रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील रजनी नगरकर यांच्या निवासाच्या खोलीत जाणवलेले पालट !
‘साधकांना त्यांच्या खोलीतील लाद्यांमध्ये काही पालट जाणवत असतील, तर त्यांनी त्याविषयी लिहून द्यावे’, अशी सूचना फलकावर लिहिली होती. ती सूचना वाचल्यावर मला माझ्या खोलीत आणि खोलीतील लाद्यांमध्ये जाणवलेले पालट लक्षात आले, ते येथे दिले आहेत.
मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहाते, त्या खोलीत माझ्या समवेत कु. रुचिका जाधव ही साधिका रहाते. आमच्या खोलीत पालट जाणवू लागले, त्या सुमारास कु. वेदिका भागवत (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के, वय १६ वर्षे) आणि देहली सेवाकेंद्रातील साधिका कु. पूनम चौधरी या काही दिवसांसाठी आमच्या खोलीत रहात होत्या.
१. खोलीतील लाद्यांमध्ये जाणवलेला पालट !
१ अ. खोलीतील दाराजवळच्या लाद्या गुळगुळीत होणे : जुलै २०२२ पासून आमच्या खोलीच्या दाराजवळ असलेल्या पलंगाजवळील लाद्यांचा साधारण दोन ते अडीच फुटांपर्यंतचा भाग गुळगुळीत झाला आहे. हा पालट मी माझ्या खोलीतील साधिकांना दाखवला होता. ६.२.२०२३ या दिवशी मी आश्रमातील अन्य ३ – ४ साधिकांना या पालट झालेल्या लाद्या दाखवल्या. ‘त्या लाद्यांचा गुळगुळीतपणा वाढला आहे’, असे मला जाणवते.
१ आ. आध्यात्मिक उपायांच्या पलंगाजवळील लाद्या गुळगुळीत होणे : आमच्या खोलीत आध्यात्मिक लाभासाठी एक पलंग ठेवला आहे. ‘ऑक्टोबर २०२२ पासून तेथील साधारण अर्धा फूट भाग गुळगुळीत झाला आहे’, असे माझ्या लक्षात आले. हा पालटही मी खोलीतील साधिकांना दाखवला होता. ६.२.२०२३ या दिवशी हा पालट मी आश्रमातील अन्य ३ – ४ साधिकांना दाखवल्यावर काही साधिका मला म्हणाल्या, ‘तुमच्या खोलीतील लाद्यांमध्ये पालट झाला आहे.’
१ इ. लाद्यांमधील पालटांविषयी काही साधिकांना जाणवलेली सूत्रे !
१. सौ. कस्तुरी भोसलेकाकू काही कारणांनी आमच्या खोलीत आल्या होत्या. खोलीतून परत जातांना त्या मला म्हणाल्या, ‘‘तुमच्या खोलीतील लाद्या फारच गुळगुळीत झाल्या आहेत. ‘पाय घसरेल’, असे वाटते.’’
२. देहली सेवाकेंद्रातील साधिका कु. पूनम चौधरी खोलीत आल्यावर मला म्हणाल्या, ‘‘खोलीतील लादीचा स्पर्श पायाला चांगला वाटतो. खोलीतील लादी पारदर्शक वाटते.’’
२. खोलीत जाणवणारे पालट !
२ अ. खोली मोठी आणि प्रकाशमान वाटणे : कु. रुचिका जाधव मला म्हणाली, ‘‘ही खोली मोठी आणि अधिक प्रकाशमान जाणवते. रात्रीही नवीन दंडदीप (ट्यूब) लावल्यासारखा प्रकाश वाटतो. खोलीत पुष्कळ चांगले वाटते.’’
२ आ. खोलीत पुष्कळ चैतन्य जाणवणे : सौ. प्रीती मल्ल्या मला म्हणाल्या, ‘‘या खोलीत मला चांगले वाटते आणि पुष्कळ चैतन्य जाणवते. या खोलीत आल्यावर माझा थकवा जातो. त्यामुळे मला येथून जावेसे वाटत नाही.’’
२ इ. खोलीत आध्यात्मिक स्तरावरील उपाय होणे : मार्च २०२३ पासून कु. वेदिका भागवत ही आमच्या खोलीत निवासाला आहे. ती मला म्हणाली, ‘‘मला या खोलीत शांत झोप लागते आणि पुष्कळ चैतन्य जाणवून आध्यात्मिक स्तरावरील उपायही होतात.’’
२ ई. खोली सात्त्विक आणि मोठी वाटणे : देहली सेवाकेंद्रातील साधिका कु. पूनम चौधरी काही दिवसांसाठी आमच्या खोलीत निवासाला होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘इथे आल्यापासून मला पूर्वीसारखी वाईट स्वप्ने पडली नाहीत. माझे अंग नेहमी दुखत असते; पण आता त्याकडे माझे अधिक लक्ष जात नाही. मला ही खोली पुष्कळ सात्त्विक, मोठी आणि प्रकाशमान वाटते. मला खोलीत गारवा जाणवतो.’’
३. कृतज्ञता
आमच्या खोलीतील जवळजवळ सर्वच लाद्या गुळगुळीत झाल्या असून खोलीत पुष्कळ चांगले वाटते. आमच्या खोलीच्या शेजारची खोली श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची खोली आहे. ‘त्यांच्या खोलीतून येणार्या चैतन्यामुळे हे पालट जाणवत आहेत’, असे मला वाटते. ‘हे गुरुमाऊली, सद्गुरूंचे चैतन्य तुम्ही आम्हाला सतत अनुभवयाला देत आहात’, यासाठी खोलीतील आम्ही सर्व साधिका तुमच्या आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ अन् सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |