ब्रह्मोत्सवात सेवा करतांना आधुनिक वैद्या (सौ.) साधना जरळी यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ब्रह्मोत्सवात सेवा मिळाल्यापासून मन अतिशय आनंदी आणि उत्साही होऊन कृतज्ञताभाव जागृत होणे

‘मला ब्रह्मोत्सवात सेवा मिळाल्यापासून माझे मन अतिशय आनंदी आणि उत्साही होते. ‘देवाने मला या सेवेमध्ये सहभागी करून घेतले’, त्याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. सहसाधक आणि दायित्व असणारे साधक मला सेवा सांगत असतांना त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अत्यंत कृतज्ञताभाव निर्माण झाला होता. हे सगळे करण्यासाठी मी काहीच प्रयत्न केले नाहीत. हे केवळ आणि केवळ गुरूंच्या कृपेने आपोआपच अंतर्मनामध्ये निर्माण झाले होते.

आधुनिक वैद्या (सौ.) साधना जरळी

२. परिस्थिती स्वीकारून सहसाधकांनी सांगितेलेले ऐकणे आणि सेवेतून आनंद मिळणे

‘परिस्थिती न स्वीकारणे’ हा माझा स्वभावदोष आहे. त्या अंतर्गत ब्रह्मोत्सवाच्या सेवेमध्ये प्रयत्न करत असतांना जी सेवा मिळेल, ती आनंदाने आणि अंतर्मनाने पूर्णतः स्वीकारली जात होती. स्वागतकक्षात सेवा करत असतांना सहसाधकांनी सांगितलेले ‘ऐकणे आणि स्वीकारणे’ होत होते आणि त्यातून मनाला आनंद मिळाला. स्वागतकक्षावर साधकांची गर्दी असतांना त्यांच्याविषयी कोणतीही प्रतिक्रिया न येता माझे मन अतिशय समाधानाने सेवेमध्ये रममाण झाल्याचे मी अनुभवत होते.

३. प्रत्यक्ष ब्रह्मोत्सवाच्या दिवशी भर दुपारी अतिशय उन्हात सेवा करत असतांना शरिराला उष्णतेची जाणीव होत नव्हती.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाल्यावर भावावस्था अनुभवणे

जेव्हा प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दिव्य अशा सुवर्ण रथात दर्शन झाले, तो क्षण ‘न भूतो न भविष्यति ।’ असा होता. त्या क्षणी मनाची जी भावावस्था अनुभवली, ती मी कधीही अनुभवलेली नव्हती. ‘परम पूज्य गुरुदेवांनी माझ्यासाठी काय केले ?’, याचे स्मरण झाले आणि कृतज्ञतेने भावाश्रू आले. सर्वांना गुरुदेवांचे दर्शन होईपर्यंत ती भावावस्था टिकून होती. संपूर्ण ब्रह्मोत्सवामध्ये माझ्या मनाची स्थिती भावविभोर झाली होती.

माझी साधना करण्याची तेवढी पात्रता नाही, तरीही गुरुदेव मला किती भरभरून देत आहेत आणि हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष अनुभवायला देत आहेत’, अशी कृतज्ञता मनापासून व्यक्त होत होती. साधकांचा गुरूंप्रती एवढा भाव होता की, ते पाहूनही माझी भावजागृती होत होती. श्री गुरूंनी मला दिलेल्या अपार चैतन्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– आधुनिक वैद्या (सौ.) साधना जरळी, चिपळूण, रत्नागिरी. (२१.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक