मुलांना लहानपणापासूनच आध्यात्मिक स्तरावर घडवणार्‍या आणि इतरांचा विचार करणार्‍या सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८४ वर्षे) !

‘माझी आई पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (सनातनच्या ९५ व्या व्यष्टी संत) पूर्वीपासूनच प्रेमळ आणि सात्त्विक विचारांच्या आहेत. त्यांचा प्रत्येक प्रसंगात ‘देवच सर्व करतो’, असा भाव असतो. त्यांनी आम्हा चारही भावंडांवर लहानपणापासून साधनेचे संस्कार केले. त्यांनी आम्हाला प्रसंगानुसार आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन घडवले. मला त्यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. पू. आईंनी मुलांवर लहानपणापासून साधनेचे संस्कार करून त्यांना घडवणे

पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी

१ अ. मुलांना कामे करण्याची सवय लावून स्वावलंबी बनवणे

१. पू. आईंनी आम्हा चारही भावंडांना घरातील कामे करण्याची सवय लावली. त्या आमच्या सेवांचे नियोजन करून त्याप्रमाणे आम्हाला सेवा करायला सांगत असत, उदा. सकाळ-संध्याकाळ केर काढणे, अंगणात सडा-रांगोळी करणे. त्या वेळी आमच्याकडे घरातील कामे करण्यासाठी बाई नव्हती. पू. आई भांडी घासत असत आणि आम्हा चारही भावंडांना आळीपाळीने भांडी धुवायला सांगत असत. त्यांनी मुलगा-मुलगी असा भेद कधीच केला नाही.

२. त्यांनी आम्हाला स्वतःचे कपडे स्वतः धुवायला शिकवले.

सौ. माया श्रीकांत पिसोळकर

१ आ. मुलांवर लहानपणापासून श्रीरामरक्षा म्हणण्याचा संस्कार करणे : पू. आईंनी स्वतःच्या आचरणातून आम्हाला लहानपणापासून धर्माचरण करायला शिकवले. त्यांनी मला ‘रुग्णाईत असतांना वैद्यकीय उपचारांसह आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायला हवेत’, हेही शिकवले.

पू. आईंमुळे माझ्या मनावर लहानपणीच ‘श्रीरामरक्षा म्हटल्याने आपल्याभोवती संरक्षककवच निर्माण होते’, हे कोरले गेले. मी आजही श्रीरामरक्षा श्रद्धेने म्हणते.

१ इ. सर्वांशी जुळवून घेण्याची वृत्ती निर्माण करणे : माहेरी अकोट येथे आमचे एकत्र कुटुंब होते. आम्ही एकूण ११ भावंडे होतो. आम्ही सर्व भावंडे साधारण एकाच वयाचे होतो. त्यामुळे मला लहान वयातच सर्वांशी जुळवून घेण्याची शिकवण मिळाली.

१ ई. लहानपणापासून सेवा करण्याचे महत्त्व मनावर बिंबवणे

१. पू. आई माझ्याकडून लहानपणी देवपूजेची सिद्धता करणे, देवांसाठी फुले आणून त्यांचा हार बनवणे, देवपूजेची उपकरणे स्वच्छ करणे, अशा लहान-सहान सेवा करून घेत असत.

२. माझी आजी भागवत ऐकण्यासाठी मंदिरात जात असे. तेव्हा पू. आई मला आजीचे आसन मंदिरात घालून ठेवायला सांगत असत.

३. पू. आई मला आजीसाठी १०८ बेलाची पाने आणि १०८ फुले काढून निवडून ठेवण्यास सांगत असत.

माझ्या सासरी घराजवळच नरसिंहाचे मंदिर होते. त्या मंदिरात प्रत्येक वर्षी नरसिंह जयंतीचा उत्सव आणि नरसिंहाचे नवरात्र होत असे. पू. आईंनी लहानपणीच माझ्या मनावर सेवेचे महत्त्व बिंबवल्यामुळे मी देवळातील देवाची उपकरणे चिंच लावून लख्ख घासत असे. त्या देवळात प्रतिदिन भजन होत असे आणि त्याची सिद्धताही मी करत होते.

१ उ. पू. आईंनी ‘देवच काळजी घेतो’, असा दृढ संस्कार केल्यामुळे स्वतःला वाईट प्रसंग किंवा विचार यांतून लगेच बाहेर पडता येणे आणि ‘घडलेल्या प्रसंगात देवाने कसे साहाय्य केले’, हे लक्षात येऊन कृतज्ञताभावात रहाता येणे : पू. आजींमध्ये पूर्वीपासूनच ईश्वराच्या प्रती उत्कट भाव आहे. त्या सतत देवाच्या अनुसंधानात असतात. मी लहान असतांना त्या मला प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक स्तरावर सांगत असत. त्या मला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत भावाच्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करत असत. पू. आई मला लहानपणापासूनच आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम करत होत्या. त्यामुळे आयुष्यातील प्रतिकूल परिस्थितीही माझ्या मनात देवाविषयी कधीही विकल्प आला नाही किंवा माझी श्रद्धा कुठे उणावली नाही. आजही आम्हा चारही भावंडांना पू. आईंनी आमच्यावर केलेल्या संस्कारांचा लाभ होत आहे. आमचे वडीलही धार्मिक वृत्तीचे होते. दोघांनी ‘देवच आपला पाठीराखा असतो’, असे आमच्या मनावर बिंबवले. माझ्या मनात कधीतरी मायेचे किंवा काळजीचे विचार आले, तरी ‘देवच काळजी घेतो’, असा माझ्यावर दृढ संस्कार झाल्यामुळे मला प्रसंग किंवा विचार यांतून लगेच बाहेर पडता येते.  ‘घडलेल्या प्रसंगात देवाने मला कुठे साहाय्य केले’, हे लक्षात येऊन मला कृतज्ञताभावात रहाता येते. हे मला केवळ पू. आईंमुळे शक्य झाले.

२. नातीच्या घरी वास्तुशांत विधीसाठी गेल्यावर पू. आईंनी केलेला इतरांचा विचार

अ. ‘१५.५.२०२३ या दिवशी माझी मुलगी वैद्या (सौ.) मुक्ता अभिनय लोटलीकर हिच्या घरी वास्तुशांत होती. त्या वेळी माझे जावई श्री. अभिनय यांनी पू. कुसुम जलतारेआजी (माझी आई) यांना विचारले, ‘‘तुम्ही वास्तुशांतीला यावे’, अशी आमची इच्छा आहे. तुम्ही येऊ शकता का ?’’ तेव्हा पू. आईंनी लगेच होकार दिला आणि त्या उत्साहाने नातीचे कौतुक बघण्यासाठी पुणे येथे गेल्या.

आ. माझ्या मुलीचे घर तिसर्‍या माळ्यावर आहे. सर्वांनी पू आईंना विनंती केली, ‘‘आपण आसंदीवर बसा. आम्ही तुम्हाला वर घेऊन जातो’’; परंतु पू. आईंनी त्याला स्पष्ट नकार दिला आणि त्या थांबत थांबत पूर्ण ३ माळे चढून वर आल्या.

इ. मुलीच्या घरी वास्तुशांतीसाठी अनेक पाहुणे आले होते. आमचे नातेवाईक पू. आईंना भेटायला येत होते. त्यामुळे पू. आईंची सलग विश्रांती होत नव्हती, तरीही त्यांनी त्याविषयी काही सांगितले नाही.

२ ई. सतर्कता : पू. आई एका खोलीत शांतपणे पडून नामजप करत होत्या. त्या मधूनच उठून प्रत्येक पूजाविधी बघत होत्या. तेव्हा ‘प्रत्येक गोष्ट सतर्कतेने कशी बघायची ?’, हे मला पू. आईंकडून शिकायला मिळाले.

२ उ. स्वीकारण्याची वृत्ती : वास्तुशांत झाल्यावर आम्ही माझा भाऊ श्री. राजेश जलतारे यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा पू. आईंना दगदग होऊ नये; म्हणून मी त्यांना ‘येथेच थांबाल का ?’, असे विचारले, तर त्यांनी लगेचच सहमती दर्शवली.

२ ऊ. प्रेमभाव : दुसर्‍या दिवशी माझ्या चुलत भावाने पू. आजींना बोलावल्यावर त्यांना २ माळे चढायला आणि उतरायला लागले, तरीही त्या आनंदाने यायला सिद्ध झाल्या.

२ ए. देवदर्शनाची ओढ : आम्ही पुण्यातील सारसबागेतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा पू. आजी म्हणाल्या, ‘‘मलाही गणपतीचे दर्शन होईल’’ आणि त्या उंच पायर्‍या चढून मंदिरापर्यंत चालत गेल्या. पू. आजींना देवदर्शनाची असलेली ओढ आणि त्यांची इच्छाशक्ती यामुळे त्या माझ्या समवेत येऊ शकल्या.

३. पू. आईंची भावस्थिती

३ अ. ‘ज्या समुद्राच्या पाण्याला एक देवी आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा स्पर्श झाला, त्याचा लाभ आपल्यालाही व्हावा’, असा भाव असणे : आम्ही गोवा येथे घरी आल्यावर समुद्रावर जाणार होतो. तेव्हा पू. आजींनी समुद्रावर यायला नकार दिला. त्या वेळी माझा मुलगा श्री. श्रेयस त्यांना म्हणाला, ‘‘एका देवीच्या मूर्तीला त्या समुद्रावर स्नानासाठी नेण्यात आले होते आणि त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ याही गेल्या होत्या.’’ हे पू. आजींनी ऐकले आणि त्या समुद्रावर येण्यास सिद्ध झाल्या. त्या वेळी पू. आजींचा भाव होता की, ‘ज्या समुद्राच्या पाण्याला देवी आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा स्पर्श झाला, त्याचा लाभ आपल्यालाही व्हावा.’

३ आ. पू. आजींच्या चरणांना समुद्राच्या लाटांनी स्पर्श केल्यावर ‘या लाटांच्या माध्यमातून देवीचे चैतन्य मिळाले’, असे पू. आजींना वाटणे : आम्ही समुद्रावर गेलो असतांना दूर उभे होतो, तरीही समुद्राच्या लाटांनी पू. आजींच्या चरणांना स्पर्श केला. त्या वेळी पू. आजींचा भाव जागृत झाला. त्या कृतज्ञताभावाने समुद्राकडे एकटक बघत होत्या. नंतर त्या म्हणाल्या, ‘‘या लाटांच्या माध्यमातून मला देवीचे चैतन्य मिळाले.’’ ‘तेव्हा पू. आजी सतत भावाच्या स्थितीत असतात आणि त्या देवाची अनुभूती घेत असतात’, असे माझ्या लक्षात आले.

३ इ. गोकर्ण महाबळेश्वर येथे गेल्यावर पू. आजींचे ध्यान लागणे : आम्ही गोकर्ण महाबळेश्वर येथे गेलो होतो. तेव्हा पू. आजी आमच्या समवेत असल्यामुळे आम्हाला दर्शन घेणे सुलभ झाले आणि तेथील चैतन्याचा लाभ घेता आला. त्या वेळी देवळात गर्दी नव्हती. त्यामुळे आम्हाला सावकाश आणि भावपूर्ण दर्शन घेता आले. आम्ही देवळात बसून शांतपणे नामजप केला आणि स्तोत्र म्हटले. त्या मंदिरात पू. आजींचे ध्यान लागले.

३ ई. मुरुडेश्वर येथील महादेवाची भव्य मूर्ती पाहून पू. आईंना ‘आपण कैलासात आलो आहोत’, असे वाटणे : नंतर आम्ही मुरुडेश्वर येथे महादेवाच्या दर्शनाला गेलो. तिथे शिवाची भव्य मूर्ती होती. ती मूर्ती पाहून पू. आजींना वाटले, ‘कैलासात आलो आहोत.’  त्यांना ‘नातवाने देवदर्शन घडवले’, याचे कौतुक वाटत होते. त्या ‘मी एवढा मोठा प्रवास केवळ गुरुकृपेने करू शकले’, असे सांगत असतांना त्यांचा भाव दाटून येत होता आणि त्या सतत कृतज्ञता व्यक्त करत होत्या.

४. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘परात्पर गुरु डॉक्टर, पू. आजींकडून शिकायला मिळालेली सूत्रे मला कृतीत आणता येऊ देत. तुम्हीच माझ्याकडून त्यांच्याप्रमाणे साधना करून घ्या. ‘मला तुमच्या चरणांशी घ्या’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने आर्त प्रार्थना करते.

‘हे गुरुदेवा, मला संत मातेच्या पोटी जन्म दिलात. आपण मला सनातन संस्थेशी जोडून साधनेची गोडी लावली आणि माझ्याकडून साधना करून घेत आहात’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. माया श्रीकांत पिसोळकर (पू. जलतारेआजींची मुलगी)  अमरावती (३०.६.२०२३)

सर्व जिवांवर निखळ प्रेम करणार्‍या पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८४ वर्षे) !

होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

‘सप्टेंबर २०२३ मध्ये सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी साधकांच्या समवेत बसून नामजपादी उपाय करत होत्या. तेव्हा मीही तेथे बसून नामजप करत होते. तेथे एक विदेशी साधिकाही नामजप करत होती. पू. आजींचे नामजपादी उपाय झाल्यानंतर मी त्यांना त्यांच्या खोलीपर्यंत पोचवायला जात होते. त्या वेळी त्या विदेशी साधिकेच्या चेहर्‍यावर पू. आजींप्रती भाव दिसत होता.

मी पू. आजींना त्या साधिकेविषयी सांगितले. तेव्हा त्या तिच्याकडे पाहून हळूवार हसल्या. नंतर पू. आजींच्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. आम्ही खोलीत गेल्यावर मी त्यांना विचारले, ‘‘पू. आजी, काय झाले ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मला सगळेच साधक आपले वाटतात. भारतातील असोत कि विदेशातील असोत.’’ हे सांगतांनाही त्यांची भावजागृती होत होती.

तेव्हा मला वाटले, ‘संत किती व्यापक असतात ! संत व्यक्तीचे नाव, देश, वेश काही पहात नाहीत. संत सर्वांवर समान प्रीती करतात.’ मला अशा संतांचा सहवास लाभल्यामुळे मी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, नागेशी, फोंडा, गोवा. (१७.११.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक