Dress Code Jagannath Temple : आता ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथ पुरी मंदिरातही वस्त्रसंहिता लागू !

  • ‘शॉर्ट्स’, फाटलेल्या (रिप्ड) जीन्स आणि ‘स्लीव्हलेस’ परिधान केलेल्यांना प्रवेश नसणार !

  • मंदिर परिसरात पान आणि गुटखा खाण्यावरही बंदी!

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना करावयाच्या वेशभूषेच्या संदर्भातील नियमावली)

भुवनेश्‍वर (ओडिशा) – गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्र राज्यातील शेकडो मंदिर समित्यांनी मंदिरांत प्रवेश करण्यासाठी वस्त्रसंहिता अनिवार्य असल्याचा निर्णय घेतला होता. आता असाच निर्णय महाराष्ट्राहून १ सहस्र किलोमीटर अंतरावर असलेल्या ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथ पुरी मंदिरानेही घेतला आहे. १ जानेवारीपासून हा निर्णय अंमलात आणण्यात आला. यासह मंदिर परिसरात पान आणि गुटखा खाण्यावर, तसेच प्लास्टिकच्या वस्तू वापरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी अडीच लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती.

मंदिर प्रशासनाच्या अधिकार्‍याने सांगितले की, यापुढे मंदिरात ‘हाफ पँट‘, ‘शॉर्ट्स’, फाटलेल्या (रिप्ड) जीन्स, ‘स्कर्ट’ आणि ‘स्लीव्हलेस’ कपडे परिधान केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश नसेल. मंदिर प्रशासनाने याविषयी ९ ऑक्टोबर २०२३ या दिवशीच एक आदेश प्रसारित केला होता. त्यामध्ये याची कार्यवाही १ जानेवारी २०२४ पासून करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते.

मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी बंदीचा निर्णय ! – मंदिर प्रशासन

वस्त्रसंहितेचा नियम लागू झाल्याने १ जानेवारी या दिवशी मंदिरात येणारे पुरुष भक्त धोतर आणि टॉवेल परिधान करून आल्याचे, तर महिला साडी किंवा सलवार-कुर्ता परिधान केल्याचे निदर्शनास आले. अधिकार्‍याने सांगितले की, मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिराच्या आवारात गुटखा आणि पान खाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडणार्‍यांना दंड ठोठावला जात आहे. मंदिराच्या सिंहद्वारावर तैनात सुरक्षा दल आणि मंदिरातील सेवक याकडे लक्ष ठेवत आहेत.

राजस्थानचे सांवलिया सेठ मंदिर ‘वस्त्रसंहिता’ लागू करण्याचा विचार करणार !

यासंदर्भात ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने आसाममधील सुप्रसिद्ध कामाख्या मंदिराच्या मुख्य पुजार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की आमच्या पर्यंत हा विषय अजून पोहचलेला नाही. मंदिराच्या आतापर्यंतच्या परंपरेनुसार दर्शन चालू राहील. राजस्थानमधील श्रीकृष्णाचे प्रसिद्ध सांवलिया सेठ मंदिराच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता त्यांनीही ‘या निर्णयाच्या कार्यवाहीविषयी विचार करू’, असे मत व्यक्त केले.

भारतभरातील मोठ्या मंदिरांनी जगन्नाथ पुरी मंदिराचा ‘आदर्श’ घ्यावा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

श्री. सुनील घनवट

जगन्नाथ पुरी मंदिराच्या वस्त्रसंहितेच्या निर्णयाचे महाराष्ट्र मंदिर महासंघाने स्वागत केले आहे. महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की, जगन्नाथ पुरी मंदिर प्रशासनाचा हा अभिनंदनीय निर्णय आहे. आता भारतभरातील सर्वच मोठ्या मंदिरांनी जगन्नाथ पुरी मंदिराचा ‘आदर्श’ घ्यावा. महाराष्ट्र मंदिर महासंघ मंदिरांचे संवर्धन आणि मंदिर संस्कृतीचे पुनरूज्जीवन करण्याचे कार्य सातत्याने करत रहाणार आहे.

संपादकीय भूमिका 

या स्वागतार्ह निर्णयाविषयी जगन्नाथ पुरी मंदिर व्यवस्थापनाचे अभिनंदन ! अशा प्रकारचे नियम आता भारतभरातील अन्य मंदिरांनीही घातले पाहिजेत !