जगातील ६१ देशांत दिसणार रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा !
जपानपासून अलास्कापर्यंत, अमेरिकेपासून इंग्लंडपर्यंत सोहळा दिसण्यासाठी विश्व हिंदु परिषदेचे प्रयत्न !
नागपूर – जगातील ६१ देशांमध्ये रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा एकाच वेळी दिसणार असून जपानपासून अलास्कापर्यंत, अमेरिकेपासून इंग्लंडपर्यंत आणि सिंगापूरपासून मलेशियापर्यंत सर्वत्र हा सोहळा दिसण्यासाठी विश्व हिंदु परिषदेचे प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी २ जानेवारी या दिवशी येथे दिली.
विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय संयुक्त सरचिटणीस जी. स्थाणुमालयन म्हणाले की, नोव्हेंबर मासात बँकाक येथे ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ची परिषद झाली. त्या वेळी जगातील ६१ देशांतील प्रतिनिधी तेथे आले होते. याशिवाय जग्गी वासुदेव, चिन्मय मिशन, श्री श्री रविशंकर, रामकृष्ण मठ, अम्मा, स्वामीनारायण मंदिर, इस्कॉन यांचे जगभरात आश्रम आहेत. या सर्व आश्रमांतही रामलला प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे प्रक्षेपण आणि कार्यक्रम केले जाईल.
विश्व हिंदु परिषदेने जगातील ६१ देशांमध्ये उत्सव साजरा करण्याची व्यापक सिद्धता केली आहे. अक्षतावाटप चालू झाले आहे. राज्यात १ कोटी, विदर्भात २५ लाख आणि फक्त नागपूर येथे ५ लाख घरांमध्ये अक्षता पोचवण्यात येईल. २२ जानेवारी या दिवशी प्रत्येकाने सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पूजापाठ करावा, असे आवाहन जी. स्थाणुमालयन यांनी केले आहे. मिलिंद परांडे म्हणाले की, जगभरात विहिंपचे संघटन नाही, तिथे संपर्क आवश्यक आहे. अशा सर्व ठिकाणी त्या त्या ठिकाणांच्या वेळेनुसार थेट प्रक्षेपण आणि तेथील मंदिरात पूजापाठ होणार आहे.