Transporter Strike : नाशिक जिल्ह्यातील इंधन आस्थापनांच्या वाहतूकदार संघटनांचा संप मागे !

१२ जिल्ह्यांत खंडित झालेला इंधन पुरवठा पूर्ववत् होणार !

नाशिक – केंद्र सरकारने अपघाताविषयी बनवलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात जिल्ह्यातील इंधन आस्थापनांच्या वाहतूकदार संघटनांनी संप पुकारला होता. यात १ सहस्र ५०० टँकरचालक सहभागी झाले होते. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील १२ जिल्ह्यांतील इंधन पुरवठा खंडित झाला होता. या पार्श्‍वभूमीवर मनमाडच्या पानेवाडी इंधन प्रकल्पात टँकरचालकांसमवेत प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाला असून वाहतूकदारांनी काम करण्यास मान्य केले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील वाहतूकदारांचा संप मिटल्याने १२ जिल्ह्यांतील इंधन पुरवठा पूर्ववत् होईल.

नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, ‘‘वाहनचालक आणि वाहतूकदार यांच्या समवेत चर्चा केली आहे. त्यांचे विषय आणि प्रश्‍न समजून घेतले असून ते प्रशासन आणि केंद्र सरकार यांच्याकडे मांडण्याचे आश्‍वासन दिले आहे. येत्या २४ घंट्यांत इंधन पुरवठा सुरळीत होईल.’’