SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अनागोंदी कारभाराची कार्यकारी अधिकार्यांकडून स्वीकृती !
|
पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या लाडवांच्या प्रसादामध्ये घोटाळा करणार्यांची पाठराखण, भाविकांसाठी प्रसाधनगृह बांधण्यात झालेला विलंब आणि भाड्यापोटी मंदिराच्या लाखो रुपयांचा अपव्यय, तसेच देवतांच्या दागिन्यांची ताळेबंदामध्ये नोंदी न करण्यात आल्याचा संशयास्पद प्रकार, या दैनिक ‘सनातन प्रभात’ने उघड केलेल्या सर्व अनागोंदी कारभाराची श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत स्वीकृती दिली. या सर्व प्रकारांमध्ये सुधारणा करण्यासाठी कार्यवाही चालू असल्याचे शेळके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दागिन्यांच्या नोंदीविषयी अपूर्ण माहिती देऊन पत्रकारांची दिशाभूल !
या वेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी ‘कोणतेही दागिने गहाळ झालेले नाहीत. त्यांच्या नोंदी आहेत; परंतु ताळेबंदात नोंदी नाहीत. त्यासाठी मूल्यांकन करणे आवश्यक आहे. मूल्यांकनासाठी २ वर्षांपूर्वी पत्र दिले आहे. मागील आठवड्यातही याविषयीचे पत्र सरकारला पाठवले असून त्याच्याही सर्व नोंदी आहेत’, अशी अपूर्ण माहिती देऊन पत्रकारांची दिशाभूल केली.
प्रत्यक्षात ताळेबंद करण्यासाठी मंदिर समितीकडून गेल्या ३८ वर्षांत सरकारकडे कोणताही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. वर्ष २०२१-२२ चा लेखापरीक्षण अहवाल सादर केल्यानंतर स्वत:ची चूक लपवण्यासाठी मंदिर समितीला या दागिन्यांच्या मूल्यांकनाच्या संदर्भात सरकारशी पत्रव्यवहार करावा लागला; मात्र हा भाग शेळके यांनी लपवला.
कॉरिडॉरच्या कामामुळे प्रसाधनगृहाच्या कामाला विलंब झाल्याची दिली खोटी माहिती !
कॉरिडॉरच्या कामामुळे भाविकांसाठीचे प्रसाधनगृह बांधण्यास विलंब झाल्याची खोटी माहिती राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंदिर समितीने रेल्वे खात्याच्या जागेवर भाविकांसाठी प्रसाधनगृह बांधण्याचा करार वर्ष २०१७ मध्ये केला आणि मंदिराच्या कॉरिडॉरचा विषय वर्ष २०१९-२०२० मध्ये आला. प्रसाधनगृहाचा करार ३५ वर्षांसाठी करण्यात आला आणि यासाठी मंदिर समितीने रेल्वे खात्याला १ कोटी ५४ लाख ४६ सहस्र ४१ रुपये देण्याचे निश्चित केले. याचे प्रतीमास ४ लाख ४१ सहस्र ३१५ रुपये मंदिर समिती रेल्वे खात्याला देत आहे; मात्र करार करून ४ वर्षे प्रसाधनगृह न बांधल्यामुळे फुकटचे पैसे रेल्वे खात्याला द्यावे लागले. प्रसाधनगृह बांधण्यासाठी करार केल्यानंतर प्रत्यक्षात प्रसाधनगृह बांधण्यात ३ ते ४ वर्षे विलंब झाल्याचे आणि त्याचे भाडे द्यावे लागल्याचे राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत मान्य केले; परंतु मंदिराच्या लाखो रुपयांच्या झालेल्या हानीचे काय ? याविषयी शेळके यांनी काहीच सांगितले नाही.
‘लाडवात गुणवत्ता राखली न गेल्याविषयी तक्रार का केली नाही ?’ याचे उत्तर दिलेच नाही !
प्रसादासाठी करण्यात आलेल्या लाडवांमध्ये गुणवत्ता राखली गेली नसल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत मान्य केले. यावर उपाययोजना म्हणून सध्या लाडवांची गुणवत्ता पडताळून विक्री करण्यात येत असल्याचे थातूरमातूर उत्तर शेळके यांनी दिले. प्रत्यक्षात ज्या ठेकेदाराला लाडवांचा ठेका देण्यात आला होता, त्याने पाकिटावर ‘शेंगदाणा तेल’ असल्याचे सांगून ‘सरकीचे तेल’ वापरले. यासह सुकामेवा असल्याचे वेष्टनावर नमूद करून प्रत्यक्षात लाडवांमध्ये तो वापरलाच नाही. हा सर्व प्रकार मंदिर समितीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे झाला. लाडवांमध्ये अशा प्रकारे घोटाळा करणार्यांची ठेव जप्त करण्याची थातूरमातूर कारवाई मंदिर समितीने केली; मात्र भाविकांची फसवणूक करणार्यांविरुद्ध पोलिसांत तक्रारही केली नाही.
(म्हणे) ‘२-३ दिवसांत मुंबईला जाऊन सचिवांची भेट घेणार !’
आम्ही येत्या २-३ दिवसांत मुंबईला जाऊन विधी व न्याय विभागाच्या सचिवांची भेट घेऊन लेखापरीक्षणातील सूत्रानुसार कार्यवाही करणार आहोत. वर्ष २०२२-२३ चे लेखापरीक्षण चालू असून त्यामध्ये चांगल्याप्रकारे सुधारणा करू, असे शेळके यांनी या वेळी सांगितले.
संपादकीय भूमिका
|
हे पण वाचा
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भ्रष्टाचार्यांना पाठीशी घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड !