श्रीराम आयेंगे…..!
अयोध्या येथे २२ जानेवारीला प्रभु श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि हिंदूंची साडेपाच शतकांची प्रतिक्षा समाप्त होणार आहे. त्याचा उत्साह सर्वत्र, म्हणजे देशाच्या कानाकोपर्यात पहायला मिळत आहे. सामान्य हिंदूंपासून ते मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या प्रत्येकाला ‘मी यात कसा सहभागी होईन ?’, असे कुठेतरी वाटत आहे. कुणी प्रभु श्रीरामांना जे वस्त्र परिधान केले जाणार आहे, सीतामातेसाठी जी साडी दिली जाणार आहे, त्याच्या विणकामात ते सहभागी होत आहेत. कुणी मंदिराच्या ध्वजस्तंभाच्या सेवेत लीन आहे, कुणी मंदिराच्या शिल्पकामात सहभागी झाले आहेत, तर हिंदूंना या महोत्सवाचे निमंत्रण अक्षता वाटून देण्याच्या सेवेत कुणी आहे. त्यासाठी गल्ली-गल्लीत शोभायात्रा निघत आहेत, त्यामध्ये अबालवृद्धही सहभागी होत आहेत. इतके मंगलमय वातावरण सर्वत्र पहायला मिळत आहे.
प्रभु श्रीरामाचे मंदिर हे ‘राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक कसे होऊ शकते ?’, त्याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. प्रत्येकाच्या मनात ‘मेरे झोपडी के भाग आज खुल जायेंगे, प्रभु श्रीराम आयेंगे’, हे भजन चालू आहे. ‘प्रभु श्रीरामांचे हृदयमंदिरात आगमन होणार आहे’, या भावाने सर्वजण सेवेत सहभागी होत आहेत. ‘दोष-अहंकाराने युक्त असलेल्या या मनाला हे रामराया, दोष-अहं मुक्त कर आणि आमचे मन हे सद्गुणांनी युक्त असे कर’, असेच म्हणावेसे वाटत आहे. समर्थ रामदासस्वामींनी म्हटल्याप्रमाणे ‘रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती’, अशी आमच्या मनाची स्थिती तू कर’, ही श्रीरामाच्या चरणी प्रार्थना आहे.
श्रीरामाच्या आगमनासाठी देश-विदेशांतील हिंदूंची उत्सुकता शिगेला पोचली आहे. त्या दिवशी मंदिरांमध्ये दाखवल्या जाणार्या कार्यक्रमाविषयी नियोजन चालू झाले आहे. शोभायात्रा, मंदिरातील अन्य कार्यक्रम, दीपोत्सव आदी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात काही जण मग्न आहेत. हे सारे श्रीरामासाठी आहे. असे सारे होईल, असे कधी वाटले होते का ? पण श्रीरामासाठी सारे हिंदूंच काय परधर्मीयही उत्सुक झाले आहेत. विरोधकांचा विरोध मावळला आहे. ‘श्रीराम मंदिरामुळे किती नोकर्या मिळणार आहेत ?’, अशा आणि अनेक खालच्या स्तरावरच्या टीका काही बुद्धिप्रामाण्यवादी लोकांनी केल्या; पण भक्तांच्या प्रभु श्रीरामावरील असलेल्या श्रद्धेपुढे त्यांना झुकावेच लागले. बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी टीका केली, तरी भक्तांच्या उत्साहामध्ये किंचित्ही फरक जाणवलेला नाही. श्रीराममंदिरामुळे रोजगार निर्माण होणे किंवा आर्थिक विषय हा दुय्यम आहे; पण हे ‘श्रीराममंदिर’ नेहमी स्वाभिमान आणि धर्माभिमान यांची प्रेरणा येणार्या अनेक पिढ्यांना देत राहील, यात शंका नाही !
– श्री. जयेश बोरसे, पुणे