहा बाबा यांचेही स्थान आहे. असे असूनही हा परिसर सध्या मुसलमानांनी बळकावला असून हिंदूंना केवळ वर्षातील एक दिवस येथे जाण्याची अनुमती असते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरील वक्तव्य केले.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘प्रतापगडावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. ते अतिक्रमण हटवण्याचे धाडस कुणीही करत नव्हते; परंतु शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी मला धाडसाची शिकवण दिली आहे. त्यामुळे मी मागे हटणार नाही. आपले सरकार राज्यातील पुरातन मंदिरांचे संवर्धन करत आहे. राज्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास केला जात आहे. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराचा विकास केला जाणार आहे. या मंदिरासाठी राज्य सरकारने १३८ कोटी रुपये दिले आहेत. पंढरपूरचाही विकास केला जाणार आहे.’’